Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Saving Tips: पैशांची कमतरता असताना बचतीच्या प्रॅक्टिकल टिप्स जाणून घ्या

Money Saving Tips

Image Source : www.idfcfirstbank.com

Money Saving Tips: पैशांची बचत करणे, हे प्रत्येकालाच जमते असे नाही. पण जेव्हा वाईट परिस्थिती येते. तेव्हा बचतीशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी बचतीच्या काही टिप्स जाणून घ्या...

Money Saving Tips: जेव्हा आपल्याकडे पैशांची कमतरता असते किंवा खर्चासाठी नेमके पैसे उरतात. तेव्हा आपल्याकडून आपोआप खर्च कमी होतो. पण काही खर्च असे असतात. जे आपण विनाकारण सवयीनुसार करत आलेलो असतो. ते जर बंद केले तर खूप सारी बचत होऊ शकते. तर आज आपण अशाच बचतीच्या प्रॅक्टिल टिप्स जाणून घेणार आहोत.

पैशांची बचत करणे, हे प्रत्येकालाच जमते असे नाही. काही जणांना त्याची गरज पडत नाही किंवा काही जण गुंतवणुकीचा वेगळा विचार करतात. त्यामुळे बचत करण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. पण जेव्हा एखाद्यावर वाईट परिस्थिती येते. तेव्हा मात्र त्याला बचतीशिवाय पर्यायच नसतो. जसे की, पुरेसे सेव्हिंग नसणे, अचानक नोकरी जाणे किंवा कुंटुंबावर मोठा आघात होणे.अशावेळी बचत हाच एक मार्ग शिल्लक राहतो. तर आज आपण अडचणीच्या काळात कोणत्या गोष्टींमधून बचत करू शकतो. हे पाहणार आहोत.

पै... पै... चा हिशोब ठेवा

प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर होणाऱ्या खर्चाची नोंद ठेवा. यामुळे होणाऱ्या मोठ्या खर्चाचा तुम्हाला अंदाज येईल. उदाहरणार्थ, दिवसातून तुम्ही 3 ते 4 वेळा चहा पित असाल. तर 10 रुपयानुसार प्रत्येक दिवशी तुमचे चहावर 30 ते 40 रुपये खर्च होतात. म्हणजेच महिन्याला 900 रुपये आणि वर्षाचे जवळपास 10,500 रुपये. आता यातले वाचवायचे किती आणि कसे हे तुम्हालाच ठरवावे लागणार.

खाण्यावर होणाऱ्या खर्चाचे नियोजन करा

प्रत्येक जण पोट भरण्यासाठीच पैसे कमावत असतो. पण म्हणून कमावलेले सर्व पैसे खाण्यावर खर्च करणे परवडणारे नाही. हॉटेलिंग कमी करा. दररोज भाजी, किराणा विकत घेण्यापेक्षा मार्केटमधून एकदम आठवड्याची खरेदी करा. यामुळे पैशांची बचत तर होईलच. पण त्याचबरोबर आरोग्य हेल्दी राहून डॉक्टरवर खर्च होणारे पैसे देखील वाचतील.

खर्चाचे बजेट तयार करा

खर्चाचे बजेट ही फक्त कागदोपत्री वाटणारी आयडिया नसून तुम्हाला जमिनीवर आणणारी प्रॅक्टिकल गोष्ट आहे. यामुळे तुम्हाला तुमचे सर्व खर्च आणि त्यासाठी लागणारी रक्कम कळते. यातून तुमच्याकडे किती पैसे आहेत आणि ते कोणत्या गोष्टींवर खर्च करणे गरजेचे आहे, हे तुम्हाला कळू शकते.

Tips for Money Saving

अनावश्यक सब्सक्रिप्शन काढून टाका

मोबाईल, ओटीटी प्लॅटफॉर्म, केबल, क्लबहाऊस, जीम अशी जी तुम्ही वापरत नाहीत, ती सब्सक्रिप्शन्स लगेच बंद करा. यामुळे तुमचे कितीतरी पैसे वाचतील. मोबाईलसाठी फॅमिली प्लॅन वापरा. अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या फॅमिली प्लॅनवर फ्री ओटीटी अॅप देत आहेत. त्यांचा वापर करा. त्यामुळे तुमचे केबल आणि ओटीटी सब्सक्रिप्शनवर होणारे खर्च कमी होतील. तसेच क्लबहाऊस, जीमला तुम्ही नियमित जात नसाल तर त्याचेही सब्सक्रिप्शन कॅन्सल करा.

युलिटी बिल्सवर होणारा खर्च आटोक्यात आणा

इलेक्ट्रिसिटी, गॅस, पाणी या महत्त्वाच्या गोष्टींची बिले वेळेत भरावीत. जेणेकरून त्यावर दंड भरावा लागणार नाही. तसेच इलेक्ट्रिसिटीचे बिल कमी करण्यासाठी त्याचा अनावश्यक वापर टाळा. विजेची बचत होईल, अशी उपकरणे वापरा. यामुळे महिन्याच्या खर्चात मोठी बचत होईल.

सार्वजनिक वाहनांचा वापर करा

तुम्ही शहरांमध्ये राहत असाल तर तुमचा पेट्रोल-डिझेलवर होणारा खर्च नक्कीच बंद करू शकता. मुबंईसारख्या शहरात ट्रेन, मेट्रो, बस, मोनो, शेअरिंग टॅक्सी-रिक्षा इतके सारे पर्याय आहेत. तसेच रेल्वे, बस यांचे मासिक किंवा त्रैमासिक पास काढले तर तिकिटांपेक्षा आणखी कमी खर्चात तुमचा प्रवास होऊ शकतो. 

मोठी कर्जे अगोदर फेडा

तुमच्या डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारची कर्जे असतील, तर त्यातील सर्वाधिक व्याज भरावे लागणारे कर्जे अगोदर फेडा. यामुळे व्याजावर होणारा भलामोठा खर्च कमी होईल. त्यानंतर दुसऱ्या कमी व्याजाच्या कर्जाकडे मोर्चा वळवा. अशाप्रकारे एक-एक करून स्वत:ची कर्जातून मुक्तता करा.

बचतीची सवय सोडू नका

खर्च किती असले तरी, बचतीची सवय सोडू नका. यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागला तर तो करा. पण बचत करणे सोडू नका. यामुळे तुमच्यात एक आर्थिक शिस्त लागण्यास मदत होते आणि बचत ही तुमच्या जीवनाचा भाग बनते. म्हणून रक्कम कितीही लहान असली तरी ती वाचवण्याचा प्रयत्न करा.

अशाप्रकारे काही बेसिक गोष्टींच्या माध्यामातून खर्चात कपात करून बचत वाढवू शकता. या व्यतिरिक्त तुमच्याकडेही पैसे बचतीच्या भन्नाट आयडियाज असू शकतात.