महिलांना आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सगळ्यात आधी पुरुषसत्ताक समाजाचा सामना करावा लागतो. आणि त्यात एका महिलेशी धर्मीय आणि जातीय वेगळेपण जोडलेलं असेल तर बघायलाच नको. पण, कदाचित अशा विरोधातूनच तुमच्यातली संघर्ष करण्याची वृत्ती पेटून उठते. तसंच पद्मश्री कल्पना सरोज यांच्या बाबतीत घडलं आहे.
कल्पना सरोज यांचा जन्म 1961 साली विदर्भातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा या गावात झाला. वडील हवालदार म्हणून काम करत होते. घरात परिस्थिती बेताचीच होती. आई-वडील, 3 मुली आणि दोन मुलं असं मोठं कुटुंब होतं.वडिलांना कुटुंबाला पुरेशा सोयीसुविधा देता येत नव्हत्या.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब गुजराण करत होतं. घराबाहेर देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती. जातीयता खोलवर पसरलेली होती. कल्पना सरोज यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘त्यांचे आजोबा जमीनदार लोकांकडे शेतमजूर म्हणून कामाला जायचे. एकदा त्या त्यांच्या आजोबांसोबत कामावर गेल्या. तिथे त्यांनी पाहिलं की त्यांच्या आजोबांना वेगळं बसवलं जात होतं, त्यांना तुटक्या कपात चहा दिला जात होता.’
वयाने लहान असलेल्या कल्पना हे सगळं बघत होत्या. त्यांनी जेव्हा प्यायला पाणी मागितलं तेव्हा त्यांना दुरून पाणी दिलं गेलं. अस्पृश्यता काय असते हे पाहिल्यांदाच कल्पना अनुभव होत्या. सामाजिक विषमतेची त्यांना चीड यायची, परंतु परिस्थितीच अशी होती की त्या काहीही करू शकल्या नाहीत.
Table of contents [Show]
बाल विवाह आणि खडतर प्रवासाची सुरुवात
पाच मुलांचा रहाटगाडगा ज्या वडिलांना पेलत नाही ते जो मार्ग स्वीकारतात तोच कल्पना यांच्या वडिलांनी स्वीकारला. आणि सातवीत असताना 12 वर्षांच्या कल्पनाचा विवाह लावून देण्यात आला. मुलगा काय करतो, किती शिकलाय असे प्रश्न कल्पना यांच्या वडिलांना पडले नाहीत. सगळं जनरितीप्रमाणेच होत होतं.
लग्नानंतर मुंबईच्या एका झोपडपट्टीत त्या राहायला आल्या. सासरच्या लोकांनी कल्पना यांचा छळ सुरू केला. त्यांना मारहाण केली जायची, जेवण दिलं जात नव्हतं. शेवटी लग्नानंतर सहाच महिन्यात वडिलांनी सासरच्यांकडून सुटका करून घेऊन कल्पना यांना परत अकोल्याला नेलं.
आता पुढचा संघर्ष होता तो लग्न झालेली मुलगी माघारी आली हे टोमणे झेलण्याचा. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण, नशिबाने त्या वाचल्या. आणि आता मिळालेला हा आपला पुनर्जन्म आहे असं समजून त्या कामाला लागल्या.
त्यांनी आता ठरवलं की शिक्षण पूर्ण करता आलं नाही म्हणून आता थांबायचं नाही. त्यांनी एके ठिकाणी शिलाई मशीन शिकण्यासाठी क्लास लावला. परंतु गावात पुरेसे ग्राहक नव्हते त्यामुळे उत्पन्न मिळत नव्हतं. त्यांनी मुंबईला पुन्हा येण्याची योजना बनवली.
घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला परंतु कल्पना यांच्या हट्टापुढे त्यांना नमतं घ्यावं लागलं. दादरच्या एका झोपडपट्टीत कल्पना यांचे काका राहायचे, त्यांच्याकडे जाऊन कुठे काम मिळतं का? याची त्यांनी चौकशी केली. काकांच्या मदतीने त्यांना परेल इथल्या एका होजियरी कंपनीत काम मिळालं. दोन रुपये रोजाने त्यांनी कामाला सुरुवात केली.
