वस्तु आणि सेवा कर (GST) संकलनाच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीमध्ये सर्वाधिक भर टाकण्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जास्त आहे. मात्र, मागील 5 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याने जीएसटीच्या घोटाळ्यातील आकडेवारीमध्ये देखील अव्वल स्थान पटकावल्याची आकडेवारी समोर आली आहे. जीएसटीची बनावट बिले सादर करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र नोंद झाली आहेत. याबाबत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर 24 जुलै रोजी अर्थ मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
5021 जीएसटीची (GST)बनावट बिले
जीएसटीच्या बनावट बिलाच्या घोटाळ्याप्रकरणी एकूण 26,254 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा वाटा हा 20 टक्के इतका आहे. मागील 5 वर्षाच्या कालावधीत एकट्या महाराष्ट्रातून जीएसटीच्या (GST)बनावट बिल प्रकरणी तब्बल 5021 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 2215 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच एकूण 272 जणांना या बनावट जीएसटी बिलांच्या घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी विभागाकडून संसदेत याबाबतची माहिती सादर करण्यात आली आहे.
अशी केली जाते फसवणूक
बनावट जीएसटी बिले सादर करणारे व्यावसायिक कोणत्याही वस्तू अथवा सेवांचा पुरवठा न करता त्या वस्तु किंवा सेवेची बनावट जीएसटी बिलं तयार केली जातात. बनावट बिल सादर करून इनपुट टॅक्स क्रेडिट (Input Tax Credit) चे फसवे दावे केले जातात. या माध्यमातून सरकारची दिशाभूल केली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील बनावट बिलांच्या प्रकरणाची आकडेवारी ही सर्वाधिक आढळून आली आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर हरियाणा आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.