सध्या जगभरात आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कॉस्ट कटिंगचा निर्णय घेऊन नोकरकपात करायला सुरुवात केली आहे. फेसबुक (Facebook), व्हॉट्स ॲप (WhatsApp) आणि इंस्टाग्रामची (Instagram) मूळ कंपनी मेटाने यापूर्वी दोन वेळा कर्मचारी कपात केली आहे. त्यानंतर आता तिसऱ्यांदा नोकरकपात सुरू केली आहे. मागील वर्षी कंपनीने 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. त्यानंतर आता 10,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यासंदर्भातील माहिती खुद्द कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनी लिंक्डइनवर शेअर केली आहे.
Table of contents [Show]
तिसऱ्या नोकरकपातीचे संकेत मार्चमध्येच दिले होते
मेटाने सीईओ मार्क झुकरबर्गने (Meta CEO Mark Zuckerberg) यासंदर्भात मार्च महिन्यात नोकरकपातीचे संकेत दिले होते. ही कर्मचारी कपात एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या निर्णयानुसार 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.
'या' विभागातील कर्मचाऱ्यांना गमवाव्या लागल्या नोकऱ्या
मेटा कंपनीतील कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी (24 मे 2023) प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर (Linkedin) नोकरी गेल्याची माहिती दिली. मार्केटिंग, युजर एक्सपेरियन्स, इंजिनियरिंग आणि रिक्रुटिंग विभातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या कर्मचारी कपातीमध्ये टेक्निकल विभागातील कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली होती.
नोकरकपातीमुळे सध्याची कर्मचारी संख्या दोन वर्षापूर्वी इतकीच
मेटा कंपनीने 2020 नंतर मोठ्या प्रमाणावर नोकर भरती केली होती. या भरतीनंतर आता कंपनीकडून कर्मचारी कपात करण्यात येत आहे. केलेली नोकरकपात लक्षात घेता सध्या कंपनीतील कर्मचारी संख्या 2021 मध्ये जितकी होती तितकी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ दोन वर्षांपूर्वीची कर्मचारी संख्या आणि सध्याची कर्मचारी संख्या जवळपास एकसमान आहे.
मेटावर ही वेळ का आली?
मेटा कंपनीच्या उत्पन्नात प्रचंड घसरण झाली आहे. मेटाला 2022 च्या चौथ्या तिमाहीत 32165 बिलियन डॉलरचे उत्पन्न मिळाले. त्यात 2021 च्या तुलनेत 4% घसरण झाली आहे. नोकर कपात करुन देखील कंपनीच्या खर्चात 22% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत मेटाचा खर्च 25766 बिलियन डॉलर इतका वाढला होता. 2021 च्या चौथ्या तिमाहीत तो 21086 बिलियन डॉलर इतका होता. मेटाच्या निव्वळ नफ्यात एकूण 55% घसरण झाली आहे. मेटाला 4652 बिलियन डॉलरचे नेट इन्कम मिळाले. 2021 मध्ये याच तिमाहीत 10285 कोटींचे नेट इन्कम मिळाले होते.
Source: moneycontrol.com