गेल्याकाही दिवसात सोन्याचे दर प्रचंड वाढले आहेत. भारतात सोन्याच्या किंमतीने प्रति तोळा 75 हजार रुपयांचा आकडा गाठला असून, हा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात भाववाढीचा हा ट्रेंड दिसून आहे.
एकीकडे लगीनसराई सुरू असताना सोने खरेदी करावे की नाही, अशा द्विधा मनस्थितीमध्ये सर्वसामान्य दिसून येत आहेत. सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होण्यामागे नक्की काय कारण आहे? या काळात सोने खरेदी करावे की नाही? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेऊया.
100 दिवसात 10 हजार रुपयांनी वाढ
वर्ष 2024 सुरू झाल्यापासून सोने व चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. मागील 100 दिवसात सोन्याच्या किंमतीत जवळपास 10 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. मागील 3 महिन्यात सोन्याचे दर 15 टक्क्यांनी वाढले आहेत.
1 जानेवारीला 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमत जवळपास 65,500 रुपये होती. हाच आकडा 15 एप्रिलपर्यंत 75 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. आतापर्यंतचा सोन्याची किंमत सर्वात उच्चांकी पातळीवर आहे. पुढील काही वर्षात सोने 90 हजार ते 1 लाख रुपयांचा आकडा गाठण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
सोन्याचे दर अचानक वाढण्यामागचे कारण
अचानक सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमागे अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे बाजारातील अस्थिरता. रशिया-युक्रेन, इस्त्रायल-इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरातील बाजारांमध्ये अनिश्चितता पाहायला मिळत आहे. बाजारातील अस्थिरता, आर्थिक संकट येण्याची भिती यामुळे सोन्याची मागणी अचानक वाढली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मुल्यात झालेल्या घसरणीमुळेही भारतात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक पुढील तिमाहीत पहिल्यांदाच व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. व्याजदर कमी असल्यास सोन्यात गुंतवणूक वाढते. अमेरिकेतील वाढती महागाई हे देखील यामागचे प्रमुख कारण आहे. याशिवाय, चीनच्या मध्यवर्ती बँकेकडून मोठ्याप्रमाणात सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे भारतासह जगभरात सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे.
सोन्याची किंमत कशी ठरते?
लंडनमधील बुलियन मार्केटद्वारे सोन्याची किंमत निश्चित केली जाते. सोने-चांदीच्या व्यापाराबाबत हे जगातील प्रमुख मार्केट आहे. यामध्ये जगभरातील महत्त्वाच्या संस्था, उद्योगपतींचा यामध्ये समावेश आहे. येथूनच सोन्याची किंमत ठरत असते. तर भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंजद्वारे (MCX) लंडन बुलियन मार्केटशी समन्वय साधून किंमत ठरवली जाते. याशिवाय, सोन्याची मागणी, डॉलरच्या तुलनेत रुपयांचे मुल्य अशा विविध गोष्टींवरून सोन्याची किंमत ठरत असते.
सर्वसामान्यांनी सोने खरेदी करावे की नाही?
सोन्यामधील गुंतवणूक सर्वसाधारणपणे सुरक्षित मानली जाते. पैसे असल्यास अथवा आर्थिक अस्थिरतेच्या काळात सुरक्षितता म्हणून सोने खरेदी केले जाते. भविष्यातही सोन्याच्या किंमतीचा वाढता ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतात सोन्याकडे केवळ गुंतवणूक म्हणूनच नाही तर हौस म्हणूनही पाहिले जाते. त्यामुळे सणासुदींच्या व लग्नसमारंभाच्या काळात किंमत वाढतच जाणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करणे कधीही फायद्याचे ठरते. परंतु युद्ध, महागाई, राजकीय अस्थिरता अशा अनिश्चितेच्या काळात गुंतवणूक करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.