KMAAF Scheme: कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांसाठी वैविध्यपूर्ण गुंतवणुकीसाठी एक नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव Kotak Multi Asset Allocation Fund (KMAAF) असे आहे. कोटक म्युच्युअल फंड ही भारतातील 5 वी मोठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) आहे. आज (गुरुवार) अधिकृतरित्या ही योजना लाँच केली.
कोटक महिंद्राच्या फंडमधून काय मिळेल?
KMAAF या म्युच्युअल फंडाद्वारे इक्विटी, डेट, गोल्ड, सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेट फंड, इंटरनॅशनल म्युच्युअल फंड योजना, रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट, इन्फ्रा फंड मध्ये गुंतवणूक केली जाईल. भांडवली बाजारातील जोखीम आणि अर्थव्यवस्थेची स्थिती पाहून विविध क्षेत्रातील गुंतवणूक कमी जास्त केली जाईल.
जे गुंतवणुकदार पारंपरिक मुदत ठेवी किंवा निश्चित परतावा देणाऱ्या कमी जोखमीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची ठरू शकते. कारण, विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होते. आर्थिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या फंडामधील गुंतवणुकीत जोखीम कमी असते.
मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड म्हणजे काय?
मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड हा हायब्रीड फंडाचाच प्रकार आहे. कमीत कमी 10% रक्कम तीन अॅसेट क्लासमध्ये गुंतवावी लागते. याद्वारे, इक्विटी, बाँड, डेट इन्स्ट्रुमेंट, गोल्ड,सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड(ETF), इन्फ्रा फंड, रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट, इंटरनॅशनल म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते.
या फंडातील गुंतवणुकीचे फायदे काय?
विविध पर्यायामध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होते.
तीन वर्षांपर्यंत योजनेत गुंतवणूक ठेवल्यास जास्त फायदेशीर ठरू शकते.
बाजारातील परिस्थितीनुसार जोखीम पाहून गुंतवणूक कमी जास्त केली जाते.
फंड योजनेद्वारे रेडीमेड पोर्टफोलिओ मिळत असल्याने गुंतवणुकीत वैविध्य राहते.
जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या म्युच्युअल फंडच्या योजनांमध्ये गुंतवणूक करता तेव्हा किती टक्के गुंतवणूक कोणत्या प्रकारच्या फंडात करावी, यात तुमचा गोंधळ उडतो. जसे, इक्विटी, डेट, इन्फ्रा, गोल्ड, बँकिंग, टेक असे विविध म्युच्युअल फंड बाजारात आहेत. मात्र, नक्की कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक करावी हे गुंतवणूकदाराला पाहावे लागते. मात्र, मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंडाद्वारे एकाच वेळी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते.