आपल्याला पुरेसे मासिक उत्पन्न (Monthly Income) मिळायला सुरुवात झाली की, खर्च वजा करता आपण उर्वरित रकमेची गुंतवणुक करण्याचा विचार करतो. ही गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. परंतु बँकेमधील एफडीमध्ये (Bank FD) पैसे गुंतवण्याकडे बहुसंख्य लोकांचा कल पाहायला मिळतो. सध्या बँकांकडे देखील वेगवेगळ्या योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो.
1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात (New Financial Year Start) झाली आहे. तेव्हा आताच गुंतवणूक करून चांगला परतावा (Returns) तुम्ही मिळवू शकता. देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) दोन विशेष मुदत ठेव योजना (FD Schemes) सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर 7.9 टक्के व्याजदर मिळत आहे.
एसबीआय सर्वोत्तम स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट
एसबीआय बँकेच्या सामान्य बचत खात्यात मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा ‘एसबीआय सर्वोत्तम स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट योजनेत’ (SBI Sarvottam Special Fixed Deposit) जास्त व्याजदर देण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.9 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर एका वर्षासाठी 7.6 टक्के व्याजदर दिला जात आहे. या योजनेतील किमान गुंतवणूक ही 15 लाखापासून सुरू होते तर, कमाल गुंतवणूक 2 कोटी रुपयांपर्यंत करता येते. मात्र एनआरआय (NRI) व्यक्ती किंवा एसबीआय बँक कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत.
एसबीआय वी केअर स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट
एसबीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे, 'एसबीआय वी केअर स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट' (SBI We Care Special Fixed Deposit). दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना सर्वात चांगली आहे. यामध्ये कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 वर्ष गुंतवणुकीचा कालावधी देण्यात आला आहे. ही एफडी योजना 2020 साली सुरू करण्यात आली असून यामध्ये गुंतवणूकदार 30 जून 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात.
ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) यामध्ये 7.50 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बँकेला भेट द्यावी लागेल किंवा नेट बँकिंग, Yono app द्वारे गुंतवणूक करता येईल. महत्त्वाचे म्हणजे यातील गुंतवणुकीवर कर्जही काढता येते. यातील व्याज हे मासिक, त्रैमासिक, सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा मिळते. मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मात्र टीडीएस (TDS) कापून गुंतवणूकदाराला रक्कम दिली जाते.
(डिसक्लेमर: महामनी' कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. वाचकांनी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)