सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी भरवशाची आणि चांगला परतावा मिळवून देणारी सरकारी योजना म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंड फंड योजना (PPF Scheme). केंद्रसरकारने 1968 साली ही सुरु केली. या योजनेअंतर्गत लोकं पोस्टातील PPF खात्यात महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकतात. यावर सरकार चांगला व्याजदरही देतं. 15 वर्षाच्या मॅच्युरिटीनंतर यातून चांगला परतावाही मिळतो.
महत्त्वाचं म्हणजे कर बचतीसाठी या गुंतवणुकीचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही देखील पोस्टाच्या पब्लिक प्रोव्हिडंड फंड योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या योजनेविषयीच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहोत. याशिवाय किती गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 1 करोड रुपये मिळू शकतात ते ही पाहूया.
Table of contents [Show]
पोस्टाच्या पीपीएफ बचतीवर व्याजदर किती?
आपल्या प्रत्येकालाच करोडपती व्हायची इच्छा असते, पण त्यासाठी आर्थिक नियोजन आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. पोस्टाच्या पब्लिक प्रोव्हिडंड फंड योजनेतील (PPF Scheme) खात्यावर सरकारकडून सध्या 7.1 टक्के व्याजदर (Interest) दिला जात आहे. दरवर्षी साधारण बजेटच्या सुमारास हा व्याजदर अपडेट होतो. म्हणजे नवीन आर्थिक वर्षासाठी व्याजदर किती असणार हे सरकार ठरवतं. त्यानुसार, तुमच्या खात्यात दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम जमा होत असते.
बँकांच्या बचत खात्यावरील व्याजदरापेक्षा हा व्याजदर सर्वात जास्त आणि चांगला आहे.
गुंतवलेल्या रकमेची हमी आहे का?
पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF Scheme) ही सरकारी योजना असल्याने तुमच्या गुंतवणुकीला सरकारकडून सुरक्षा प्राप्त होते. याचा सरळ अर्थ असा की, तुमच्या पैशाची हमी सरकार घेतं. त्यामुळे यामध्ये कोणतीही मोठी जोखीम नाही. पोस्टात पीपीएफ खात्यावरही ही सुरक्षा मिळते.
खातं कसं उघडायचं?
तुम्हाला पोस्टाच्या पब्लिक प्रोव्हिडंड फंड योजनेत (PPF Scheme) गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला पीपीएफ खाते ओपन करावे लागेल. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खाते ओपन करू शकता, किंवा तुमच्या बँकेमध्ये देखील पीपीएफ खाते ओपन करू शकता. हे खाते ओपन करून तुम्ही यामध्ये मासिक स्वरुपात गुंतवणूक करू शकता.
कोण गुंतवणूक करू शकतो?
या योजनेत भारतीय नागरिक असलेली कुणीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. अगदी कमीत कमी 500 रुपयांपासून ही गुंतवणूक करता येते. यासाठी सुरुवातीला 15 वर्षाचा लॉक इन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर प्रत्येकी 5 वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. वर्षाला तुम्ही या खात्यात 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता आणि कर सवलतीचा लाभही घेऊ शकता.
यातील गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याजदर (Interest) मिळत असल्याने तुम्हाला चांगला आणि उच्च परतावा मिळू शकतो. मुलांचे उच्च शिक्षण, लग्न किंवा घर खरेदी यासारखी महत्त्वाची कामे तुम्ही यातून पूर्ण करू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यामध्ये विचारपूर्वक आणि नियोजनाने गुंतवणूक केली, तर तुम्ही 1 करोड रुपये सहज मिळवू शकता. त्यासाठी किती रक्कम मासिक (Monthly Invest) स्वरुपात गुंतवावी लागेल, याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे.
अशी गुंतवणूक केल्यानंतर मिळतील 1 करोड रुपये
पब्लिक प्रोव्हिडंड फंड योजनेत (PPF Scheme) गुंतवणूक करून तुम्हीही 1 करोड रुपये मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला महिन्याला 12,500 रुपये गुंतवावे लागतील. साहजिकच तुमचा लॉक इन पिरीयड 15 वर्षाचा असल्याने 15 वर्षानंतर तुम्हाला 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक ही 22.50 लाख रुपये असेल, तर 15 वर्षाच्या हिशोबाने तुम्हाला यामध्ये 18.18 लाख रुपये व्याज मिळेल.
या खात्याचा सर्वात कमी मॅच्युरिटी पिरीयड हा 15 वर्षाचा असतो. जो वाढवून 25 वर्षापर्यंत करता येतो. थोडक्यात पीपीएफ खात्यात तुम्ही 5-5 वर्षाचे एक्स्टेंशन करून 25 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. 25 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर तुम्हाला 1.3 करोड रुपये रिटर्न मिळतील. ज्यामध्ये तुमची गुंतवणूक ही 37.5 लाख रुपये असेल, तर 65.58 लाख रुपये हा तुमचा निव्वळ नफा असणार आहे.