Maruti Invicto Launch: मारुती सुझुकीने भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार लाँच केली. इन्व्हिक्टो हे मॉडेल आज दिमाखदार सोहळ्यात लाँच केले. या प्रिमियम सेगमेंटमधील मल्टी युटिलिटी व्हेइकल (MUV) कारची किंमत 24.79 ते 28.42 लाखांदरम्यान आहे.
ही कार टोयोटा इनोवा हायक्रॉस या गाडीसारखी दिसते. यामागे कारणही तसेच आहे. मारुतीची इन्व्हिक्टो गाडी टोयोटा कंपनीने तयार केली असून फक्त मारुती सुझुकीच्या ब्रँडनेमने बाजारात आली आहे. त्यास “Badge engineering” असे म्हणतात.
मारुती सुझुकी आणि टायोटा किर्लोस्कर या दोन्ही कंपन्यांमध्ये याबाबत करार झाला आहे. त्यानुसार इन्व्हिक्टो ही गाडी टोयोटा कंपनी तयार करून देईल. त्यात थोडेसे बदल करून मारुती सुझुकीच्या नावाने बाजारात विकली जाईल. मारुती सुझुकीची ही भारतातील सर्वात महागडी गाडी आहे. तसेच तीन सीटर लाइन सेगमेंटमधील ही प्रिमियम कार आहे. मारुतीची इर्टिगा या सेगमेंटमधील बजेट कार आहे.
भविष्यात 20 लाखांपुढील प्रिमियम कार बाजारात आणण्याचे मारुतीचे उद्दिष्ट आहे. इन्व्हिक्टो कार मारुतीच्या नेक्सा शोरुममधून विक्री केली जाईल. इव्हिक्टो गाडीत सात प्रवासी बसू शकतील. (Maruti Invicto Launched) 23 किलोमीटर प्रति लिटर अॅव्हरेजचा दावा कंपनीने केला आहे. ही गाडी मल्टी युटिलिटी व्हेइकल सेगमेंटमधील आहे. petrol-hybrid powertrain मॉडेलसाठी बुकिंग सुरू झाली आहे.
या गाडीला 2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनमधून 184 bhp पावर आणि 188 Nm टॉर्क जनरेट होतो. Innova Hycross आणि Invicto गाडीमध्ये फार बदल नाही. इन्व्हिक्टो गाडीच्या डिझाइमध्ये बाहेरून थोडे बदल केले आहेत. इतर सर्व गोष्टी दोन्ही कारमध्ये सारख्या आहेत. क्लायमेट कंट्रोल, पावर्ड ड्रायव्हर सीट, पॅनोरमिक सनरुफ, अॅपल कारप्लेसह 10 इंच इन्फोटेन्मेंट आणि अँड्रॉइड ऑटो देण्यात आले आहे.