दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढत असल्याने आधीच सामान्य माणूस हैराण आहे. त्यात 3 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दर वाढवल्यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महागले. परिणामी बँकांनी सर्व प्रकारच्या कर्जावर व्याजदर वाढवून सामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे.
आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही कर्जे महाग करण्यास सुरुवात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांनी त्यांच्या एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट्समध्ये ( EBLR -External Benchmark Lending Rate) वाढ केली आहे. त्यामुळे या बँकांची गृह, वाहन कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. यामुळे जुने कर्जदार आणि नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांवर कर्जाच्या ईएमआयचा बोजा वाढणार आहे. काही बँकांनी आपल्या मुदत ठेवीच्या योजनेवर व्याजदर वाढवून काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणत्या बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनेही कर्ज महाग करण्याचे संकेत दिले आहेत. बँकेच्या 13 मे पूर्वी होणाऱ्या बैठकीत दर वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. बँक व्याजदरात 0.40 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. एसबीआयच्या 13 मे रोजी होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. वाढलेले दर 1 जुलैपासून लागू होतील.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
PNB बँकेने ग्राहकांसाठी 1 जून 2022 पासून 6.50 टक्क्यांवरून 6.90 टक्के करण्यात आला आहे. नवीन ग्राहकांसाठी सुधारित व्याजदर 7 मे 2022 पासून लागू करण्यात आला आहे..
बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
बँक ऑफ महाराष्ट्राने आपला सर्व-कालावधीचा व्याजदर 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. हे नवीन दर 7 मे 2022 पासून लागू झाले आहेत.
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनेही एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट्स 0.40 टक्क्याने वाढवला आहे. बँकेचा हा दर आता 8.10 टक्के झाला आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा महाग कर्ज मिळणार आहे. नवीन दर 5 मे 2022 पासून लागू झाले आहेत.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
एचडीएफसी बँकेने त्यांच्या कर्जदरात 0.30 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे बँकेच्या विद्यमान आणि नवीन दोन्ही ग्राहकांसाठी कर्ज महाग होईल. 9 मे पासून ही व्याजदर वाढ लागू करण्यात आली आहे.
Image Source - https://www.orissapost.com/ready-for-bold-moves/