Market Opening Bell: आज (बुधवार) भारतीय भांडवली बाजार संथपणे सुरू झाला मात्र, काही वेळातच उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 37 अंकांनी वाढून 17,759 अंकांवर ट्रेड करत आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक बाजार सुरू होताच 33 अंकांनी खाली आला. मात्र, काही वेळातच 117 अंकांनी वधारला. बँक निफ्टीही बाजार सुरू होताच खाली आला होता. मात्र, थोड्या वेळात 50 पेक्षा जास्त अंकांनी वधारला.
सेन्सेक्स निर्देशांतील टाटा स्टील, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँके, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम कंपनीचे शेअर्स वधारले. तर इंडसंड बँक, नेस्ले, कोटक बँक, एचसीएल आणि टेक महिंद्राचे शेअर्स खाली आले. डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी वाढून 82.05 झाला आहे.
टीसीएस कंपनीच्या शेअर्सचा भाव स्थिर आहे. टीसीएस तिमाहीच्या निकालात नफा नोंदवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, निकाल येईपर्यंत शेअर्सचे भाव स्थिर दिसून येत आहे. अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्स 2.5% नी वाढले. कोल वॉशरी संबंधित कंपनीचे सर्व शेअर्स खरेदी केल्यानंतर ही वाढ दिसून आली. Pelma Collieries Ltd ही कंपनी अदानी एंटरप्राइजेसने सर्व समभाग खरेदी करून विकत घेतली.
आजपासून कॉर्पोरेट कंपन्या चौथ्या (Q4) तिमाहीची आकडेवारी जाहीर करणार आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. भांडवली बाजारात मार्च महिन्यापासून स्थिरता आणि आत्मविश्वास दिसून येत आहे. या काळात निफ्टी 4.5% नी वाढला आहे. परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवल्याने निफ्टी आणि सेन्सेक्स वधारण्यास मदत झाली. केंद्र सरकार तिमाहीतील महागाईची आकडेवारीही जाहीर करणार आहे. या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.