Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Tax Saver Fund: गुंतवणूक आणि करबचत होईल एकाचवेळी; HDFC च्या म्युच्युअल फंडबद्दल जाणून घ्या

HDFC Tax Saver Fund

Image Source : www.hdfcbank.com

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीमध्ये (ELSS) गुंतवणूक करून तुम्ही करबचत करू शकता. तसेच दीर्घकाळात संपत्तीही निर्माण होईल. या योजनेला 3 वर्षांचा लॉक इन पिरियड आहे. या फंडाद्वारे कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक केली जाते, जोखीम किती? मागील काही वर्षात किती टक्के परतावा दिला, सर्व माहिती जाणून घ्या.

HDFC Tax Saver Fund: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आणि करबचत एकाच वेळी करायची असेल तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) फायद्याची ठरू शकते. आयकर कायद्यातील 80C नुसार दीड लाखांपर्यंतच्या रकमेवर करबचत करता येईल आणि सोबतच इक्विटीमधील गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळू शकतो. मात्र, इक्विटी फंड असल्याने अती जोखीमही त्यासोबत येते. या लेखात HDFC Tax Saver Fund बद्दल जाणून घेऊया.   

HDFC टॅक्स सेव्हर फंड योजना?

HDFC म्युच्युअल फंडद्वारे ही योजना राबवली जाते. हा फंड 2 एप्रिल 1996 साली सुरू झाला आहे. फंडमध्ये एकूण गुंतवणूक 11285 कोटी रुपये आहे. 10 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक असणाऱ्या काही ठराविक योजनांपैकी ही एक स्कीम आहे. तसेच या फंडला 5 स्टार रेटिंग आहे. दीर्घकाळात किती परतावा दिला यावरून ही रेटिंग काढली जाते. त्यामध्ये हा फंड पुढे असल्याचे दिसते. 

या फंडमध्ये तुम्ही डायरेक्ट (थेट) आणि रेग्युलर (ब्रोकर्सद्वारे) गुंतवणूक करू शकता. डायरेक्ट म्हणजे थेट HDFC म्युच्युअल फंडच्या संकेतस्थळावर जाऊन गुंतवणूक करू शकता. तर ब्रोकर कंपनीद्वारे रेग्युलर पद्धतीने गुंतवणूक करता येईल. रेग्युलर योजनेमध्ये फंडचा एक्सपेन्स रेशो (फंड हाऊसच्या खर्चाचे प्रमाण) 1.75% आहे. तसेच टॅक्स सेव्हर स्कीम असल्याने तीन वर्षांचा लॉक इन पिरियड आहे. म्हणजेच तीन वर्ष योजनेतून पैसे काढता येणार नाहीत. 

सर्वाधिक गुंतवणूक कुठे?

HDFC स्टॉक सेव्हर स्कीमद्वारे 95.64% गुंतवणूक देशांतर्गत कंपन्यांच्या इक्विटीमध्ये (शेअर्समध्ये) केली जाते. यापैकी 67.45% लार्ज कॅप कंपन्या, 9.3% मिड कॅप आणि 6.23% स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये फंड मॅनेजर बदल करू शकतो. तसेच परतावाही कमी जास्त होऊ शकतो. 

हा फंड Nifty 500 TRI बेंचमार्कवर आधारित आहे. सध्या या फंडची प्रति युनिट किंमत 965 रुपये आहे. भांडवली बाजारातील चढउतारानुसार NAV बदलत असतो. जोखमीचा विचार करता हा फंड अती जोखीम गटात मोडतो. म्हणजेच परताव्या सोबत मुद्दल गमावण्याचीही वेळ येऊ शकते. मात्र, दीर्घकाळात फंडमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. 

योजनेतून परतावा किती?

या योजनेने मागील एक वर्षात सुमारे 28 टक्के परतावा दिला आहे. तर तीन वर्षात सुमारे 29% परतावा दिला. पाच वर्षांचा विचार करता या योजनेने सुमारे 12% परतावा दिला आहे. तर फंड सुरू झाल्यापासूनचा विचार करता सरासरी 18% परतावा दिला आहे. 

फंड हाऊसद्वारे सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या कंपन्यांमध्ये?

HDFC tax saver fund द्वारे ICICI बँकेच्या शेअर्समध्ये 9.17% गुंतवणूक आहे. HDFC बँकेत 8.91%, भारती एअरटेल 5.69%, हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनध्ये सुमारे 5 टक्के गुंतवणूक केली आहे. सोबतच सिप्ला, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा ऑटो, इन्फोसिस, एचसीएल या प्रत्येक कंपनीत  4 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक आहे. 

(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)