राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत इंटरनेट सेवा देण्याच्या दृष्टीने केरळ सरकारने स्वत:ची इंटरनेट सेवा सुरु केली आहे. अशा प्रकारे स्वत:ची इंटरनेट सेवा असणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. सोमवारी 5 जून 2023 रोजी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी K-FON या इंटरनेट सेवेचे लोकार्पण केले. इंटरनेट सेवा आणि पायाभूत सेवा सुविधेसाठी केरळ सरकारकडून 1500 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
K-FON अर्थात केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्कचा राज्यातील जवळपास 20 लाख गरिब नागरिकांना फायदा होणार आहे. केरळला नॉलेज इकॉनॉमीमध्ये परावर्तीत होण्यात मोफत इंटरनेट सेवा महत्वाचे योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री विजयन यांनी व्यक्त केला.
राज्यातील इडामलाकुडी जंगले आणि इतर दुर्गम भागात देखील नागरिकांना इंटरनेटसेवा मिळेल.या केरळ स्टोरीचा प्रत्येक नागरिक साक्षीदार बनेल, असे मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले. खासगी दूरसंचार क्षेत्राला स्पर्धा करेल अशी क्षमता केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्कमध्ये असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. इंटरनेट सेवा मोफत उपलब्ध केल्याने खासगी केबल पुरवठादार आणि मोबाईल सेवा पुरवठादारांचे धाबे दणाणले आहेत.
K-FON च्या पायाभूत सेवा सुविधांसाठी केरळमध्ये 35000 किमीचे ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क उभे केले आहे. यासाठी 1500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. हा निधी केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बोर्डाने उपलब्ध केला होता. ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटरनेटने जोडण्यात येणार आहे.
दोन टप्प्यात हा प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे.पहिल्या टप्प्यात कॉर्पोरेट आणि जवळपास 30000 सरकारी संस्थांना इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबांना आणि अनुदानामध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध केली जाणार आहे. मोफत इंटरनेटचा केरळमधील 14000 कुटुंबियांना फायदा होण्याची शक्यता आहे.
K-FON चे इंटरनेट प्लॅन्स किती रुपयांना आहेत
केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्कमध्ये स्थानिकांना वाजवी दरात वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे. सर्वसाधारणपणे K-FONचा बेसिक प्लॅन 299 रुपयांचा असून यात 20 एमबीपीएस स्पीडने इंटरनेट सेवा मिळते.यात दर महिन्याला 3000 जीबी फ्री डाऊनलोड्सची मर्यादा आहे. K-FON चा सर्वात महागडा प्लॅन हा 1249 रुपयांचा असून यात 250 एमबीपीएसचा स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये 5000 जीबी इतके फ्री डाऊनलोड्स करता येईल.