महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (RBI) 8 फेब्रुवारी 2023 रोजी रेपो दरात 0.25 बेसिस पॉईंटने वाढ करून कर्जदात्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. या वाढीनंतर आरबीआयचा (RBI) नवा रेपो दर हा 6.50 टक्के झाला असून पूर्वी तो 6.25 टक्के इतका होता.
रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. या व्याजदर वाढीमुळे पुन्हा एकदा ग्राहकांची कर्जे महागली असून कर्जदात्यांच्या ईएमआयमध्ये (EMI Hike) वाढ झाली आहे. त्यामुळे कर्जदात्यांना आता अतिरिक्त कर्ज भरावे लागणार आहे, ते कसं याचं सोप्या पद्धतीने गणित समजून घेऊयात.
Table of contents [Show]
सलग 6 वेळा रेपो दरात वाढ
आर्थिक वर्ष 2022-23 च्या सुरूवातीपासूनच आरबीआयने (RBI) महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला. परंतु त्यामध्ये आरबीआयला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आरबीआयने या आर्थिक वर्षात मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या (Monetary Policy Committee) एकूण 8 बैठका घेतल्या.
या 8 बैठकीत एमपीसीने 6 वेळा व्याजदरात वाढ केली. ही वाढ मे 2022 पासून आतापर्यंत एकूण 2.50 टक्के झाली आहे. याचा थेट परिणाम असा झाला की, खाजगी आणि सरकारी दोन्ही बॅंकांनी वेळोवेळी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. ज्यामुळे ग्राहकांना वर्षभरात 6 वेळा याचा भुर्दंड सहन करावा लागला. बॅंकांनी गृहकर्जासोबत इतर सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या ईएमआयमध्ये (EMI) वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मधील एप्रिल 2022 मध्ये रेपो दर (Repo Rate) 4 टक्के होता. त्यानंतर 4 मे 2022 रोजी रेपो दरात 0.40 बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आली. त्यानंतर लगेचच 8 जूनला 0.50 बेसिस पॉईंटची वाढ झाली, 30 सप्टेंबरमध्ये 0.50 बेसिस पॉईंटची वाढ केल्यानंतर, 7 डिसेंबरला 0.35 बेसिस पॉईंट आणि त्यानंतर आता 8 फेब्रुवारीला 0.25 बेसिस पॉईंटने व्याजदरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या आरबीआयचा रेपो दर 6.50 टक्के इतका झाला आहे.
गृहकर्जाच्या हप्त्याचे गणित काय?
आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर सर्वसामान्य माणसाचा गृहकर्जाच्या हप्ता कसा वाढला हे समजून घेण्यासाठी महामनीने गृहकर्ज तज्ज्ञ मोहित गोखले यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की,
‘हे गणित सोप्या पद्धतीने समजून घ्यायला हवे. असे समजूया की एखाद्या व्यक्तीने 30 लाखाचे गृहकर्ज बँकेतून घेतले आहे. हे कर्ज त्याने मे 2022 पूर्वी 6.50% व्याजदराने 20 वर्षांसाठी घेतले आहे. या व्यक्तीला दरमहा 22,368 रुपये ईएमआय भरावा लागत होता, मात्र आता रेपो रेट वाढल्यामुळे त्याचा व्याजदर हा 9% झाला आहे आणि त्यानुसार त्याचा ईएमआय प्रतिमाह 26,992 रुपयांवर पोहचला आहे. याशिवाय त्याचा व्याजदरातही वाढ झाली आहे. महिन्यापाठी गृहकर्जाच्या हप्त्यात 4624 रुपयांची वाढ झालीये तर व्याजदरात 6250 रुपयांची वाढ झाली आहे.
30 लाख रुपयांचे गृहकर्ज 20 वर्षाच्या कालावधीनुसार किती रुपयांनी महागले हे खालील तक्त्याच्या मदतीने समजून घेऊयात.
पुढे मोहित गोखले यांनी 30 वर्षाच्या कर्जाचे गणित ही सोप्या पद्धतीने समजून सांगितले. ते म्हणाले की, वरील समीकरणाप्रमाणे जर 30 लाख रुपयांचे कर्ज 30 वर्षाच्या मुदतीवर घेतले तर 6.50% व्याजदराच्या हिशोबाने मासिक 18,963 रुपये ईएमआय लागत होता मात्र आता रेपो रेट वाढल्यामुळे त्याचा व्याजदर हा 9% झाला आहे, आणि त्यानुसार त्याचा ईएमआय प्रतिमाह 24,139 रुपये झाला आहे. याशिवाय त्याचा व्याजदरात ही वाढ झाली आहे. महिन्यापाठी गृहकर्जाच्या हप्त्यात 5176 रुपयांची वाढ झालीये तर व्याजदरात 6250 रुपयांची वाढ झाली आहे.
30 लाख रुपयांचे गृहकर्ज 30 वर्षाच्या कालावधीनुसार किती रुपयांनी महागले हे खालील तक्त्याच्या मदतीने समजून घेऊयात.
गोखले पुढे म्हणाले की, ‘कर्जाचे विभाजन हे मुळात 20% मूळ कर्ज आणि 80% व्याज (interest)अशा स्वरूपात असते. मात्र 2.50% ने रेपो रेट वाढल्यामुळे 80% व्याजाचे गणित वाढून 95 ते 100% पर्यंत पोहचले आहे. म्हणजे मूळ कर्ज न वाढता व्याजदर वाढल्याने ते कव्हर करण्यासाठी ईएमआयमध्ये वाढ करण्यात आली आहे.’
पुढे गोखले सांगतात की, ‘ज्याप्रमाणे ईएमआयमध्ये वाढ झाली आहे त्याच प्रमाणे कर्ज फेडण्याचा कालावधीही 2 ते 3 वर्षांनी वाढला आहे. यामुळे चाळीशीत कर्ज घेतलेल्या लोकांना 60 नंतरही कर्ज फेडावे लागू शकते.’
रेपो दर का वाढले ?
देशातील किरकोळ महागाईचा दर गेल्या काही महिन्यांपासून 6 टक्क्यांच्या वर पाहायला मिळाला. तो आरबीआयने निर्धारित केलेल्या टार्गेटपेक्षा जास्त होता. महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि तिचा दर आटोक्यात येत नसल्याने जगभरात आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळतंय. जगभरातील अनेक बँकांनी त्यांच्या रेपो दरात वाढही केलीये.
सध्या महागाई दर आटोक्यात आहे; पण जगभर सुरू असलेल्या जागतिक मंदीमुळे आरबीआयने ठोस उपाययोजना करण्याचा विचार केला आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी खर्च आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आरबीआयची पतधोरण समिती ही रेपो दरात वाढ करण्याच्या सूचना देत असते.
आरबीआयची पतधोरण समिती नक्की काय आहे?
रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीचे (Monetary Policy Committee) अध्यक्ष हे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das, RBI Governor) आहेत. त्यांच्यासमवेत इतर 5 सदस्य ही या समितीमध्ये कार्यरत आहे