गणेशोत्सव मंडळासाठी राज्य शासनाकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यापूर्वी प्रतिवर्षी धर्मदाय कार्यालय, पोलीस प्रशासन यांच्याकडून परवाना घ्यावा लागत होता. मात्र, शासनाने आता उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षासाठी एकदाच परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नाममात्र 100 रुपये भाडे आकारणी करून शासकीय जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला आहे.
या मंडळांना मिळणार परवाना
गणेशोत्सव म्हटले विविध परवानग्या आणि उत्सव साजरा करण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली जाते. दरम्यान, शासनाने आता पुढील पाच वर्षाकरिता मंडळांना एकदाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मागील दहा वर्षांत ज्या मंडळांनी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळले आहेत. कायद्याचे पालन केले आहे. तसेच ज्या मंडळाबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नाही, अशा उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना एकदाच पुढील 5 वर्षाचा परवाना दिला जाणार आहे. या संदर्भात नगर विकास विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
100 रुपयांत जागा
5 वर्षासाठी परवाना देण्याच्या निर्णयाबरोबरच शासनाने आता गणेशोत्व साजरा करण्यासाठी मंडळांना नाममात्र दराने शासकीय जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळांना यापुढे महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेवर केवळ 100 रुपये भाडे देऊन गणेशोत्सव साजरा करता येणार आहे.
यंदापासून निर्णय लागू-
शासनाचा पुढील 5 वर्षासाठी उत्सवाचा परवाना देण्याचा निर्णय हा या गणेशोत्सवापासूनच लागू होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि नगरपंचायती यांना मंडळांना पुढील 5 वर्षांची परवानगी देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसेच सार्वजिनक मंडळांना स्थानिक पोलीस स्टेशनकडून उत्सवासाठी ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतर ऑनलाईन माध्यमातून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे.