सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन (Systematic Withdrawal Plan-SWP) म्हणजेच पद्धतशीर पैसे काढण्याची योजना तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे म्युच्युअल फंडातून ठराविक रक्कम काढण्यास अनुमती देते. म्युच्युअल फंडातून पैसे काढण्याचा हा एक पद्धतशीर मार्ग समजला जातो. ज्यामध्ये तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम काढत नाही; पण ठराविक कालावधीत ठराविक रक्कम हळूहळू काढता. काही कारणामुळे तुमची नोकरी गेली किंवा इतर कुठल्या कारणामुळे तुम्हाला तुमचा पगार मिळत नसल्यास अशावेळी SWP मधून मिळणारे उत्पन्न उपयुक्त ठरू शकते. तुम्ही SWP द्वारे प्रत्येक महिन्याचा पगार म्हणून तुमच्या म्युच्युअल फंडातून एक ठराविक रक्कम काढू शकता. SWP योजना ही इक्विटी, डेब्ट किंवा हायब्रिड यापैकी कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंडासाठी लागू करता येऊ शकते.
सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन कसे काम करते?
SWP चा वापर कोणत्याही प्रकारच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी केला जाऊ शकतो. जसे की, भाडे भरणे, कर्जाचा EMI किंवा महिन्याचा खर्च भागविण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमच्याकडे एका फंडात 2.5 लाख रूपये आहेत. तुम्ही या फंडातून 10 महिन्यांच्या कालावधीसाठी 25,000 रुपये प्रति महिना SWP सेट करू शकता. तुमचा SWP चालू असताना, बाजारातील अस्थिरतेमुळे तुमच्या फंडावर चढ-उताराचा परिणाम होऊ शकतो. पण त्याचा परिणाम तुमच्या SWP च्या 25,000 रूपयांच्या हप्त्यावर होत नाही.
सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP) असे सुरू करा?
सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन सुरू करण्यासाठी तुम्हाला त्याचा फॉर्म भरून संबंधित AMC (फंड हाउस) कडे सबमिट करावा लागेल. SWP ची रक्कम आणि कालावधी (केव्हा पासून) फॉर्ममध्ये द्यावा लागेल. फंड गुंतवणुकीसाठी तुम्ही जर ऑनलाइन खाते उघडले असल्यास, SWP चा फॉर्म ऑनलाइन भरू शकता. तुमचे बँक खाते म्युच्युअल फंडामध्ये नोंदणीकृत असल्यास, तुमची SWP ची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात केली जाते.
सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP) साठी दोन पर्याय आहेत.
ठराविक कालावधीत पैसे काढणे (Fixed periodic withdrawal)
फिक्स्ड पीरियडिक विथड्रॉवलमुळे ठराविक रक्कम ठराविक वेळी काढता येते. जसे की तुम्ही दिलेल्या प्रत्येक महिन्याच्या तारखेला पैसे तुमच्या बॅंकेत जमा होतात. म्युच्युअल फंड हाऊस SWP रकमेइतके युनीट्स विकून त्याबदल्यात गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे वळते करेल.
झालेली वाढ काढून घेणे (Appreciation Withdrawal)
अप्रिसिएशन विथड्रॉवलमध्ये, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदार त्याच्या फंडातून काही टक्के रक्कम काढण्यासाठी SWP सेट करतो. समजा त्याने म्युच्युअल फंडात 10 लाख रुपये गुंतवले आहेत. जे दरमहा सरासरी 1.5% परतावा देतात. गुंतवणूकदाराने अॅप्रिसिएशन विथड्रॉल अंतर्गत मासिक SWP योजना घेतल्यास त्याला त्यांच्या फंडातून प्रत्येक महिन्याला 15,000 रूपये ही मिळणार आणि गुंतवलेली मूळ रक्कमही तशीच राहणार.
सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅनवर टॅक्स
SWP वर लागू होणारा टॅक्स हा दोन गोष्टींवर अवलंबून असतो. एक म्हणजे तुम्ही कोणत्या गुंतवणुकीतून पैसे काढत आहात आणि तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी काय आहे.
इक्विटी (Equity) फंडच्या बाबतीत, 1 वर्षाच्या आत तुम्ही जर पैसे काढले तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) अंतर्गत 15% टॅक्स लागू शकतो. आणि 1 वर्षानंतर पैसे काढल्यावर, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) अंतर्गत 10% टॅक्स आकारला जाईल.
डेब्ट (Debt) फंडच्या बाबतीत, फंड खरेदी केल्यानंतर 3 वर्षांच्या आत काढलेल्या रकमेवर तुमच्या स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो आणि तुम्हाला इंडेक्सेशनचा लाभ दिल्यानंतर 3 वर्षानंतर काढलेल्या रकमेवर 20% टॅक्स आकारला जातो.
सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅनवर एक्झिट लोड
इक्विटी फंडातून 1 वर्षापूर्वी तुम्ही जर पैसे काढले तर फंड हाऊसद्वारे त्यावर एक्झिट लोड आकारला जातो. SWP फंडातून पैसे काढले तर एक्झिट लोड लागू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या गुंतवणुकीच्या 6व्या महिन्यापासून तुमच्याकडे दरमहा रु 10,000 SWP असल्यास, SWP हप्त्यातून प्रत्येक महिन्याला 1% किंवा 100 रूपये कापले जातील.