प्रश्न – माझे वय 22 वर्ष आहे. सध्या मी नोकरीच्या शोधात आहे. नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मला कौशल्य विकास भत्त्याचा कशाप्रकारे फायदा मिळेल?
महामनीचे उत्तर – भारतात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. खासकरून, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर त्वरित नोकरी मिळत नाही. यामागचे प्रमुख कारण म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त कामाचा कोणताच अनुभव नसणे. मात्र, अनेक कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच भत्ता देखील देतात. तुम्ही देखील कौशल्य विकास भत्त्याचा फायदा घेऊ शकता. कौशल्य विकास भत्ता (skill development allowance) म्हणजे नक्की काय? याचा तुम्ही कशाप्रकारे फायदा घेऊ शकता? याबाबत सविस्तर जाणून घ्या.
कौशल्य विकास भत्ता म्हणजे काय?
तुम्ही कौशल्य विकास भत्त्याला एकप्रकारे आर्थिक सहाय्य म्हणू शकता. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान मिळविण्यासाठी अथवा कौशल्य विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कौशल्य विकास भत्ता हा दिला जातो. थोडक्यात, कर्मचाऱ्यांना नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात नवीन कौशल्य शिकता यावी यासाठी कंपनीद्वारे विशिष्ट रक्कम भत्त्याच्या स्वरुपात दिली जाते. कौशल्य प्रशिक्षण भत्ता हा प्रामुख्याने कंपनी, सरकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थेद्वारे कर्मचाऱ्यांना दिला जातो.
का दिला जातो कौशल्य विकास भत्ता?
कौशल्य विकास भत्ता देण्यामागचे प्रमुख कारण हे कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे हे असते. या भत्त्याचा उद्देश कर्मचाऱ्याची ट्यूशन फी, अभ्यासासाठीचे साहित्य, प्रवास खर्च आणि राहणीमानाचा खर्च भागवणे हा असतो. कौशल्य विकास भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकण्यास, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यास मदत मिळते. तसेच, ही कौशल्य आत्मसात केल्यास नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होतात. करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत मिळते.खासकरून, बेरोजगार तरुणांना याचा सर्वाधिक फायदा होतो.
कौशल्य विकास भत्ता कसा मिळेल?
कंपनीची पॉलिसी- अनेक खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना कौशल्य विकास भत्ता दिला जातो. खासकरून, नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना पगाराच्या स्वरुपात हा भत्ता दिला जातो. तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी यासंदर्भातील नियम जाणून घेणे फायद्याचे ठरेल.
तुम्ही या संदर्भात कंपनीच्या एचआरशी बोलू शकता. अनेक कंपन्या आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांना देखील नवीन कौशल्य शिकण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अशाप्रकारचा भत्ता देतात. तसेच, कंपनीला फायदा होईल असे कौशल्य तुम्हाला शिकायचे असल्यास त्याबाबत देखील तुम्ही एचआरशी व संबंधित व्यक्तीशी बोलू शकता. हे कौशल्य शिकण्यास किती खर्च येऊ शकतो, याची माहिती कंपनीस देऊ शकता. या भत्त्याची रक्कम ही कंपनी व कामानुसार वेगवेगळी असू शकते.
सरकारी योजना – सरकारद्वारे नोकरीच्या शोधतात असलेल्या पदवी, पदव्युत्तर तरुणांसाठी अनेक कौशल्य विकास योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये सहभागी होऊन तुम्ही नवीन कौशल्य शिकू शकता. या कोर्सचा कालावधी 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष असतो. अनेक योजनांमध्ये असे कौशल्य शिकताना प्रशिक्षणार्थींना दरमहिन्याला 1000 ते 1500 रुपये भत्ता म्हणून देखील दिले जातात. तुम्ही अशा सरकारी योजनांची माहिती घेऊन यासाठी अर्ज करू शकता.
इंटर्नशिप प्रोग्राम – अनेक कंपन्या पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरूण-तरूणींना इंटर्नशीपची संधी देतात. या इंटर्नशिपच्या निमित्ताने नवीन कौशल्य शिकण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, शिक्षणासाठी योग्य कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे अनेक कंपन्या इंटर्नशिपच्या कालावधीत पगार देखील देतात. अशाप्रकारे, करिअरच्या दृष्टीने फायद्याच्या असणाऱ्या नवीन गोष्टी शिकतानाच पैसे देखील मिळतील.