एलआयसी (Life Insurance Corporation) ही देशातली सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी आहे. नुकतंच कंपनीचे मार्चच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. या 90 दिवसांमध्ये कंपनीला प्रत्येक सेकंदाला सुमारे 17 हजार रुपयांचा प्रचंड असा नफा झालाय. मागच्या वर्षीच्या याच कालावधीचा विचार केल्यास हा नफा तब्बल 5 पटीनं वाढल्याचं दिसून आलंय. दुसरीकडे, कंपनीच्या महसुलातदेखील (Revenue) घट झालीय. कंपनीच्या तिमाही निकालांमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे आकडे दिसले, याविषयी सविस्तर पाहूया...
Table of contents [Show]
नफा वाढला, महसूल कमी झाला
आर्थिक वर्ष 2022-23च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा पाच पटीनं वाढल्याचं या आकडेवारीत दिसतंय. हा नफा तब्बल 13,191 कोटी रुपयांवर पोहोचलाय. मागची आकडेवारी पाहिल्यावर हा फरक दिसून येतो. मागच्या आर्थिक वर्षात याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 2,409 कोटी रुपये इतका होता. दुसरीकडे महसूलही कमी झालाय. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल 2,01,022 कोटी रुपयांवर आलाय. मागच्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो 2,15,487 कोटी रुपयांपर्यंत गेला होता. म्हणजेच नफा जास्त आणि महसुलात घट झाल्याचं दिसून येतंय.
LIC reports over 5-fold jump in consolidated net profit to Rs 13,191 crore in March 2023 quarter: Regulatory filing
— Press Trust of India (@PTI_News) May 24, 2023
प्रीमिअम कमाईत घट
संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करायचा झाल्यास, एलआयसीचा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास 9 पटीनं नफा वाढून 35,997 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा केवळ 4,125 कोटी रुपये इतका होता. दुसरीकडे, प्रीमियमच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईत घट झाल्याचं दिसतंय. आकडेवारीवर नजर टाकल्यास, मार्च 2022मध्ये कंपनीची प्रीमियम कमाई 14,663 कोटी रुपये इतकी होती. मार्च 2023मध्ये तीच 12,852 कोटी रुपयांवर आलीय.
शेअर्समध्ये तेजी
कंपनी सध्या पाचपट नफ्यात आहे. अशात कंपनीच्या शेअर्समध्येही तेजी दिसून येतेय. आकडेवारी पाहिल्यास सध्या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्क्यांनी म्हणजेच 3.60 रुपयांच्या किंचित वाढीसह 593.55 रुपयांवर बंद झाले. तसं तर ट्रेडिंग सत्राच्या दरम्यान कंपनीचा शेअर 604 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, या आठवड्यातल्या तीन दिवसांत एलआयसीच्या शेअर्समध्ये जवळपास 5 टक्क्यांनी वाढ झालीय.
वर्षभरापूर्वीच बाजारात आला आयपीओ
प्रचंड फायद्यात असलेल्या एलआयसीचा आयपीओ मागच्या वर्षी बाजारात आला खरा. मात्र गुंतवणूकदारांना या आयपीओनं अक्षरश: रडवल्याचंच पाहायला मिळालं. खरं तर आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ, असा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र शेअरमध्ये घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान झालं. हा आकडा 2.5 लाख कोटी इतका प्रचंड मोठा आहे. सरकारनं एलआयसीतल्या जवळपास 3.5 टक्के शेअर्सची विक्री केली होती. त्या माध्यमातून 21,000 कोटी रुपये उभारले होते. आताच्या परिस्थितीवर नजर टाकल्यास वर्षभरात एलआयसीचा शेअर 40 टक्क्यानं घसरलाय. मात्र कंपनीनं याबाबत फारशी चांगली कामगिरी केली नाही.