लोकांच्या घराची स्वप्नपूर्ती करण्याचे काम म्हाडा करते. नुकतेच म्हाडाने मुंबई विभागात 4083 घरांची लॉटरी काढली आहे. या लॉटरीत वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. 22 मे 2023 पासून या घरांसाठी अर्जदार अर्ज (Apply) करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2023 असणार आहे. या लॉटरीसाठी दोघेही पती पत्नी अर्ज करू शकतात. मात्र दोघांनाही लॉटरी जिंकल्यानंतर म्हाडाकडून दोन घरं मिळतात का? याबाबत म्हाडाचा नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.
म्हाडाचा नियम काय सांगतो?
म्हाडाच्या लॉटरीसाठी पती-पत्नी दोघेही अर्ज (Mhada Lottery Apply) करू शकतात. मात्र त्यासाठी म्हाडाने आखून दिलेल्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या अटींनुसार अर्ज केलेला व्यक्ती महाराष्ट्राचा 15 वर्ष रहिवासी असावा. व त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असावे.
म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज केल्यानंतर, जर म्हाडाकडून पती पत्नी असे दोघांचे नाव विजेता म्हणून जाहीर करण्यात आले, तर अशा वेळी दोघांपैकी केवळ एकालाच लॉटरी अंतर्गत केवळ एकच घर मिळवता येते. पती-पत्नी यांना वेगवेगळी घरे उपलब्ध करून दिली जात नाहीत. अर्जदार म्हणजेच पती किंवा पत्नी म्हाडाच्या वेगवेगळ्या उत्पन्न गटातील योजनांमध्ये एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करू शकतात. मात्र जर दोघांचे नाव विजेता म्हणून जाहीर झाले, तर कोणत्याही एकाच योजनेचा लाभ पती पत्नी यांना मिळून घेऊ येतो.
लॉटरीचा निकाल लागल्यानंतर अर्जदारांना कार्यालयीन कामकाजाच्या 10 दिवसाच्या आत कोणत्याही एकाच योजनेतून आपली पसंती online सादर करणे बंधनकारक असते. या कालावधीत अर्जदाराकडून Online पसंती प्राप्त न झाल्यास अर्जदार घर घेण्यास इच्छुक नाही असे गृहीत धरण्यात येते. व अर्जदाराचे घर वितरण रद्द समजण्यात येऊन प्रतीक्षा यादीवरील अर्जदाराला संधी देण्यात येते. त्यामुळे जर अर्जदार म्हणजेच पती पत्नी यांना भलेही लॉटरीमध्ये 2 घरे जिंकता आली, तरीही 2 घरे मिळत नाहीत. एकाच घराचा लाभ कोणत्याही एका योजने अंतर्गत घेता येतो.
अर्ज भरताना 'या' चुका टाळा
- अर्जदाराचे नाव, पत्ता आणि कामाची माहिती योग्य भरा. यामध्ये तफावत आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो किंवा या प्रक्रियेतून तुम्ही बाहेर पडू शकता.
- नोंदणी केलेला अर्ज आणि अनामत रक्कम म्हणून भरलेल्या रकमेची पावती सांभाळून ठेवा. शक्य असेल, तर ती स्वत:ला मेलवर पाठवून ठेवा. ओरिजनल पावती गहाळ झाल्यास अडचण होऊ शकते.
- अर्ज भरून झाल्यानंतर ऑरिजनल डॉक्युमेंटची झेरॉक्स काढून त्याचा एक सेल्फ अटेस्टेड सेट तयार करून ठेवा.