Market Closing Bell: भारतीय भांडवली बाजारात आज (सोमवार) जास्त मोठ्या घडामोडी घडल्या नाहीत. दिवसभर बाजार स्थिर राहिला. मात्र, निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत होते. दिवसाअखेर किंचित वाढीसह शेअर बाजार बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 24 अंकांनी वाढून 17624 वर स्थिरावला. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 59,846 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्सने फक्त 13 अंकांची वाढ नोंदवली.
बँक निफ्टी 206 अंकांनी खाली येऊन 40,834 वर स्थिरावला. मागील आठवड्यात बँक निफ्टीने चांगली उसळी घेतली होती. जॅगवार लँड रोव्हर विक्री चांगली झाल्याने टाटा मोटर्सच्या शेअर्सने आज 8% उसळी घेतली.
कोणते शेअर्स चर्चेत राहिले?
टाटा मोटर्स, ओनजीसी, अदानी एंटरप्राइजेस, ग्रासिम आणि विप्रो या कंपन्यांचे शेअर्सने उसळी घेतली. तर बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशिएन पेंट्स, टाटा कन्झ्युमर आणि इंडसंड बँकेच्या शेअर्सचे भाव खाली आले.
कॉर्पोरेट कंपन्यांचे निकाल जाहीर होणार
बुधवारपासून (12 एप्रिल) चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे आज उद्या शेअर बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट्स कंपन्यांनी चांगल्या नफ्याची नोंद केली तर बाजार उसळी घेऊ शकतो. तसेच तिमाही महागाईची आकडेवारीही लवकरच जाहीर होईल. अमेरिकेचे सरकारही तिमाहीची आकडेवारी चालू आठवड्यात जाहीर करणार आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येईल. एप्रिल महिन्यामध्ये भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात मोठ्या घडामोडी होतील, असे जाणकारांचे मत आहे.
भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत
जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतीय भांडवली बाजार सुस्थितीत आहे. मात्र, तरीही सावध पावले उचलणे गरजेचे आहे. जगभरात महागाई वाढत असून बड्या अर्थव्यवस्था मंदीत सापडलेल्या आहेत. त्यामुळे प्रमुख बँकांकडून व्याजदर वाढ करण्यात येत आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये बँकिंग क्षेत्राला फटका बसला. अनेक बँका बंद झाल्या मात्र, त्याचा भारतावर परिणाम झाला नाही. तेल उत्पादक देशांनी इंधनाचे उत्पादन कमी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीही वाढत आहेत. याचा परिणामही जागतिक अर्थकारणावर पडत आहे.