मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी द्यावी की नाही, याविषयी वारंवार चर्चा होताना पाहिला मिळतात. दर काही महिन्यांनी हा मुद्दा समोर येतो व सोशल मीडियावर याविषयी चर्चा रंगू लागते. विशेष म्हणजे अनेक महिलांचेही असे मत आहे की, मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिली जाऊ नये. महिलांना विशेष सुट्ट्या दिल्यास त्यांच्या करिअरवर याचा परिणाम होऊ शकते, असे मत काहीजण व्यक्त करतात.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांनी देखील संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना असेच मत मांडले. मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचाच एक भाग असून, हे काही अपंगत्व नाही. अशा सुट्ट्या दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन तर मिळेल, सोबतच महिलांना समान संधी नाकारल्या जातील, असे मत स्मृती इराणी यांनी व्यक्त केले आहे. या वक्तव्यानंतर त्यांना टीकेचा देखील सामना करावा लागला.
मासिक पाळीदरम्यान खरचं महिलांना सुट्टी द्यायला हवी का ? सुट्टी दिल्यास त्याचे फायदे-तोटे नक्की काय आहेत ? याबाबत सरकारचे धोरण काय आहे ? कंपन्यांनी कशाप्रकारचे धोरण राबवायला हवे ? या प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
सरकारचे धोरण काय?
मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी मिळावी, यासंदर्भातील विधेयके संसदेत वारंवार मांडण्यात आली. मात्र, ही विधेयके मंजूर झाली नाही. यातील बहुतांश विधेयके ही खासगी विधेयके होती. Menstruation Benefits Bill, 2017 ’ आणि 2018 मध्ये Women’s Sexual, Reproductive and Menstrual Rights Bill मांडण्यात आले होते
2022 मध्ये काँग्रेस खासदार हिबी ईडन यांनी Right of Women to Menstrual Leave आणि Free Access to Menstrual Health Products हे खासगी विधेयक संसदेत मांडले होते. यात महिला व ट्रान्सवूमनला तीन दिवसांची भरपगारी सुट्टी देण्याची तरतूद होती. मात्र, खासजी विधेयक असल्याने याचे पुढे काहीच झाले नाही.
दरम्यान, डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी दरम्यान महिलांना सुट्टी देण्याच्या संदर्भातील कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचारधीन नसल्याचे स्पष्ट केले.
मासिक पाळीदरम्यानच्या सुट्टीवर तज्ञांचे मत काय?
मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना त्रास होतो. काही महिला या दिवसांमध्ये प्रचंड वेदना होतात, तर काहींना सौम्य वेदना होतात. या दिवसांमध्ये पोट दुखणे, डोकेदुखी, मळमळ होणे अशा वेदनांना सामोरे जावे लागते. याशिवाय, काही महिलांना डिसमेनोऱ्हियाचा (जास्त रक्तस्त्राव होणे) देखील त्रास होतो. त्यामुळे या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी दिली जावी, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जाते.
Global Journal of Health Sciences मध्ये 2015 साली प्रकाशित झालेली भारतीय महिला विद्यार्थींनीच्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, जवळपास 70.2 टक्के लोकांना डिसमेनोऱ्हियाचा सामना करावा लागतो. ज्या महिलांना याचा सौम्य त्रास होतो, त्या सरासरी दीड दिवसांची सुट्टी घेतात. तर जास्त त्रास होणाऱ्या महिला 2 ते अडीच दिवस सुट्टी घेतात.
काँग्रेस खासदार हिबी ईडन यांनी मांडलेल्या विधेयकामध्ये देखील याचा उल्लेख करण्यात आला आहे. यानुसार, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जवळपास 40 टक्के मुली शाळेत जात नाहीत. तर 65 टक्के मुलींच्या दैनंदिन कामावर याचा परिणाम होतो.
थोडक्यात, मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना असहाय्य होणाऱ्या वेदनांना सामोरे जावे लागते. अशा दिवसांमध्ये काम करणे देखील शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी देण्यात यावी, असे मत व्यक्त करतात.
कोणत्या देशांमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी दिली जाते?
मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देण्याचा निर्णय अनेक देशात लागू आहे. भारतातील काही राज्यांमध्ये देखील अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात केवळ बिहार आणि केरळ ही दोन अशी राज्य आहेत, ज्यांनी मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी धोरण लागू केली आहेत. विशेष म्हणजे बिहारने 1990 च्या दशकातच महिन्याला भरपगारी दोन दिवसीय मासिक पाळीदरम्यान रजा देण्याचे धोरण आणले होते. तर केरळ सरकारने राज्याचा उच्च शिक्षण विभाग विभागाच्या अंतर्गत असलेल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मासिक पाळी आणि प्रसूती रजा दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.
काही भारतीय कंपन्यांनी देखील मासिक पाळीच्या काळात महिला कर्मचाऱ्यांनी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगी, झोमॅटो, बायजूस आणि ओरिएंट इलेक्ट्रिक या काही प्रमूख भारतीय कंपन्या आहेत, ज्या महिलांना या काळात सुट्टी देतात.
तसेच, स्पेन, जपान, इंडोनेशिया, फिलीपिन्स, तैवान, दक्षिण कोरिया, झांबिया आणि व्हितनाम या देशांमध्ये महिलांना मासिक पाळीच्यादरम्यान सुट्टी दिली जाते. काही देशांमध्ये भरपगारी सुट्टी दिली जाते, तर काही देशांमध्ये अर्ध्या दिवसांचा पगार दिला जातो.
दक्षिण कोरियामध्ये 2001 मध्ये हे धोरण लागू करण्यात आले. एवढेच नाही तर कंपनीने महिलांना सुट्टी न दिल्यास दंड देखील आकारण्यात येईल, असा नियम करण्यात आला. स्पेन हा यूरोपमधील पहिला देश आहे, जेथे अशा प्रकारचा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र, मासिक पाळीदरम्यान सुट्टी हवी असल्यास महिलांना डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सादर करावे लागते.
महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी देण्याचे फायदे
मासिक पाळीबाबत जागृकता | मासिक पाळीच्या काळात सुट्टी दिल्याने याविषयाबाबतच्या चर्चेला अधिक वाव मिळेल. यामुळे मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर होण्यास देखील मदत होईल व लोकं मोकळेपणाने याबाबत बोलू लागतील. याशिवाय, मासिक पाळीबाबत असलेले चुकीचे समज दूर होऊन जागृकता तर निर्माण होईल, याशिवाय, कामाची ठिकाणी महिलांसाठी सकारात्मक वातावरण असेल. |
लैंगिक समानता | मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देणे याचा अर्थ त्यांना पुरुषांच्या तुलनेत विशेष वागणूक दिले जात आहे, असे समजणे चुकीचे आहे. पुरुष व महिलांच्या शारिरिक बदलांप्रमाणे योग्य धोरण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना कामाच्या ठिकाणी योग्य त्या सुविधा पुरवल्या जातील. |
महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष | महिलांना या काळात सुट्टी दिल्याने त्यांना त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. भारतात महिला कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी खूपच कमी सुविधा असल्याचे पाहायला मिळते. याशिवाय, महिलांकडून आरोग्याकडे विशेष लक्ष देखील दिले जात नाही. मासिक पाळीच्या काळात महिलांना पोटात, कंबरेत वेदना होतात, रक्तस्त्राव देखील जास्त होतो. अशावेळी त्रास होत असल्यास त्यांना सुट्टी मिळाल्यामुळे शारिरिक व मानसिक काळजी घेता येईल. |
उत्पादकतेत होऊ शकते वाढ | मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी दिल्यास याचा फायदा कंपनीला देखील होऊ शकतो. महिलांना त्रास होत असल्यास याचा परिणाम त्यांच्या कामावर देखील होतो. अशावेळी त्यांना जर आराम दिला व बरे वाटत असल्यास चांगल्याप्रकारे काम करू शकते. यामुळे कंपनीची उत्पादकता वाढवण्यास मदत मिळेल. |
अचानक सुट्टीचे प्रमाण होईल कमी | अनेकदा पाहायला मिळते कर्मचारी बरे वाटत नसल्यास अचानक सुट्टी घेतात. मात्र, मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिल्यास अचानक रजा घेण्याचे प्रमाण देखील कमी होईल व यामुळे कंपनीच्या उत्पादकतेवर देखील परिणाम होणार नाही. |
महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी देण्याचे तोटे
