सर्वसाधारणपणे वयाच्या 60 ते 65 वर्षांचे होईपर्यंत आपण काम अथवा व्यवसाय करतो. या वयानंतर अनेकजण निवृत्ती घेतात. वयाच्या 65व्या वर्षानंतर आधीच्या क्षमतेप्रमाणे काम करणे शक्य होत नाही. याशिवाय, योग्य आर्थिक नियोजन केलेले नसल्यास व पेन्शन मिळत नसल्यास निवृत्तीने इतरांवर अवलंबून राहावे लागते. निवृत्तीनंतर वैद्यकीय खर्चाचे नियोजन कसे करायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो.
वयासोबतच अनेक आजारपणात देखील वाढ होते व उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे आधीपासूनच वैद्यकीय खर्चाचे नियोजन केल्यास निवृत्तीनंतर कोणतीही समस्या येणार नाही. निवृत्तीनंतरच्या वैद्यकीय खर्चाचे योग्य नियोजन कसे करायचे याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा नक्कीच फायदा होईल.
निवृत्तीनंतरच्या वैद्यकीय खर्चाचे असे करा योग्य नियोजन
पैशांचे करा बचत – तुमचा महिन्याचा पगार कितीही असला तरीही पैशांची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ वैद्यकीय खर्चासाठीच नाही तर निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगण्यासाठी पैसे अत्यंत गरजेचे आहेत. तुम्हाला आधीपासूनच एखादा आजार असल्यास त्यासाठी महिन्याला येणाऱ्या खर्चाची नोंद ठेवू शकता. तसेच, डॉक्टरची फी, औषधे, टेस्ट-सर्जरी अशा गोष्टींसाठी भविष्यात किती खर्च येऊ शकता, याचा अंदाज घेऊन बचत करण्यास सुरुवात करा.
निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्त्रोत कमी होतो. अशावेळी अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे चुकीचे ठरते. तुम्हाला आर्थिक नियोजनाची सवय लावावी लागेल. कर्ज काढलेले असल्यास निवृत्तीच्याआधीच त्याची परतफेड करणे फायद्याचे ठरते.
इमर्जेंसी फंड – भविष्यात अचानक कोणती समस्या उदभवू शकते, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे कोणतीही स्थितीसाठी तयार राहणे गरजेचे आहे, खासकरून आर्थिक समस्येसाठी. यासाठी तुम्ही आधीपासूनच इमर्जेंसी फंडची तरतूद करू शकता. या इमर्जेंसी फंडचा तुम्ही भविष्यात कधीही वापर करू शकता.
कमीत वयात करा गुंतवणुकीला सुरुवात – जेवढ्या कमी वयात तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढी अधिक रक्कम निवृत्तीनंतर तुमच्या हातात असेल. तुम्ही कमी वयातच वेगवेगळ्या संपत्तीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता. याशिवाय, फिक्स्ड डिपॉजिट, म्युच्युअल फंड, सोने हे देखील गुंतवणुकीचे चांगले मार्ग आहेत.
वैद्यकीय सुविधेसाठी वर्षाला लाखो रुपये खर्च येतो. वयोवृद्ध जोडप्याने निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी सर्वसाधारणपणे 10 ते 15 लाख रुपयांची बचत करणे गरजेचे आहे. तुम्ही दरमहिना ठराविक रक्कम बचत म्हणून बाजूला काढून ठेवू शकता. याचा फायदा भविष्यात होईल.
विमा खूपच महत्त्वाचा – निवृत्तीनंतरच्या वैद्यकीय खर्चासाठी विमा हा तुमचा एकमेव आधार ठरू शकतो. तुम्हाला पेन्शन सुरू असले तरीही इतर दैनंदिन खर्चासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे योग्य विमा पॉलिसीची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. वयाच्या 65-70 वर्षानंतर देखील तुमच्या वैद्यकीय खर्चाची गरज पूर्ण करू शकेल, अशा विमा पॉलिसीची निवड करा. मात्र, लक्षात घ्या की नियमित पॉलिसीच्या तुलनेत या विमा पॉलिसीची किंमत जास्त असू शकते.
चांगल्या आरोग्यासाठी करा गुंतवणूक – कामाच्या व्यापामुळे आपण अनेकदा शरिराकडे दुर्लक्ष करतो. मात्र, ज्याप्रमाणे पैशांची गुंतवणूक केली जाते, तसेच आरोग्यासाठी देखील गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही चांगला आहार, व्यायामाद्वारे शरीराला आजारापासून दूर ठेवू शकता. शरीर चांगले असल्यास हॉस्पिटलचा खर्चही येणार नाही.
तसेच, तुम्ही ब्रँडेड औषधांच्या तुलनेत स्वस्तात उपलब्ध असणारी जेनेरिक औषधे वापरू शकता. याशिवाय, वयोवृद्ध व्यक्तींसाठी सरकारद्वारे अनेक चांगल्या आरोग्य योजना राबवल्या जातात. तुम्ही या अनेक सरकारी योजनांचा देखील फायदा घेऊ शकता.