आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याची प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजेच, केवळ पगाराच्या खर्चावर अवलंबून न राहता उत्पन्नाचा असा एक स्त्रोत असावा, ज्याद्वारे अगदी निवांत आयुष्य जगता येईल. खासकरून, फारशी गुंतवणूक केलेली नसल्यास निवृत्तीनंतर पैशांची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे आधीपासूनच योग्य आर्थिक नियोजन केल्यास तुम्ही भविष्यातील योजनांसाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. यासाठी सिस्टेमॅटिक विड्रॉवल प्लॅन (systematic withdrawal plan) आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते.
Systematic Withdrawal Plans (SWP) आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या योजनेद्वारे तुम्ही कशाप्रकारे आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होऊ शकतो, याविषयी या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.
Systematic Withdrawal Plan (SWP) म्हणजे काय?
सिस्टेमॅटिक विड्रॉव्हल प्लॅन म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून विशिष्ट कालावधीनंतर टप्प्याटप्प्याने ठराविक रक्कम काढणे. म्हणजेच, तुम्ही दरमहिन्याला तुमच्या गरजेनुसार ठराविक रक्कम काढू शकता. खासकरून, निवृत्तीनंतर अथवा तुमची नोकरी गेल्यास अशी प्रकारची योजना तुमच्या खूपच उपयोगी येते. तुम्ही म्युच्युअल फंड अथवा इतर गुंतवणुकीमधून ठराविक कालावधीने (महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याने) रक्कम काढू शकता. यामुळे अडचणीच्या काळात कोणतीही आर्थिक समस्या निर्माण होत नाही.
समजा, तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये 5 लाख रुपये जमा झाले आहेत व तुम्हाला पुढील काही महिन्यात पैशांची खूपच गरज आहे. असा स्थितीमध्ये तुम्ही SWP पद्धतीने दरमहिन्याला 50 हजार रुपये काढू शकता. अशाप्रकारे, पुढील 10 महिने तुम्हाला 50 हजार रुपये मिळतील व तुम्ही तुमचा खर्च याद्वारे भागवू शकता. मात्र, सिस्टेमॅटिक विड्रॉव्हल प्लॅनची रक्कम ठरवताना तुमच्या भविष्यातील योजना, वाढणारी महागाई, हॉस्पिटलचा खर्च व इतर खर्चाचा देखील विचार करा.
दीर्घकालीन गुंतवणुकीने भविष्य होईल सुकर
तुम्ही कोणत्याही मोठ्या गुंतवणुकदाराला विचारल्यास तुम्हाला अल्प मुदतीऐवजी दीर्घकालीन गुंतवणुकीचाच सल्ला दिला जाईल. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये असलेली कमी जोखीम. दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे तुम्ही भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते व चांगल्या आयुष्यासाठी नोकरीवर अवलंबून राहावे लागणार नाही. सिस्टेमॅटिक विड्रॉव्हल प्लॅन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची सांगड घालून भविष्य सुकर बनवू शकता.
मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक करताना कमी वयात सुरुवात केल्यास नक्कीच फायदा मिळू शकतो. तसेच, शेअर्स, बाँड्स, रिअल इस्टेट, रिटायरमेंट अकाउंट अशा वैविध्यपूर्ण पोर्टफोलियोमध्ये नियमित गुंतवणूक केल्यास अधिक फायद्याचे ठरते.
SWP आणि दीर्घकालीन गुंतवणुकीने असे मिळेल आर्थिक स्वातंत्र्य
तुम्ही एकरकमी मोठी गुंतवणूक करून त्यावर मिळणाऱ्या परताव्याला ठराविक कालावधीने काढू शकता. यामुळे तुमची मूळ रक्कम तशीच राहिल व दरमहिन्याला ठराविक पैसे देखील मिळतील. समजा, तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये 10 लाख रुपये जमा झाले आहेत. तुम्ही या रक्कमेला एकाचवेळी काढण्याऐवजी SWP द्वारे दरमहिना 10 हजार रुपयांनी काढू शकता. तुम्ही या रक्कमेत तुमच्या खर्चानुसार व कालावधीप्रमाणे बदल करू शकता. अशाप्रकारे, पुढील काही वर्ष तुम्हाला दरमहिन्याला 10 हजार रुपये मिळतील व इतर रक्कम बाजारातील स्थितीनुसार कमी-जास्त होईल.