घरोघरी जाऊन सीफूड विकणारा न्यूयॉर्कमधील एक सामान्य मुलगा 200 मिलिअन डॉलर्सचा घोटाळा करतो. ते ही जगातल्या सर्वांत मोठ्या ‘द वॉल स्ट्रीट’ शेअर मार्केटमध्ये (The Wall Street Share Market). तोच मुलगा पुढे जाऊन ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ (The Wolf of Wall Street) म्हणून ओळखला जातो. या अतिसामान्य मुलाचं नाव आहे, जॉर्डन रॉस बेलफोर्ट (Jordan Ross Belfort).
जॉर्डन रॉस बेलफोर्ट (Jordan Ross Belfort) हे एक अमेरिकन उद्योजक, वक्ते, लेखक, माजी स्टॉक ब्रोकर आणि अमेरिकेतील स्टॉक मार्केटमध्ये घोटाळा करणारा आर्थिक गुन्हेगार होता. आजच्या मार्केट बुल्स या भागात आपण जाणून घेणार आहोत, वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट जॉर्डन रॉस बेलफोर्ट (Jordan Ross Belfort, Wolf of the Wall Street) यांची आयुष्यगाथा!
1999 मध्ये बेलफोर्ट यांना अनेक प्रकारच्या आर्थिक घोटाळ्यांमुळे तुरूंगात जावे लागले होते. 2 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगत असताना दोन पुस्तके लिहिली होती. त्यातील पहिलं पुस्तक म्हणजे ‘द वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट’ (The Wolf of Wall Street) जे 2013 मध्ये प्रसिद्ध झाले होते व त्यावर आधारित जानेवारी 2014 मध्ये सिनेमा (The Wolf of the Street) देखील प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये हॉलिवूडचा अॅक्टर लिओनार्डो डिकॅप्रिओ (Actor Leonardo DiCaprio) यांनी बेलफोर्टची भूमिका साकारली होती. त्यांनी लिहिलेलं दुसरं पुस्तक ‘वे ऑफ द वुल्फ’ (Way of the Wolf) जे 2017 मध्ये प्रकाशित झालं होतं. बेलफोर्ट यांच्यावर या पुस्तकांवरून टीका करण्यात आली होती. त्यांनी तुरूंगातील शिक्षा पूर्ण केल्यानंतर स्वत:ला प्रेरक वक्ता म्हणून लोकांसमोर सादर करण्यास सुरूवात केली. ते आपल्या व्याख्यानांमधून प्रामुख्याने वॉल स्ट्रीटमधील महत्त्वाकांक्षी उत्कटता आणि लालसा याबद्दल सांगायचे.
बेलफोर्ट याचा जीवनप्रवास आणि करिअर (Belfort's Life and Career)
जॉर्डन बेलफोर्ट यांचा जन्म 1962 मध्ये न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे झाला होता. पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे, त्यांनी व त्यांच्या मित्राने सुट्ट्यांमध्ये काम करून जवळजवळ 20 हजार डॉलर्स ($ 20,000) जमा केले होते. सुरूवातीच्या काळात बेलफोर्ट यांचे ध्येय स्टॉक मार्केट हे नसून डेंटिस्ट होण्याचे होते. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी प्रिन्सिपलकडून डेंटिस्ट हे पैसा मिळवून देणारं क्षेत्र नाही, असं ऐकताच बेलफोर्ट यांनी कॉलेजला रामराम ठोकला होता. कॉलेज सोडल्यानंतर ते घरोघरी जाऊन सी-फूड (Sea-Food) विकू लागले. या उद्योगात त्यांना हळुहळू यश मिळू लागले. तसे त्यांनी या उद्योगाच्या वाढीसाठी आणि नियोजनासाठी छोटी टीम तयार केली. जी प्रत्येक आठवड्याला 2 टनपर्यंत सी-फूड विकण्याची क्षमता निर्माण करेल. पण वयाच्या 25 व्या वर्षी बेलफोर्ट यांचा हा उद्योग अयशस्वी ठरला आणि ते दिवाळखोरीत (Bankrupt) गेले. याच काळात त्यांना स्टॉक ब्रोकिंगमध्ये (Stock broking) आवड निर्माण झाली. याचा अनुभव घेत घेत त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी स्ट्रॅटन ओकमॉन्ट (Stratton Oakmont) या ओव्हर-द-काऊंटर ब्रोकरेज हाऊसची स्थापना केली. या कंपनीने काही कालावधीत यशाची उत्तुंग पायरी गाठली होती.
स्ट्रॅटन ओकमॉन्ट आणि घोटाळे (Stratton Oakmont and Scams)
स्ट्रॅटन ओकमॉन्ट या कंपनीचे संस्थापक आणि सर्वांत मोठ्या पदावर असताना त्यांनी बेकायदेशी व्यवहारांना सुरूवात केली. बेलफोर्ट व त्यांच्या स्ट्रॅटन ओकमॉँट (Stratton Oakmont) या कंपनीने अनेक घोटाळ्यामध्ये सहभाग घेतला. त्यांच्या कंपनीतील त्यांची टीम गुंतवणूकदारांवर दबाव आणून रिस्क जास्त असणाऱ्या असेट्समध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत. एकेकाळी कंपनीमध्ये जवळजवळ 1 हजार स्टॉक ब्रोकर्स काम करत होते. जे 1 बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची देखरेख करत होते. बेलफोर्ट व त्यांच्या कंपनीला अनेकवेळा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागले होते. 1999 मध्ये बेलफोर्ट हे पंप अण्ड डंप घोटाळ्यात दोषी ठरले. ज्यामध्ये त्यांनी जवळजवळ 200 मिलियन डॉलर्सचा घोटाळा केल्याचे सांगितले जाते. त्यांना यासाठी 4 वर्ष तुरूंगाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यातील 2 वर्षे त्यांनी तुरूंगात काढली.
बेलफोर्ट याचे जेलनंतरचे आयुष्य (Belfort's life after Punishment)
जेलमधून सुटल्यानंतर बेलफोर्ट यांना त्यांच्या उत्पन्नातील 50 टक्के उत्पन्न हे फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना परत करावे लागले. तुरूंगातील शिक्षा पूर्ण केल्यानंतर बेलफोर्ट यांनी एका नवीन आयुष्याला सुरूवात केली. ते यशस्वी प्रेरक वक्ते म्हणून अनेकांना मार्गदर्शन करू लागले. त्यांच्या मते स्ट्रॅटन ओकमॉँटमध्ये असताना त्यांनी केलेल्या अनेक चुका अमली पदार्थांच्या व्यसनाच्या प्रभावाखाली केल्या होत्या. त्याचा त्यांना नंतर खूप पश्चाताप झाला.
जॉर्डन बेलफोर्ट यांनी मार्केटमधील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडविले होते. त्यांनी मार्केटमधील काही लूपहोलचा वापर करत 200 मिलियन डॉलर्सचा घोटाळा केला. यावरून मार्केटमधील असे लूपहोल किती हानिकारक ठरू शकतात, हे लक्षात येते. बेलफोर्ट यांनी केलेले घोटाळे बाजूला ठेवले असता त्यांचे शेअर मार्केटमधील ज्ञान कौतुकास्पद होते. शेअर मार्केटमधील मोठ्या नावांमध्ये बेलफोर्ट यांचे नाव घेतले जात होते.
Image Source:pressportal.ch & Screenplaynotes.blogspot.com