आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कित्येक जण कर्ज काढण्याचा पर्याय निवडतात. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थिती कर्ज काढायची गरज भासत अलेस तर तुम्ही वैयक्तिक कर्ज काढणे फायद्याचे ठरते याशिवाय जर तुम्ही जीवन विमा पॉलिसी (Insurance Policy) काढली असेल तर या पॉलिसीवर देखील तुम्हाला कर्ज काढता (Loan Against Insurance) येते. होय विमा पॉलिसीवर तुम्हाला कर्ज उपलब्ध होते आणि तेही कमी व्याज दरात तुम्हाला कर्ज उपलब्ध होते. विमा पॉलिसीवर कशा प्रकारे कर्ज काढता येते, त्याचे फायदे आणि अर्जाची प्रक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊयात
कर्जासाठी काय आहेत निकष?
तुम्हाला जर तुमच्या विमा पॉलिसीवर कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी काही निकष पूर्ण असणे गरजेचे आहे. सर्व प्रथम म्हणजे तुमच्या विमा पॉलिसी सरेंडर व्हॅल्यु (surrender value) मिळण्यास पात्र असावी. पॉलिसी काढून किमान 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही सरेंडर मूल्य मिळवण्यास पात्र ठरता. तुमच्या विमा पॉलिसीच्या सरेंडर मुल्याच्या किमतीवरच तुम्हाला कर्जाची रक्कम प्राप्त होते. अर्जदारास पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या 80 ते 90% च कर्ज मिळू शकते. तुमच्या पॉलिसीचा कालवधी जितका आहे. त्या कालवधीपर्यंतच तुम्हाला कर्ज फेड करावी लागेल. तसेच तुम्ही कर्जाच्या हप्त्यांची नियमित परतफेड करणे गरजेचे आहे. कर्जाची परतफेड नाही केल्यास तुमची पॉलिसी बंद होऊ शकते.
फायदे काय आहेत?
विमा पॉलिसी तारण ठेवून काढलेल्या कर्जाचा मुख्य फायदा म्हणजे हे कर्ज तुम्हाला कमी व्याजदरात उपलब्ध होते. विमा कंपन्याकडून तुम्हाला पॉलिसी कर्जावर कमी व्याजदर आकारला जातो. जो इतर वित्तीय संस्थाकडून कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या तुलनेत कमी असू शकतो. जसे की, LIC च्या जीवन विमा पॉलिसींवरील कर्जाचा व्याजदर हा 9 ते 9.50 टक्केच्या दरम्यान आकारला जातो. तसेच अशा प्रकारच्या कर्जासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असला तरी तुम्हाला कर्ज मिळण्यासाठी अडचण निर्माण होत नाही.तसेच तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला कमी वेळेत कर्जाची रक्कम उपलब्ध होते.
कर्जाची अर्ज प्रक्रिया
विमा पॉलिसीवर कर्ज काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अथवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. तुमच्या विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन देखील तुम्ही कर्जासाठी अर्ज दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक,पॅन कार्ड, ओळखपत्र, उत्पन्नाचा पुरावा यासह विमा कंपनीस आवश्यक असेलली कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. तुमचा विमा पॉलिसीवरील कर्जाचा अर्ज मंजुर झाल्यानंतर तुमच्या खात्यात रक्कम जमा केली जाते.