Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Leave Encashment: कंपनी लिव्ह इनकॅशमेंटचा फायदा घेण्यापासून कर्मचाऱ्यांना रोखू शकते का? जाणून घ्या काय आहे नियम

Leave Encashment

Image Source : https://www.freepik.com/

कर्मचाऱ्यांना अर्जित रजांचा मोबादला हवा असल्यास त्यांना इनकॅश करण्यापासून रोखता येणार नाही, हा त्यांचा हक्क आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.या निर्णयाचा सर्वच कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

कोणत्याही व्यक्तीला लिव्ह इनकॅशमेंटचा फायदा घेण्यापासून रोखणे हे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन असल्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लिव्ह इनकॅशमेंट अर्थात अर्जित रजेचा मोबादला मिळत नाही. अनेकांना लिव्ह इनकॅशमेंटच्या फायद्याबद्दल माहितीही नसते. अशा कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

लिव्ह इनकॅशमेंट म्हणजे नक्की काय? या अंतर्गत किती भरपगारी सुट्ट्या मिळू शकतात व याचा फायदा तुम्हाला कसा मिळेल? याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

घटनात्मक हक्कांचे उल्लंघन

दत्ताराम सावंत आणि इतर विरुद्ध विदर्भ कोकण ग्रामीण बँक या खटल्याच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने लिव्ह इनकॅशमेंटबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान म्हटले की, लिव्ह इनकॅशमेंट पगाराच्या समानच आहे. हा संपत्तीचा भाग आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवणे हा संविधानाच्या कलम 300 चे उल्लंघन आहे. 

प्रीव्हलेज लिव्ह या एकप्रकारच्या अर्जित रजा आहेत. जर या रजा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या असतील, तर याचा मोबादला मिळण्यास ते पात्र आहेत. कर्मचाऱ्यांना या अर्जित रजांचा मोबादला हवा असल्यास त्यांना इनकॅश (नगदीकरण) करण्यापासून रोखता येणार नाही, हा त्यांचा हक्क आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा लिव्ह इनकॅशमेंटचा मोबदला न मिळालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

लिव्ह इनकॅशमेंटचा कसा मिळेल फायदा ?

खासगी असो अथवा सरकारी, प्रत्येक कर्मचाऱ्यांना लिव्ह इनकॅशमेंटचा फायदा मिळतो. कर्मचाऱ्यांना कंपनीनुसार महिन्याला अथवा वर्षाला ठराविक सुट्ट्या मिळत असतात. यामध्ये सिक लिव्ह (Sick Leave), प्रिव्हलेज लिव्ह (Privilege Leave), कॅज्यूअल लिव्ह (Casual Leave) आणि अर्न्ड लिव्हचा (Earned Leave) समावेश असतो. कर्मचारी आपल्या सोयीनुसार या सुट्ट्यांचा लाभ घेऊ शकतात. परंतु, अनेकदा सर्वच सुट्ट्यांचा लाभ न घेतल्याने काही सुट्ट्या वर्षाखेर बाकी राहतात. अशा जमा झालेल्या सुट्ट्यांचे कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात. यालाच लिव्ह इनकॅशमेंट म्हटले जाते.

लिव्ह इनकॅशमेंट अंतर्गत किती सुट्ट्यांचा फायदा मिळेल, हे कंपनीनुसार ठरते. खासगी कंपनीत वर्षाला सर्वसाधारणपणे 30 सुट्ट्या इनकॅशमेंट करतात. तर सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीच्या संपूर्ण कालावधीत 240 ते 300 सुट्ट्यांचा लाभ इनकॅशमेंट अंतर्गत मिळतो. याशिवाय, इनकॅशमेंट अंतर्गत मिळणारी रक्कम 25 लाख रुपयांपर्यंत करमुक्त असते. कर्मचारी नोकरी सोडल्यानंतर अथवा निवृत्तीनंतर जमा झालेल्या या सुट्ट्या इनकॅश करू शकतात.