आर्थिक वर्ष 2023 मध्ये ITR भरण्या संदर्भात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. करदात्यांना या बदललेल्या नियमांबाबत माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आयटीआर फाइल (ITR filing) करताना तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. आयटीआर विवरण पत्र भरत असताना नेमके कोणते बदल झाले आहेत, त्याबद्दलची माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया..
आर्थिक वर्ष 2023 मध्ये आयटीआरचे विवरण पत्र भरण्यासाठी पुढील 5 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
Table of contents [Show]
कलम 89 अन्वये सवलतीचा दावा करणे-
जर करदात्याला त्याच्या पगाराची रक्कम 'थकबाकीत किंवा आगाऊ' मिळाली असेल, किंवा थकबाकीमध्ये कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळाले असेल, तर आयकर कायदा तुम्हाला कलम 89(1) अंतर्गत कर सवलतीचा दावा करण्याची परवानगी देतो. कलम 89नुसार कर सवलतीचा दावा करण्यासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्याला फॉर्म 10E सबमिट करणे आवश्यक आहे.ते आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाइन दाखल करावे लागेल.कलम 89(1) नुसार,ज्या वर्षात थकबाकी प्राप्त झाली आहे आणि ज्या वर्षाशी संबंधित आहे त्या वर्षासाठी कराच्या पुनर्गणनेद्वारे कर सवलत प्रदान केली जाते.
कलम 80G अन्वये कर सवलतीचा दावा करण्यासाठी पुरावा - Tax deduction under section 80g
आयटीआर फाइल करत असताना कलम 80G च्या सुधारित तरतुदींनुसार,कर सवलत मिळावी हा दावा तुम्ही केला असेल तर करदात्याला देणगी प्रमाणपत्र donation certificate ज्या संस्थेला देणगी दिली आहे, त्याचे आयकर पोर्टलवरून डाउनलोड केलेले प्रमाण पत्र पुरावा म्हणून सादर करणे गरजे आहे. यापूर्वी कलम 80G अंतर्गत आर्थिक वर्ष 2020-21 पर्यंत देणगीदार केवळ संस्थांनी जारी केलेल्या देणगीच्या पावत्यांवर आधारित कर कपातीचा दावा करू शकत होते. मात्र आता अशा देणगी (Donation) प्रमाणपत्राचा फॉर्म 10B मध्ये तपशील देणे गरजेचे आहे.
इंट्राडे ट्रेडिंगची माहिती Intraday trading details
इंट्राडे ट्रेडिंग मधून झालेला नफा हे आयकर कायद्यानुसार भांडवली नफा म्हणून वर्गीकरण केलेले नसले तरी ते व्यवसाय उत्पन्न मानले जाते.इंट्राडे करणाऱ्यांनी त्यांच्या आयकर विवरणपत्रात (आयटीआर) इंट्राडेमधून झालेल्या नफा / तोट्यांचा वेगवेगळ्या प्रकारे तपशील द्यावा लागतो. त्यामुळे आयटीआर भरत असताना तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगचा तपशील सोबत ठेवा.
व्हर्चुअल डिजिटल असेट्सचा तपशील (VDA)
नवीन नियमांनुसार आता व्हर्चुअल डिजिटल असेट्सचा तपशील (VDA) म्हणजेच आभासी मालमत्तेवर देखील कर आकारला जातो. म्हणजेच तुम्हाला क्रिप्टो करन्सी मधून झालेल्या नफ्यावर देखील आता 30 टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आयटीआर (ITR) फाइल करताना व्हर्चुअल डिजिटल असेट्सचा तपशील द्यावा लागणार आहे. जर आभासी मालमत्ता तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत असेल तर तुम्हाला ITR-2 किंवा ITR-3 भरावा लागेल.
व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती
आयटीआर फॉर्म भरत असताना तुमच्या उत्पन्नामध्ये व्याजाच्या रकमेचा समावेश असेल तर तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागणार आहे. व्याजाच्या उत्पन्नावरही टीडीएस घेतला जाऊ शकतो.त्यामुळे तुम्हाला आयटीआर फाइल करताना ही माहिती द्यावी लागेल.