मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याची घोषणा केली होती. मात्र शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईने अनेकांना टोल माफीचे पास वेळेवर उपलब्ध झाले नाहीत. काहींना फास्टटॅगचा यंत्रणेचा फटका बसल्याने टोलचा भुर्दंड सोसावा लागला. तांत्रिक गैरसोय आणि शासकीय यंत्रणेच्या संथ कारभारामुळे टोल माफीचा लाभ न मिळाल्याने कोकणात पोहोचलेल्या गणेशभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरवर्षी मुंबई परिसरातून लाखो चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. या कोकणवासीयांसाठी यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमाफीची घोषणा केली होती. टोल माफीचे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस प्रशानस विभाग, पोलीस चौकी या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहेत. या टोल माफी पासवर वाहनांचा क्रमांक, चालकाचे नाव टाकण्यात येणार आहे.16 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल आकारला जाणार नाही. ही सवलत मुंबई - बंगळुरु आणि मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर असलेल्या टोलनाक्यांवर लागू आहे. मात्र 15 सप्टेंबरपर्यंत मुंबईत अनेक ठिकाणी गणेशोत्सव 2023 कोकण दर्शन हा पास उपलब्ध झाला नाही.
मुंबई-गोवा हायवेने कोकणात जाण्यासाठी नवी मुंबईतील वाशी येथे आणि ऐरोली येथे टोल द्यावा लागतो. यंदा बुधवार 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थी आहे. शेवटच्या दिवशी होणारी ट्राफिक लक्षात घेता आठवडाभर आधीच मुंबईतील चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली. मात्र त्यांना टोल माफीचा ‘गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’हा पास वेळेवर उपलब्ध न झाल्याने टोलचा भुर्दंड सोसावा लागला.
कोल्हापूर मार्गे विक्रोळी ते कुडाळ प्रवास करणाऱ्या श्रीकृष्ण नेरुरकर यांना जवळपास 600 रुपयांचा टोल भरावा लागला. 15 सप्टेंबर रोजी घाटकोपर येथील आरटीओ ऑफिसमध्ये टोल फ्री पाससाठी चौकशी केली होती, मात्र पास अद्याप आलेच नाहीत, असे उत्तर अधिकाऱ्याने दिले. त्यामुळे आणखी काही काळ वाट पाहण्याऐवजी शुक्रवारीच रात्री पासशिवाय प्रवास सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
एक्सप्रेसवेवरुन पुणे, सातारा कराड खारेपाटण मार्गे कुडाळला पोहोचलो. ज्या ज्या ठिकाणी टोल होतो तो भरल्याचे नेरुरकर यांनी सांगितले. टोल माफीची घोषणा आणि त्यासाठी आवश्यक पास किमान महिनाभर आधी सरकारने नागरिकांना उपलब्ध केले तर या योजनाचा सर्वांनाच लाभ मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पास मिळवण्याची प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात खेटे घालणे टाळले. सरकारने टोलमाफीची घोषणा केली असल्यामुळे टोलनाक्यावरील स्कॅनिंगच्या ठिकाणी तशी व्यवस्था केली असावी ही आशा होती. मात्र फास्टटॅग कंपनीने लुटमारीचा स्कॅनर सुरु ठेवला आणि आमच्या माथी टोलचा भुर्दंड मारलाच. संपूर्ण यंत्रणेतील समन्वयाच्या अभावाचा फटका कोकणात जाणाऱ्या आमच्यासारख्या हजारो चाकरमान्यांना बसला, असे मत जोगेश्वरी ते वैभववाडी प्रवास करणाऱ्या विवेक गोगावले यांनी व्यक्त केले.
मुंबईतून देवगडमध्ये पोहोचलेल्या सोहम पारकर यांनीही टोल माफीविषयीच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की टोल फ्री प्रवासासाठी टोल नाक्यांवर स्वतंत्र मार्गिका ठेवणे आवश्यक होते. तशी व्यवस्था नसल्याने अनेक वाहनांकडून फास्टटॅग स्कॅनरमुळे वसूल केला जात आहे. व्हीआयपी पासधारकही फास्टटॅग स्कॅनरच्या कचाट्यात अडकले आहेत, असे पारकर यांनी सांगितले.
दरम्यान, तळ कोकणात जाण्यासाठी अनेकांनी एक्सप्रेस वेचा पर्याय स्वीकारला आहे. या ठिकाणी टोल भरावा लागत आहे. तसेच काही टोलनाक्यांवर तांत्रिक अडचणी किंवा योग्य सूचनांचा अभाव यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकडून टोल वसुली केली जात असल्याचे मुंबई गोवा चौपदरीकरण महामार्ग समितीचे प्रवक्ते अॅड.ओवेस पेचकर यांनी सांगितले.