कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीसाठी वेळेत पास उपलब्ध न झाल्याने अनेकांनी टोल भरुन प्रवास केला. याच दरम्यान टोलनाक्यांवरील स्कॅनरमुळे फास्टटॅगमधून शेकडो गणेशभक्तांचे टोलचे पैस कापले गेले होते. याबाबत माध्यमांमधील वृत्त आणि गणेशभक्तांच्या तक्रारींची राज्याच्या परिवहन खात्याने दखल घेतली आहे. फास्टटॅगचा यंत्रणेचा फटका बसलेल्या चाकरमान्यांना टोलचे पैसे परत करण्याचे संकेत परिवहन विभागाने दिले आहेत.
भारतात टोलचे पैस भरण्यासाठी फास्टटॅग बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी फास्टटॅग स्टीकर गाडीच्या काचेवर दर्शनी भागात लावावा लागतो. गाडी स्कॅनर समोर आली कि पैसे फास्टटॅग खात्यातून वजा केले जातात. ही सर्व यंत्रणा स्वयंचलित आहे.
मात्र याच फास्टटॅगने कोकणात गेलेल्या गणेशभक्तांचा घात केला. गणेश उत्सवासाठी टोल फ्रीचा पास असून देखील अनेक चाकरमान्यांकडून टोलचे पैसे फास्टटॅगने कापल्याची बाब समोर आली होती. कोकणात पोहोचलेल्या अनेकांनी सोशल मिडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर या प्रश्नाची राज्याच्या परिवहन विभागाने दखल घेतली आहे.
ज्या वाहनधारकांकडे टोल फ्रीचा पास होता मात्र त्यांच्या फास्टटॅगमधून पैसे कापले गेले अशा अनेक तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या आहेत. या तक्रारींची परिवहन आयुक्तालयाने दखल घेतली आहे. या वाहनधारकांना टोलचे पैसे परत देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भिमनवार पुढे म्हणाले की टोलनाक्यांवरील गोंधळ टाळण्यासाठी सरसकट टोलमाफी देणे आवश्यक आहे. फास्टटॅगचा फटका बसलेल्या गणेशभक्तांना टोलचे पैसे परत देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देणार असल्याची माहिती भिमनवार यांनी दिली.
राज्य सरकारने 16 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफी जाहीर केली आहे. ही सवलत मुंबई - बंगळुरु आणि मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर असलेल्या टोलनाक्यांवर लागू आहे.