लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (Life Insurance Policy) हा इन्शुरर म्हणजे इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुअर्ड म्हणजे पॉलिसीधारक किंवा विमाधारक यांच्यामधील एक कायदेशीर करार आहे. या करारान्वये इन्शुरन्स कंपनीने दिलेले आर्थिक संरक्षण पुरविण्याचे दिलेले वचन पूर्ण करावे, यासाठी पॉलिसीधारकाने किंवा त्याच्या कायदेशीर वारसाने केलेली मागणी म्हणजे “क्लेम” (Claim) होय. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कालावधीमध्ये आणि कारणामुळे परिस्थिती निर्माण झाल्यास क्लेम करण्याची वेळ येते. काही प्रसंगी पॉलिसी करारामधील अटींनुसार, क्लेमची पूर्तता (क्लेम सेटलमेंट) झाल्यावर पॉलिसी संपुष्टात येते, तर काही वेळेस पॉलिसी चालू देखील राहू शकते. अशावेळी पॉलिसीधारकाच्या नॉमिनीने किंवा संबंधितांनी नेमके काय केले पाहिजे याची माहिती आपण घेणार आहोत.
Table of contents [Show]
इन्शुरन्स क्लेम दोन प्रकारे सेटल केला जातो
- पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यावर निर्माण होणारा डेथ क्लेम (Death Claim)
- पॉलिसीधारकाच्या मृत्यू न झाल्यास निर्माण होणारे क्लेमस्
पॉलिसीधारकाच्या हयातीमध्ये क्लेमची परिस्थिती केव्हा निर्माण होते?
- पॉलिसी मॅच्युअर्ड (Matured) झाल्यावर - मॅच्युरिटी क्लेम
- गंभीर आजाराकरिता अतिरिक्त संरक्षण घेतले असता - “रायडर क्लेम”
- मनी-बॅक पॉलिसीजमध्ये वेळोवेळी रक्कमेचा परतावा
- पॉलिसी सरेंडर (surrender) केल्यास
लाईफ कव्हर केव्हा राहत नाही?
पॉलिसीधारकाचा मृत्यू हा पॉलिसी चालू असतानाच्या काळामध्ये झाला अथवा पॉलिसीधारकाच्या ह्यात असताना पॉलिसी मॅच्युअर्ड झाली असेल तर किंवा पॉलिसीधारकाने पॉलिसी सरेंडर (surrender) केली असेल तर पॉलिसी संपुष्टात येते. त्यामुळे कोणतेही विमा संरक्षण म्हणजे लाईफ कव्हर राहत नाही.
डेथ क्लेम कसा लागू होतो?
लाईफ इन्शुरन्सचा मुख्य उद्देश हा त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणे, हा असतो. पॉलिसीधारकाच्या मृत्यूमुळे इन्शुरन्स कंपनीकडे “डेथ क्लेम” केला जातो. इन्शुरन्स कंपनी मृत्यूची कारणे आणि परिस्थिती पाहून, पॉलिसीधारकाची नामनिर्देशित केली गेलेली व्यक्ती (म्हणजे नॉमिनी) किंवा त्याच्या पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कायदेशीर वारसदारांना जी रक्कम अदा करते, तिला मृत्यूचा विमाहक्क किंवा “डेथ क्लेम” म्हणतात.
मृत्यूमुळे निर्माण झालेल्या क्लेमचे 2 प्रकार कंपनी लक्षात घेते,
- Early क्लेम - पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसीचे संरक्षण प्राप्त झाल्यानंतरच्या तारखेपासून पहिल्या दोन वर्षांच्या आत झाल्यास इन्शुरन्स कंपनी अशा दाव्याला “Early क्लेम” म्हणते.
- Non-early क्लेम - पॉलिसीचे संरक्षण प्राप्त झाल्यानंतरच्या तारखेपासून पहिल्या दोन वर्षांनंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास केल्या गेलेल्या दाव्याला “Non-early क्लेम” म्हणतात.
पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्या पॉलिसीमधील नामनिर्देशित केलेला नॉमिनीने किंवा त्याच्या कायदेशीर वारसाने इन्शुरन्स कंपनीला तात्काळ कळविणे आवश्यक आहे. तसेच डेथ क्लेमसाठी दावा करताना खालील डॉक्युमेंट्स इन्शुरन्स कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे.
- डेथ क्लेम फॉर्म (नॉमिनीची आणि पॉलिसीधारकाची संपूर्ण माहिती भरलेला)
- पॉलिसीधारकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र अर्थात डेथ सर्टिफिकेट (12/17 नमुन्यामधील)
- MCOD म्हणजे मेडिकल कॉज ऑफ डेथ प्रमाणपत्र (अर्थात मृत्यूचे कारण सांगणारा वैद्यकीय अहवाल)
- पॉलिसी बॉण्ड
- बेनेफिशिअरी असलेल्या व्यक्तीची पॅन कार्ड कॉपी, चेकची कॉपी (बँकेचे खात्याचे डिटेलट्स), त्याचे ओळखपत्राची कॉपी आणि वास्तव्याचा दाखला
- पॉलिसीधारकाचे मागील इन्शुरन्स रेकॉर्ड्स
- एम्प्लॉयर सर्टिफिकेट अर्थात पॉलिसीधारक मृत्यूसमयी जिथे कार्यरत होता, त्या आस्थापनेच्या सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र
- पॉलिसीधारकाच्या मृत्यूचे कारण खून, अपघात अथवा आत्महत्या यांपैकी असल्यास पोलिसांचा प्राथमिक माहिती अहवाल (FIR), अंतिम अहवाल (final report) आणि शव-विच्छेदन (post-mortem report) ची कॉपी
- पॉलिसीधारकाचे सर्व जुने, नजीकचे मेडिकल रिपोर्ट्स, टेस्ट रिपोर्ट्स,
- अंत्यसंस्कारचे प्रमाणपत्र (Burial / Cremation Certificate)
नॉमिनी किंवा कायदेशीर वारदाराकडून प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक छाननी करून क्लेम स्वीकारते (Acceptance) किंवा नाकारते (Repudiation) किंवा अधिक माहितीकरिता आवश्यक कागदपत्रे मागवून घेऊ शकते.