Encourage Girls Scholarship Scheme : आर्थिकदृष्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना चांगले आणि उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. यातील काही शिष्यवृत्ती योजना विशेष करुन मुलींसाठी तयार केल्या जातात. शालेय ते उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू आणि गुणवंत मुलींना याचा फायदा होतो. या सर्व शिष्यवृत्ती मासिक आणि वार्षिक असतात.
Table of contents [Show]
बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी आणि जैन या अल्पसंख्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थीनींना ही शिष्यवृत्ती दिल्या जाते. ही शिष्यवृत्ती योजना मौलाना आझाद शिष्यवृत्ती म्हणूनही ओळखल्या जाते. बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती 9वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींना 6000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते. वर्गात 50 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण असणाऱ्या आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थीनींना ही शिष्यवृत्ती दिल्या जाते. या शिष्यवृत्ती योजनेचे फॉर्म सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान भरले जातात.
AICTE प्रगती शिष्यवृत्ती
एआयसीटीई तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये डिप्लोमा आणि पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. AICTE अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवता यावे,म्हणून त्यांना वार्षिक 4,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद या शिष्यवृत्ती योजनेत आहे. या शिष्यवृत्तीचा फॉर्म सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात भरला जातो. दरवर्षी सुमारे 30000 विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद़ेची मंजूरी असलेल्या संस्था व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये ( पदविका, पदवी ) शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी प्रगती शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
SOF बालिका शिष्यवृत्ती योजना
SOF बालिका शिष्यवृत्ती योजना ही इयत्ता 1 ते 10 पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींसाठी आहे. या योजनेचे किंवा शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना सतत शिक्षणासाठी प्रवृत्त करणे हे आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थिनींची निवड शाळांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे केली जाते. त्यासाठी एप्रिल ते ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत फॉर्म भरला जातो.
शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थिनींना वार्षिक ५००० रुपयांची मदत मिळते.
महिला वैज्ञानिक शिष्यवृत्ती योजना
महिला वैज्ञानिक शिष्यवृत्ती ही अश्या महिला शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांसाठी आहे,ज्यांना त्यांच्या तांत्रिक करिअरमधून ब्रेक घ्यायचा आहे आणि संशोधनात जायचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची वयोमर्यादा 27 ते 57 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. संशोधनासाठी या महिला प्रत्येक महिन्याला 55000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी महिला फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान फॉर्म भरू शकतात.
इंदिरा गांधी शिष्यवृत्ती
इंदिरा गांधी शिष्यवृत्ती ही अशा विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्या त्यांच्या पालकांचे एकुलते एक अपत्य आहेत आणि त्यांनी 60 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण केली आहे. इंदिरा गांधी शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपयांची मदत दिली जाते. ही शिष्यवृत्ती योजना महिलांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि अविवाहित मुलींच्या पदव्युत्तर शिक्षणास समर्थन देण्यासाठी राबविली जाते.