Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC IPO: भारतातील सर्वात मोठा IPO ठरला फ्लॉप! 'एलआयसी'मुळे गुंतवणूकदारांचे 2.5 लाख कोटींचे नुकसान

LIC IPO

LIC IPO: शेअर मार्केटच्या इतिहासात आजवरचा सर्वात मोठा आयपीओ असा गाजावाजा करत लिस्ट झालेल्या एलआयसीने सामान्य गुंतवणूकदारांना अक्षरश:रडकुंडीला आणले आहे. वर्षभरात एलआयसीच्या शेअरमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीने गुंतवणूकदारांचे किमान 2.5 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

शेअर मार्केटच्या इतिहासात आजवरचा सर्वात मोठा आयपीओ असा गाजावाजा करत लिस्ट झालेल्या एलआयसीने सामान्य गुंतवणूकदारांना अक्षरश: रडकुंडीला आणले आहे. वर्षभरात एलआयसीच्या शेअरमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीने गुंतवणूकदारांचे किमान 2.5 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 17 मे 2022 रोजी एलआयसी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला होता. केंद्र सरकारने एलआयसीमधील 3.5% शेअर्सची विक्री करुन जवळपास 21000 कोटी उभारले होते. भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रॅंड असल्याने एलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिला होता. मात्र लिस्टींगच्या दिवशी एलआयसी इश्यू प्राईसपेक्षा कमी किंमतीवर सूचीबद्ध झाला आणि तिथूनच घसरणीला सुरुवात झाली.

वर्षभरात एलआयसीचा शेअर जवळपास 40% ने कोसळला आहे. यात लाखो गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. बाजार भांडवलानुसार एलआयसी शेअर बाजारातली टॉप 15 कंपन्यांमधील एक कंपनी होती.मात्र वर्षभरातील सुमार कामगिरीमुळे एलआयसीला निफ्टी किंवा सेन्सेक्स इंडेक्समध्ये आपले स्थान निर्माण करण्यात अपयश आले.

आज 17 मे 2023 रोजी एलआयसीचा शेअर 567.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यात किंचित घसरण झाली. एलआयसीने आयपीओ वेळी प्रती शेअर 949 रुपयांचा दर निश्चित केला होता. एलआयसीच्या शेअरमधील घसरणीने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूदारांनी देखील एलआयसीमधून काढता पाय घेतला. नुकसान होत असताना देखील किरकोळ गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.तर याच कालावधीत म्युच्युअल फंड आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कमी केली आहे.

chart.jpg

किरकोळ गुंतवणूकदार घटले मात्र गुंतवणूक वाढली

एलआयसीच्या आयपीओने गुंतवणूकादारांचे किमान 2.5 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. वर्षभरात एलआयसीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या कमी झालेली दिसून आली. मात्र गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. आयपीओ लिस्ट झाला त्या दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या 39 लाख 89 हजार इतकी होती. ज्यांनी 2 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केली. मात्र वर्षभरानंतर किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या कमी झाली आहे. मार्च 2023 अखेर एलआयसीतील किरकोळ गुंतवणूकदारांचा आकडा 33 लाख इतका आहे. वर्षभरात 6 लाख 87 हजार गुंतवणूकदार एलआयसीच्या गुंतवणुकीतून बाहेर पडले.  

म्युच्युअल फंडांनी आणि FII ने गुंतवणूक कमी केली

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार मार्च 2023 अखेर एलआयसीमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 2.04% इतका आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक (FII) 0.08% इतकी आहे. जून 2022 मध्ये हे प्रमाण 0.12% इतके होते. म्युच्युअल फंडांनी देखील एलआयसीमधील गुंतवणूक कमी केली आहे. मार्च 2023 अखेर म्युच्युअल फंडांचे गुंतवणुकीचे प्रमाण अवघे 0.63% इतके आहे.

LIC शेअरबाबत काय आहे ब्रोकर्सचा अंदाज

वर्षभरात 40% कोसळल्यानंतर एलआयसीच्या शेअरबाबत गुंतवणूकदारांनी चांगलाच धसका घेतला आहे. ज्यांना आयपीओमध्ये शेअर प्राप्त झालेले असे लाखो गुंतवणूकदार अजूनही मुद्दल वसूल करण्यासाठी थांबून आहेत. मात्र एलआयसी पुढे वाढेल की नाही याबाबत कोणत्याच ब्रोकर्सकडून ठोस अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही. ट्रेंडलाईन डेटानुसार 'एलआयसी' शेअरवर लक्ष ठेवणाऱ्या 15 विश्लेषकांपैकी 12 विश्लेषकांनी तूर्त एलआयसी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 3 विश्लेषकांनी एलआयसी होल्ड करावा असा सल्ला दिला आहे. 

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)