प्रश्न – मी सध्या एक खासगी कंपनीत कामाला आहे. कंपनीच्या कामानिमित्त मला सतत प्रवास करावा लागतो. मला या प्रवासाचा भत्ता कशाप्रकारे मिळेल?
महामनीचे उत्तर – कंपनीत काम करत असताना कामानिमित्ताने अनेकदा प्रवास करावा लागतो. नवीन ग्राहकांना भेटणे असेल किंवा एखाद्या साईटला भेट देणे असेल... अशा विविध कामानिमित्ताने अनेक वेळा प्रवास करावा लागतो. अशा प्रवासाचा भूर्दंड थेट कर्मचाऱ्यांच्या खिश्यावर पडू नये यासाठी कंपनीकडून एक विशिष्ट रक्कम दिली जाते. तुम्ही देखील कामानिमित्ताने सतत प्रवास करत असाल तर अशाप्रकारचा भत्ता कंपनीकडे मागू शकता. प्रवास भत्ता नक्की काय व कोणत्या प्रकारचा असतो? कंपनीकडे याची कशाप्रकारे मागणी करू शकता? याबाबतची माहिती जाणून घेऊया.
प्रवास भत्ता (Travel Allowance) म्हणजे काय?
कंपनीच्या कामानिमित्ताने तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करत असाल तर यासाठीच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी दिलेले पैसे म्हणजे प्रवास भत्ता होय. या भत्त्यात वाहतूक, राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च व इतर आवश्यक खर्चाचा समावेश असतो. थोडक्यात, कंपनीचे काम करताना प्रवासाचा खर्च कर्मचाऱ्यांना करावा लागू नये, हा भत्ता देण्यामागचा उद्देश असतो.
प्रवास भत्त्याची रक्कम ही दरमहिन्याला किंवा एकरकमी स्वरुपात देखील दिली जाते. तसेच, ही रक्कम आधीच निश्चित केल्याप्रमाणे किंवा झालेल्या खर्चाऐवढी देखील असू शकते. प्रवास भत्ता किती मिळेल हे कर्मचाऱ्याचा हुद्दा, केलेला प्रवास व कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून असते.
प्रवास भत्त्याचे प्रकार
फिक्स्ड प्रवास भत्ता – कर्मचाऱ्याच्या पगारातच या भत्त्याची रक्कम नमूद असते. मूळ खर्च कितीही असला तरीही आधीच निश्चित केलेली रक्कम कर्मचाऱ्याला दिली जाते.
प्रवासानुसार भत्ता – बँकिंग किंवा सेल्स संबंधित कामामध्ये कर्मचाऱ्यांना सतत प्रवास करावा लागतो. अशावेळी हा भत्ता किलोमीटरनुसार ठरत असतो. कर्मचाऱ्याने दररोज किंवा कामानिमित्ताने किती किमी प्रवास केला आहे, यावरून भत्त्याची रक्कम ठरवली जाते.
दररोजचा प्रवास भत्ता – काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना दररोज कामानिमित्ताने बाहेर जावे लागते. अशावेळी कंपनी दररोजच्या खर्चासाठी एक ठराविक रक्कम भत्ता म्हणून निश्चित करत असते.
ट्रॅव्हल रिइम्बर्समेंट – सर्वसाधारणपणे कंपनीमध्ये ट्रॅव्हल रिइम्बर्समेंटची पद्धत असते. कर्मचाऱ्याने कंपनीच्या कामानिमित्ताने प्रवास करताना केलेल्या खर्चाचे बिल्स जमा करावे लागतात. यामध्ये वाहतुकीपासून ते खाण्यापिण्याच्या खर्चाचा समावेश असते. संपूर्ण खर्चाचे बिल्स जमा केल्यास त्याआधारावर भत्ता दिला जातो.
प्रवास भत्त्याची मागणी करताना गोष्टी ठेवा लक्षात
कंपनीचे नियम – तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात, तेथील प्रवास भत्त्यासंदर्भातील नियम जाणून घ्या. प्रवास भत्ता हा सर्वच कर्मचाऱ्यांना लागू होत नाही. तसेच, कंपन्यांमध्ये दरमहिन्याला किंवा वर्षाला एकदाच प्रवास भत्ता दिला जातो, याबाबत जाणून घ्या. समजा, तुम्ही कंपनीच्या कामानिमित्त प्रवास केला असल्यास यासंदर्भात एचआरशी बोलून भत्त्याची मागणी करू शकता.
भत्त्याची मर्यादा – प्रत्येक कंपनीच्या प्रवास भत्त्यासाठी एक ठराविक रक्कम असते. त्यामुळे प्रवासाचा खर्च त्या रक्कमेपेक्षा जास्त होणार नाही, याची काळजी घ्या. अन्यथा या खर्चाचा भूर्दंड तुम्हालाच बसेल.
बिल्स – प्रवास भत्ता हवा असल्यास सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे खर्चाचे बिल्स असायला हवे. तुम्ही विमान, रेल्वे अथवा बसमधून प्रवास केला असल्यास त्याची तिकिटे जपून ठेवा. प्रवासादरम्यान तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिला, तेथील बिल्स असणे गरजेचे आहे. प्रवासाच्या तारखा लक्षात ठेवा. याचा फायदा तुम्हाला कंपनीकडे प्रवास भत्ता मागताना होईल.
करात सूट - आयकर कायद्याच्या कलम 10, उप-कलम 14(ii) (iii) आणि प्राप्तिकर नियम 2BB अंतर्गत प्रवास भत्त्यात सूट दिली जाते. या अंतर्गत तुम्हाला दरमहिना 1600 रुपये वर्षाला 19200 रुपयांच्या प्रवास भत्त्यावर करात सूट मिळते.