Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Longest Train in India : Vivek Express ही 74 तासांची ट्रेन आता आठवड्यातून 4 वेळा

Vivek Express

Image Source : www.morungexpress.com

Longest Train in India : Vivek Express ही देशातली सगळ्यात लांबचा प्रवास करणारी ट्रेन आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या चेन्नई एक्सप्रेसमध्ये याच ट्रेनचा मार्ग दाखवण्यात आला होता. अशी ही देशातली पारंपरिक ट्रेन आता आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. आणखी काय बदल झालेत विवेक एक्सप्रेसमध्ये जाणून घेऊया

भारतातला सगळ्यात लांबचा रेल्वे मार्ग (Longest Railway in India) माहीत आहे? नॉर्दर्न फ्रंटिअर रेल्वेतर्फे (Northern Frontier Railway ) चालवण्यात येणारा दिब्रुगड (Dibrugarh) ते कन्याकुमारी (Kanyakumari) हा 4,189 किलोमीटर लांब रेल्वे मार्ग पार करायला ट्रेनला तब्बल 74 तास 35 मिनिटं लागतात. नोव्हेंबर 2011 मध्ये हा मार्ग सुरू करण्यात आला होता. आणि लगेचच 2013 मध्ये आलेल्या चेन्नई एक्सप्रेस (Chennai Express) या बॉलिवूडपटात आपल्याला या मार्गाचं दर्शनही घडलं होतं. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दिपिका पदुकोण (Dipika Padukone) ज्या ट्रेनने चेन्नईला निघालेले असतात ती चेन्नई एक्सप्रेस असली तरी मार्ग हाच होता.    

आसाम ते कन्याकुमारीची राज्यं या ट्रेनने जोडली गेली आहेत. अशी ही ट्रेन इतके दिवस आठवड्यातून दोन दिवस चालत होती. आता तिच्या फेऱ्या वाढवून आठवड्यातून चार दिवस करण्यात आल्या आहेत . हा बदल मे 2023 पासून होणार आहे.   

प्रवास जवळ जवळ तीन दिवसांचा असला तरी अशा प्रवासात मैत्रीही होते हे चेन्नई एक्स्प्रेसनं आपल्याला दाखवून दिलं आहे. आणि मूळातच रेल्वेच्या सोयीबरोबरच पर्यटनासाठीही या रेल्वेमार्गाचा उपयोग झाला आहे. कारण, सुरू झाल्यापासून हा रेल्वेतला सगळ्यात व्यस्त मार्ग आहे.    

देशातला सगळ्यात मोठा रेल्वे मार्ग कसा आहे?   

आसाम ते तामिळनाडू असा प्रवास करताना ही ट्रेन वाटेत 59 थांबे घेते. आणि बिहार, नागालँड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडू अशा नऊ राज्यांतून जाते. दिब्रुगडहून कन्याकुमारीला जाताना या गाडीचा नंबर आहे  15906. आणि शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातून दोनदा ही रेल्वे तामिळनाडूच्या दिशेनं जात होती. आता मे 2023 पासून ही रेल्वे मंगळवार आणि गुरुवारीही धावेल.    

तर परतीच्या प्रवासात, कन्याकुमारीहून दिब्रुगडला येताना ट्रेनचा क्रमांक आहे 15905. सध्या गुरुवार आणि रविवारी ही रेल्वे कन्याकुमारीहून निघत होती. आता हे दिवस बदलून बुधवार, गुरुवार, शनिवार आणि सोमवार असे होतील.    

विवेक एक्सप्रेसचे तिकीट दर   

या एक्सप्रेसला 22 डबे आहेत. ते तसेच राहतील. यात 1 AC टू-टिअर, 4 AC थ्री टिअर, 11 स्लीपर कोच आणि 3 जनरल डबे आहेत. याशिवाय एक पँट्री कार आणि दोन ऊर्जाकेंद्र आणि सामान ठेवण्यासाठीचे डबे आहेत. एसीच्या टू-टिअर साठीचं तिकीट 4,450 रुपये तर थ्री टिअरचं भाडं 3,015 रुपये इतकं आहे. तेच स्लीपर कोचसाठीचं भाडं आहे 1,185 रुपये आहे.    

भारतात 70 तासांपेक्षा जास्त प्रवासाचा वेळ असलेल्या आणखी दोन एक्सप्रेस गाड्या आहेत. यातली दुसऱ्या क्रमांकाची एक्सप्रेस ट्रेन आहे सिलचर ते थीरुअनंतपुरम दरम्यान धावणारी ट्रेन. 3,917 किलोमीटरचा हा मार्ग ट्रेन 72 तास 50 मिनिटांत पूर्ण करते.   

तर वैष्णोदेवी कटरा ते कन्याकुमारी जोडणारा रेल्वेमार्ग 3,790 किलोमीटरचा आहे. आणि तो प्रवास 72 तास 50 मिनिटांत पूर्ण होतो.