Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Waterfall Method: एका विमा पॉलिसीच्या मदतीने कुटुंबासाठी निर्माण करू शकता मोठी संपत्ती

waterfall with moss

Image Source : https://pixabay.com/photos/waterfall-moss-korea-mountain-5365926/

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेल्या रॉकफेलर कुटुंबाकडून 'Waterfall Method'चा वापर केला जातो. या पद्धतीचा वापर करून पिढ्यांपिढ्या संपत्तीत वाढ करणे शक्य होते.

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची जेव्हा चर्चा होते त्यावेळी एक नाव नेहमी समोर येते ते म्हणजे  ‘रॉकफेलर’. या कुटुंबातील जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अमेरिकन अब्जाधीश होते व आता सात पिढ्यांनंतर देखील हे कुटुंब श्रीमंतांच्या यादीत टॉपवर आहे.

अनेकदा असे मानले जाते की तिसऱ्या अथवा चौथ्या पिढीनंतर एखाद्या कुटुंबाने कमवलेली संपत्ती अथवा नावलौकिक धुळीस मिळते. मात्र, रॉकफेलर कुटुंबांला ही गोष्ट लागू पडत नाही. यामागचे प्रमूख कारण म्हणजे त्यांनी कुटुंबातील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संपत्ती हस्तांतरणाची वापरलेली पद्धत. याला वॉटरफॉल मेथड (Rockefeller Waterfall Strategy) असेही म्हणतात. 

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संपत्ती वितरणाची ही वॉटरफॉल मेथड नक्की काय आहे व तुम्हाला याचा संपत्ती निर्माण करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो ? याविषयी या लेखातून जाणून घेऊया. 

वॉटरफॉल मेथड नक्की काय आहे?

‘वॉटरफॉल संकल्पना’ एकप्रकारे संपत्ती वाढवण्याची पद्धत आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यांकडून पुढील पिढीकडे संपत्तीचे निरंतर हस्तांतरण केले जाते. या पद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे कर व कायद्याच्या कचाट्यात न अडकता कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीकडून लहान सदस्याकडे संपत्ती हस्तांतरण करणे. थोडक्यात, कर वाचवून पिढ्यांपिढ्या संपत्तीचे जतन आणि वितरण करण्यासाठी डिझाइन केलेली ही आर्थिक पद्धत आहे. विशेष करून संपूर्ण जीवन विम्याच्याबाबतीत ( Whole-Life Insurance Policy) ही पद्धत अचूक लागू होते.

वॉटरफॉल मेथड उदाहरणावरून समजून घेऊया. समजा, तुम्ही एखाद्या फळाचे झाड लावले आहे. या झाडाची वाढ व्हावी यासाठी तुम्ही दररोज पाणी घालत आहे. तुम्ही झाड वाढवण्यासाठी मेहनत घेत असला तरीही, जेव्हा या झाडांना फळे येतील त्यावेळी सर्वाधिक फायदा तुमच्या मुलांना होईल. 

आता, या झाडाच्या जागी विम्याचे उदाहरण ठेऊन पाहा. सर्वसाधारणपणे संपूर्ण जीवन विम्याचा कालावधी हा 99 वर्ष असतो. तुम्ही या विम्याचा हफ्ता नियमित भरताय. मात्र, तुमच्या मृत्यूनंतर संपूर्ण विमा रक्कम ही नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजे तुमची मुलं अथवा नातवंडांना प्राप्त होते व त्याचे आर्थिक भविष्य सुरक्षित होते. 

इतर संपत्ती व संपूर्ण जीवन विम्यासाठी ही पद्धत वापरण्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे कर. संपूर्ण जीवन विम्याची रक्कम ही करपात्र नसते. याशिवाय, तुम्ही नियमित भरत आलेल्या प्रीमियमची रक्कम पैशांच्या स्वरुपात जमा झालेली असते. त्यामुळे ही संपूर्ण रक्कम थेट कुटुंबातील पुढच्या सदस्याला मिळते. ती व्यक्ती या रक्कमेचा वापर कर्ज फेडण्यासाठी, विम्याचा हफ्ता भरण्यासाठी व इतर संपत्ती निर्माण करण्यासाठी करू शकते. अशाप्रकारे, ही प्रक्रिया निरंतर सुरु राहते व एकाच कुटुंबांत पिढी दर पिढी पैसा हस्तांतरित होऊन संपत्ती वाढतच जाते.

योग्य नामनिर्देशित व्यक्तीची निवड करण्याची गरज

विम्याप्रमाणेच वॉटरफॉल मेथडमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे नामनिर्देशित व्यक्ती. योग्य नामनिर्देशित व्यक्तीची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, मृत्यूनंतर विम्याची संपूर्ण रक्कम त्या व्यक्तीला मिळते व या संपत्तीचा कसा वापर करायचा, याचे संपूर्ण अधिकार त्याच्याकडे असतात. तुम्ही व्यक्तीच्या जागी ट्रस्टला देखील नामनिर्देशित करू शकता.

ट्रस्टला नामनिर्देशित केल्याने संपत्तीचा कसा वापर करायचा, कोठे गुंतवणूक करायची, त्याचा योग्य उपयोग व व्यवस्थापन कसे करायचे हे ठरवता येते. अशाप्रकारे, योग्य प्रकारे केलेली गुंतवणूक संपत्तीत आणखी वाढ करण्यास मदत करते.

प्रसिद्ध रॉकफेलर कुटुंबाकडून याच पद्धतीचा संपत्ती निर्माण करण्यासाठी वापर करण्यात आला. रॉकफेलर कुटुंबाएवढी संपत्ती निर्माण करणे शक्य नसले तरीही तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी ही संकल्पना नक्कीच वापरणे शक्य आहे.