महानगर किंवा शहरांमध्ये घर घ्यायचं म्हटलं की, गृहकर्जा शिवाय ते शक्य होत नाही. आणि अलीकडे रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणामुळे कर्जाचे व्याज दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कर्जंही महाग होतंय. अशावेळी तुमचं कर्ज जॉईंट म्हणजे संयुक्त नावावर असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकेल.
बँका अनेक प्रकारचे गृहकर्ज देतात, त्यापैकी एक म्हणजे संयुक्त गृह कर्ज ज्याला आपण 'जॉईंट होम लोन (Joint Home Loan)' असं सुद्धा म्हणतो. हे गृहकर्ज कसे असते, त्याचा फायदा काय, त्यावर कर सवलत मिळते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.
Table of contents [Show]
जॉईंट होम लोन म्हणजे काय?
जॉईंट होम लोन (Joint Home Loan) म्हणजे असं कर्ज, जे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत घेऊ शकता. अनेकजण असं कर्ज भावंडांसह किंवा पती-पत्नीसह घेतात. जॉईंट कर्जातही कलम 24 आणि कलम 80C नुसार कर कपातीचा लाभ मिळतो. जर दोन व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असेल तर, बँक त्यांना जॉईंट होम लोन देते. दोघांच्या उत्पन्नावर आधारित कर्जाची रक्कम बँकेकडून निर्धारित केली जाते.
आयकरात सवलत मिळते का?
जॉईंट होम लोन अंतर्गत, आयकर कलम 24 आणि कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ कर्ज घेणाऱ्याला घेता येतो. गृहकर्जासाठी जॉईंट होम लोन अंतर्गत अर्ज केल्याने, गृहकर्जावर उपलब्ध कर वजावट सह-अर्जदार (Co-applicants) स्वतंत्रपणे घेऊ शकतात, त्यासाठी त्यांना केवळ मालमत्तेचे सह-मालक असणं गरजेचं आहे. याशिवाय गृहकर्ज परतफेडीमध्ये त्यांचे योगदान आवश्यक आहे.
आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कमाल 1.50 लाख रुपये मर्यादेपर्यंत वजावटीसाठी पात्र आहेत. जर मालमत्ता स्वतःच्या ताब्यात असेल, तर गृहकर्जाच्या व्याजावर कलम 24 अंतर्गत कर वजावट मिळते. मालमत्ता सोडल्यास, संपूर्ण व्याज हे कर कपातीसाठी पात्र होते, म्हणजे त्यावर कमाल मर्यादा नसते. जॉईंट होम लोनमध्ये, सह-अर्जदार वजावटीसाठी वैयक्तिकरित्या पात्र असल्याने, करातून सवलत मिळवू शकतो.
जॉईंट होम लोनचे फायदे काय?
- जर दोन्ही व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला चांगल्या व्याजदराने मोठ्या प्रमाणात कर्ज मिळू शकते
- मोठ्या रकमेच्या कर्जामुळे तुम्हाला हवं असणारं घरं, तुम्ही हव्या त्या ठिकाणी खरेदी करू शकता
- यासह, जॉईंट होम लोनच्या बाबतीत, दोन्ही व्यक्ती प्राप्तिकर कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा दावा करू शकतात
- महिला अर्जदारांना बँकेकडून कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते
- कर्जाची परतफेड करताना हप्ता विभागाला गेल्याने कर्ज फेडण्याची जवाबदारीही विभागली जाते
यासाठी कमी व्याजदर मिळतो का?
अनेक बँका किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्या महिला खरेदीदारांना कमी व्याजदरात जॉईंट होम लोन देतात. हे व्याजदर 0.5 इतके कमी असू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, तर एखाद्या महिलेला अर्जदार बनवून कमी व्याजावर कर्ज घेऊ शकता. बरेच जण आपल्या आईला (Mother) किंवा पत्नीच्या (Wife) नावाने गृहकर्ज घेतात. त्यामुळे बँका त्यावर कमी व्याजदर (Lowest Interest) आकारतात.
जॉईंट होम लोनचे तोटे काय?
जॉईंट होम लोनचे घेणं थोडं धोक्याचं असू शकतं, कारण जर तुमचा पार्टनर कर्जाचा ईएमआय (EMI) भरत नसेल, तर कर्जाचा भार तुमच्यावर पडू शकतो. यामुळे क्रेडिट स्कोर देखील खराब होऊ शकतो. यासोबतच कर्ज फेडण्याच्या प्रक्रियेत तुम्ही इतर कर्जातही अडकू शकता. त्यामुळे योग्य नियोजन करून आणि उत्पन्नाचा सोर्स तपासून तुम्ही जॉइंट होम लोन घेऊ शकता.