महिलांचा कामावरील सहभाग कमी | मासिक पाळीदरम्यान मिळणाऱ्या सुट्ट्यांमुळे महिलांचा कामातील सहभाग कमी होऊ शकते, असे मत अनेकजण व्यक्त करतात. एकीकडे समानतेच्या गोष्टी करताना महिलांना सुट्टी दिल्यास त्या कमी काम करत आहे, असे पुरुषांना वाटू शकते. त्यांच्या करिअरवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. |
महिलांना नोकरी मिळणार नाही | मासिक पाळीदरम्यान सुट्टी नसावी, असे मत व्यक्त करण्यामध्ये केवळ पुरुषच नाही तर महिलांचा देखील समावेश आहे. या काळात सुट्टी देऊ नये असे मत व्यक्त करताना अनेकजण कारण देतात की, यामुळे महिलांच्या कामातील संधी कमी होतील. त्यांना पुरुषांच्याबरोबरीने काम करता येणार नाही व यामुळे त्या अनेक क्षेत्रामध्ये मागे पडू शकतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक सुट्ट्या द्यावा लागतात, या कारणामुळे कंपन्या महिलांना नोकरी देणार नाही. |
लैंगिक भेदभाव | केवळ विशिष्ट व्यक्तींना अतिरिक्त सुट्टी दिल्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक भेदभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मासिक पाळीबद्दल नकारात्मकता पसरू शकते व याचा परिणाम म्हणून महिलांकडे दुय्यमतेने पाहिले जाऊ शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी त्यांना भेदभावाला सामोरे जावे लागण्याची देखील शक्यता आहे. |
इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण | विशिष्ट कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्ट्या दिल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी ठराविक कालावधीतच काम पूर्ण करण्याची गरज असते, अशा ठिकाणी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे कंपनीला देखील कर्मचारी व कामाचे व्यवस्थापन करणे अडचणीचे ठरू शकते. |
धोरणाचा चुकीचा वापर | मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देण्याचे धोरण कंपन्यांनी लागू करण्याचा निर्णय नक्कीच चांगला आहे. परंतु, काही कर्मचाऱ्यांकडून याचा चुकीच्या पद्धतीने देखील वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मासिक पाळीच्या नावाखाली कर्मचारी इतर कामासाठी सुट्टी घेऊ शकतात व याचा थेट परिणाम कंपनीच्या उत्पादकतेवर देखील होऊ शकतो. |
योग्य धोरण अवलंबण्याची गरज
मासिक पाळीबद्दल अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. अनेकजण आजही याकडे अपवित्र गोष्ट म्हणून पाहितात. चारचौघात देखील याविषयी बोलणे टाळले जाते. त्यामुळे महिला कंपनीमध्ये मासिक पाळीचे कारण सांगून सुट्टी घेणे नक्कीच अवघड आहे. यासाठी आरोग्यविषयक योग्य धोरण आणणे गरजेचे आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतून मासिक पाळीदरम्यानच्या सुट्टीसोबतच याबाबत असलेले गैरसमज देखील दूर होणे अत्यंत गरजेचे आहे.
भारतातील काही प्रमुख कंपन्यांकडून याप्रकारचे धोरण राबवले जात असले तरीही मोठा वर्ग हा आजही असंघटित क्षेत्रात काम करत असल्याचे पाहायला मिळते. अनेक लहान कंपन्यांमध्ये आठवड्याचे सातही दिवस कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. त्यामुळे अशा लहान कंपन्या व असंघटित क्षेत्रात नियमित सुट्टी मिळत नसतानाच मासिक पाळीसाठी विशेष सुट्टी देण्याचे धोरण खरचं राबवले जाईल का, हा मोठा प्रश्न आहे.
मात्र, महिलांना मासिक पाळीदरम्यान ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, ते पाहता यातूनही योग्य मार्ग काढणे गरजेचे आहे. गेल्याकाही वर्षात फ्लेक्झिबल ( Flexible work) आणि हायब्रिड वर्क मॉडेल लोकप्रिय झाले आहेत. मासिक पाळीदरम्यान महिलांना अशा पद्धतीने काम करण्याची संधी दिल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. अनेक कंपन्यांमध्ये 10 ते 12 दिवस भरपगारी वैद्यकीय रजा घेण्याची सुविधा असते. या वैद्यकीय रजांमध्ये काही दिवसांची वाढ करून महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिली जाऊ शकते. अनेक कंपन्यांमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली जाते.
परंतु, ‘ मेन्स्ट्रुअल लिव्ह ’ धोरण राबवताना मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर होतील, महिलांविषयी भेदभाव वाढणार नाही व त्यांच्या करिअरमधील संधी कमी होणार नाहीत, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.