प्रश्न- माझे वय 28 वर्ष आहे. मला विमा पॉलिसी खरेदी करायची आहे. कोणती विमा पॉलिसी खरेदी केल्यास मला लाभांशाचा फायदा मिळेल? लांभाश देणारी पॉलिसी खरेदी केल्यास खरचं फायदा होईल का?
महामनीचे उत्तर – विमा पॉलिसी ही अनेकांच्या आर्थिक नियोजनाचा भाग असते. सध्याच्या महागाई व वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या काळात पॉलिसी खरेदी करणे हा योग्य निर्णय आहे. विम्यामुळे आर्थिक सुरक्षा प्रदान होते. मात्र, अशा काही विमा पॉलिसी आहेत, ज्यात तुम्हाला आर्थिक सुरक्षेसोबतच लाभांश व बोनसचा फायदा मिळतो.
तुम्ही पार्टिसिपेटिंग जीवन विमा पॉलिसी घेतल्यास तुम्हाला दरवर्षी लाभांशाचा फायदा मिळेल. पार्टिसिपेटिंग जीवन विमा पॉलिसी नक्की काय आहे व ही पॉलिसी खरेदी करणे खरचं फायद्याचे आहे का? हे समजून घेऊयात.
पार्टिसिपेंट जीवन विमा पॉलिसी काय आहे?
पार्टिसिपेंट पॉलिसी हा विमा पॉलिसीचा एक प्रकार आहे. हा एकप्रकारे विमा करार आहे, ज्या अंतर्गत विमाधारकाला लाभांश मिळतो. ही विमा पॉलिसी खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विमा कंपनीच्या नफ्यातील काही भाग विमाधारकाला मिळत असतो.
पार्टिसिपेंट विमा पॉलिसी घेणाऱ्या सर्वसाधारणपणे वर्षाला लाभांश किंवा बोनस दिला जातो. इतर कंपन्यांचे स्टॉक्स खरेदी केल्यानंतर ज्याप्रकारे लाभांश मिळतो, त्याच प्रमाणे ही विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्याला फायदा मिळतो. थोडक्यात, यामध्ये पॉलिसीचा कालावधी समाप्त झाल्यानंतर मिळणाऱ्या रक्कमेसोबत अतिरिक्त रक्कम देखील बोनस स्वरुपात दिली जाते. नॉन-पार्टिसिपेंट पॉलिसीमध्ये लाभांशाचा फायदा मिळत नाही.
कशाप्रकारे मोजला जातो लाभांश?
विमा कंपन्यांना आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याच्या आधारावर विमाधारकला लाभांश दिला जातो. लाभांश/बोनसची रक्कम ही विमा पॉलिसीच्या प्रीमियमवरून ठरते. विमा कंपनीला कोणताही फायदा झाला न झाल्यास लाभांश मिळत नाही.
वर्षाला किती लाभांश मिळेल हे कंपनीच्या नफ्यावरून ठरत असते. समजा, विमाधारकाने 20 लाख रुपये रक्कमेची (Sum Assured) पॉलिसी घेतली आहे व 1 हजार रुपयांवर 10 रुपये लाभांश दिला जातोय. अशाप्रकारे, वर्षाला 20 लाख रुपयांवर 20 हजार रुपये लाभांश मिळेल.जर तुमची पॉलिसी 10 वर्षांसाठी असल्यास मुदतीनंतर 20 लाख रुपये विमा रक्कम आणि 2 लाख रुपये लाभांश मिळेल.
लक्षात घ्या की, मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम ही विविध घटकांवर अवलंबून असेल. पॉलिसीमधील अटी, प्रीमियम रक्कम इत्यादीवरून ही रक्कम ठरते.
पार्टिसिपेंट विमा पॉलिसी कोणी घ्यावी?
इतर पॉलिसींच्या तुलनेत पार्टिसिपेंट विमा पॉलिसी महाग असते. तुम्ही जर केवळ आर्थिक सुरक्षेच्या उद्देशाने विमा पॉलिसी खरेदी करत असाल तर नॉन-पार्टिसिपेंट पॉलिसीकडे वळू शकता. मात्र, आर्थिक सुरक्षेसोबतच इतर फायदे हवे असल्यास पार्टिसिपेंट विमा पॉलिसीची निवड करू शकता. तुमचे उत्पन्न जास्त असेल तर पार्टिसिपेंट विमा पॉलिसी खरेदी करण्याची जोखीम स्विकारू शकता. मात्र, घरात एकमेव कमवणारी व्यक्ती असल्यास आर्थिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या नॉन-पार्टिसिपेंट पॉलिसीचा विचार करणे कधीही फायद्याचे ठरते.