भारतात मारुती सुझुकी जिमनी (Maruti Suzuki Jimny) लाँच झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत तब्बल 3,000 गाड्यांचं बुकिंग झालं आहे. आणि नवीन बुकिंगसाठी तीन महिन्यांचा वेटिंग पिरियड (Waiting Period) असल्याचं सुझुकी कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी जाहीर केलं आहे.
मारुती जिमनी या SUV गाडीची चर्चा मागची तीन वर्षं सुरू होती. आणि तिच्या डिझाईनबद्दलही बरंच बोललं जात होतं. त्यामुळे गाडीबद्दल उत्सुकता आधीपासूनच होती. त्याचाही फायदा जिमनी गाडीला झाला आहे. सध्या मारुती सुझुकी कंपनीने 1.5 पेट्रोल इंजिनमध्ये ही गाडी देऊ केली आहे. डिझेल प्रकारात ही गाडी न आणण्याचाही निर्णय कंपनीने घेतला आहे. जिमनी गाडीची निश्चित किंमत किती असेल हे ही अजून कंपनीने जाहीर केलेलं नाही. पण, अंदाजे ही किंमत 10 ते 12.5 लाख रुपयांच्या दरम्यान असेल असं बोललं जात आहे.
मारुती जिमनी वि. महिंद्रा थार
मारुती जिमनीच्या डिझाईनमुळे तिची तुलना सतत महिंद्रा थारशी होतेय. थार गाडी सध्या 9.9 लाख ते 16.99 लाख दरम्यान उपलब्ध आहे. दोन्ही गाड्यांचा लुक दणकट आणि रफ ड्रायव्हिंगसाठी योग्य असा आहे.
श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, ‘महिंद्रा थार ही जिमनीसाठी स्पर्धा आहे. आणि किंमत ठरवतानाही जिमनीला थारशी स्पर्धा करणारी किंमत ठरवायची आहे. पण, आता मिळालेल्या ओपनिंगमुळे आम्ही खूश आहोत. पहिल्या महिन्यातलं जिमनीचं बुकिंग 10,000 युनिट्सच्या घरात असेल, असा आमचा अंदाज आहे.’
कंपनीला अपेक्षा आहे त्याप्रमाणे बुकिंग झालं, तर जिमनीसाठीचं वेटिंग आणखी सहा महिन्यांवर जाऊ शकेल. कारण, सध्या मारुती सुझुकी कंपनी आपल्या गुरगावच्या कारखान्यातून गाड्यांचं उत्पादन करत आहे. आणि तिथे मारुतीच्या सगळ्याच गाड्यांचं उत्पादन मागणीच्या तुलनेत रखडलेलं आहे.
मारुती गाड्यांची मागणी वाढली
मारुती सुझुकी गाड्यांचा पुरवठा सध्या देशांत रखडलेला आहे. आणि जानेवारी 2023 मध्ये मारुती कंपनीला एकूण 3,66,000 गाड्यांचा पुरवठा करायचा आहे. त्यात इर्टिगा गाड्या 91,000, ब्रेझा 71,000, ग्रँड व्हिटारा 50,000 युनिट्स अजून कंपनीला पुरवायची आहेत.
तर अलीकडे लाँच झालेल्या जिमनी आणि फ्राँक्स या दोन SUV गाड्यांसाठीही कंपनीला नवीन ऑर्डर येत आहेत. फ्रँक्स गाडीचं बुकिंगही 750 च्या आसपास आलं आहे. त्यामुळे मारुती सुझुकी कंपनीला कार उत्पादनात मोठी वाढ करावी लागणार आहे.
जिमनी आणि फ्राँक्स या दोन्ही गाड्यांचं मार्केटिंग नेक्सा या मारुती कंपनीच्या रिटेल शोरुममध्ये केलं जाणार आहे.