परदेशी गुंतवणूकदारांसाठी मागील 22 वर्षात महाराष्ट्रच भारतातील पहिल्या पसंतीचे राज्य असल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2000 पासून 2022 या 22 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणुकीतून 1088502 कोटींची गुंतवणूक झाली आहे. येत्या सोमवारी 1 मे 2023 रोजी महाराष्ट्राच्या निर्मितीला 63 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून गुजरात किंवा कर्नाटकला उद्योग जातात याबाबत नेहमीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात. राज्यात सत्तांतरानंतर मागील नऊ महिन्यापासून सरकार चालवताना सत्ताधाऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. मात्र असे असले तरी राज्यात गुंतवणूक करण्याचे परदेशी कंपन्यांचे स्वारस्य कायम आहे. थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे.
मार्च 2023 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्यात झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार एफडीआयमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. आर्थिक पाहणीनुसार मागील तीन वर्षात महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणुकीतून (FDI) एकूण 357393 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहेत. मागील तीन वर्षात राज्यात एफडीआयची 780 प्रकरणे मंजूर करुन गुंतवणुकीला चालना देण्यात आली.
वर्ष 2022-23 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 62425 कोटींची एफडीआय झाली. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 41678 कोटी आणि गुजरातमध्ये 26866 कोटींची थेट परकीय गुंतवणूक झाली. याच काळात तामिळनाडू आणि तेलंगणा या दोन राज्यात अनुक्रमे 12272 आणि 7578 कोटींची गुंतवणूक झाल्याचे दिसून आले.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पिछाडीवर गेला होता. वर्ष 2021-22 मध्ये राज्यात 114964 कोटींची थेट परकीय गुंतवणूक झाली होती. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर राज्यात परकी गुंतवणुकीचा ओघ वाढला.
मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 धोरणाअंतर्गत सरकारने जून 2020 पासून डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात 274202 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. राज्य सरकारने 124 गुंतवणूक करार केले आहे. या गुंतवणुकीने राज्यात जवळपास 4 लाख 27 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. गेल्या वर्षी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीचे 119 करार करण्यात आले. यातून राज्यात 1.37 लाख कोटींची गुंतवणूक होणार असून एक लाख रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.
मागील 22 वर्षात महाराष्ट्राची FDI मध्ये आगेकूच
परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यात महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या सवलती देऊ केल्या आहेत. सरकारने औद्योगिक धोरण व्यापक केले असून उद्योगांना एक खिडकी योजनांमध्ये विविध परवाने दिले जात आहेत. याचा परिणाम मागील 22 वर्षात राज्यात झालेल्या गुंतवणुकीवर दिसून आले आहे. एप्रिल 2000 पासून सप्टेंबर 2022 पर्यंत सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारे महाराष्ट्र देशातले अव्वल राज्य ठरले आहे. या काळात महाराष्ट्रात एकूण 1088502 कोटींची एफडीआय झाली. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक असून मागील 22 वर्षात कर्नाटकात 551044 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गुजरातमध्ये याच कालावधीत 396990 कोटींची परकीय गुंतवणूक झाली.