22 डिसेंबर 2006 पासून जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनेंतर्गत (Janani Suraksha Yojana) ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार 8 मे 2013 पासून लाभार्थ्यांचे वय व अपत्यासंबंधीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच महिलांचे आरोग्य संस्थेत प्रसुतीचे प्रमाण वाढण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येते.
Table of contents [Show]
या योजनेचे लाभार्थ्यास मिळणारे लाभ (Benefits of this scheme)
- या योजनेंतर्गत पात्र ग्रामीण भागातील लाभार्थी जर शासकीय आरोग्य संस्था किंवा मानांकित खासगी आरोग्य संस्थेत प्रसुत झाल्यास तिला प्रसुतीनंतर 7 दिवसांच्या आत 700 रुपये तिच्या बँक खात्यात परस्पर जमा केले जातात.
- या योजनेंतर्गत पात्र शहरी भागातील लाभार्थी शहरी भागातील शासकीय आरोग्य संस्था किंवा मानांकित खासगी संस्थेत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीनंतर 7 दिवसांच्या आत रुपये 600 तिच्या बँक खात्यात परस्पर जमा केले जातात.
- ग्रामीण आणि शहरी भागातील फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांची प्रसुती घरी झाली तर त्या लाभार्थीस 500 रुपये प्रसुतीनंतर 7 दिवसांच्या आत तिच्या बँक खात्यात परस्पर जमा केले जातात.
- या योजनेंतर्गत पात्र लाभार्थीची सिझेरियन शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्यास अशा लाभार्थीला 1500 रुपये तिच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
आशा कार्यकर्तीसह मिळतात लाभ (Benefits to ASHA Activists)
ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र जेएसवाय लाभार्थीची प्रसुती आरोग्य संस्थेत करण्यासाठी लाभार्थीला प्रवृत्त केल्यास आशा कार्यकर्तीस ग्रामीण भागात 600 रुपये आणि शहरी भागात 400 रुपये मानधन म्हणून देण्यात येते. लाभार्थीच्या प्रसुतीपूर्वी आशा कार्यकर्तीस अर्धे मानधन आणि प्रसुतीनंतर अर्धे मानधन देण्यात येते.
ग्रामीण भागातील सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था
या योजनेंतर्गत ग्रामीण भागात उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा स्त्री रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, या योजनेकरिता मानांकित केलेली खासगी रुग्णालयं.
शहरी भागातील सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था
या योजनेंतर्गत शहरी भागात वैद्यकीय महाविद्यालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्रे, नागरी कुटुंब कल्याण केंद्रे आणि शासन अनुदानित रुग्णालयं.