बहिणीच्या उपचारांसाठी 2,000 रु. ही नव्हते
अशा हलाखीच्या परिस्थितीत कल्पना यांची बहीण आजारी पडली. तिच्यावर उपचार करण्यासाठी कल्पना यांच्या परिवाराकडे पैसे नव्हते. केवळ 2000 रुपयांची उपचारासाठी गरज होती परंतु आर्थिक मदत करणारं कुणीही नव्हतं. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे कल्पना यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. याचा मोठा आघात कल्पना यांच्या मनावर झाला.
आपली आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे असं त्यांच्या मनाने पक्कं केलं. त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घेण्याचं त्यांनी ठरवलं. आणि तिथे जन्म झाला एका उद्योजिकेचा.
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कल्पना यांच्या वडिलांची नोकरी गेली.आता घरात कमावती फक्त एकच व्यक्ती होती, ती म्हणजे कल्पना! कल्पना यांनी आपल्या सर्व कुटुंबीयांना मुंबईला बोलावलं. मुंबईत घरभाडे परवडणारे नव्हते म्हणून त्या त्यांच्या कुटुंबियांना घेऊन कल्याणमध्ये एक खोली घेऊन राहू लागल्या. याचवेळी त्यांना आता आपण उद्योजक बनलं पाहिजे असं वाटू लागलं. यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला. आणि कुठल्या सरकारी योजना आपल्याला मदत करतील याचाही आढावा घ्यायला मदत केली.
उद्योजिका बनण्याचं स्वप्न असं साकार झालं
दलित वर्गासाठी असलेल्या योजना त्यांनी समजून घेतल्या आणि 50 हजार रुपयांचं बँकेचं लोन घेतलं आणि स्वतःचं बुटीक सुरू केलं. तिथे महिलांना त्या शिवणकाम शिकवत होत्या आणि व्यवसाय देखील चालवत होत्या. हळूहळू त्यांना असं जाणवू लागलं की आपल्यासारखे असे अनेक लोक आहेत ज्यांना काही तरी करण्याची जिद्द आहे परंतु त्यांना मार्गदर्शन मिळत नाही.
यासाठी कल्पना यांनी 'सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना' नावाने एक संस्था सुरू केली. याद्वारे बेरोजगार युवकांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचं काम कल्पना यांनी सुरू केलं.
जेव्हा कल्पना सरोज यांना मारण्याची सुपारी दिली गेली…
आता हळूहळू कल्पना यांना स्वतःवर आत्मविश्वास वाटू लागला होता. आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव त्यांना होऊ लागली होती.1999 सालातली गोष्ट. बुटीक व्यवसायातून उत्पन्न कमी मिळत असल्याचं लक्षात आल्यावर कल्पना यांनी फर्निचर व्यवसायात नशीब आजमावून पाहायचं ठरवलं.
तिथेही त्यांची मेहनत कामी आली. अशातच त्यांनी एक प्लॉट खरेदी केला आणि त्यावर निवासी बिल्डिंग बांधण्याचा विचार सुरू केला. परंतु 25-30 वर्षाची कुठली नवखी मुलगी 'बिल्डर' बनू बघते आहे हे अनेकांना रुचले नाही. कल्पना यांना मारण्याची सुपारी काही लोकांनी दिली.
त्यांच्यावर मारेकरी घालण्याचेही प्रकार घडले. तत्कालीन पोलीस कमिशनरांना भेटून कल्पना यांनी बंदूक परवाना काढला. ‘मी भारतातील पहिली महिला असेन जिला एकाच दिवसात बंदूक परवाना मिळाला असेल, असं मोठ्या आत्मविश्वासाने कल्पना सरोज सांगतात.
कल्पना यांच्या आयुष्यात आणखी एक वळण यायचं होतं.
बुडीत कंपनीचं पालकत्व स्वीकारलं!
आता कल्पना सरोज मोठं स्वप्न बघू लागल्या होत्या. नवनवे व्यवसाय सुरू केले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. अशातच काही कामगार त्यांना भेटायला आले. हे सगळे कामगार होते 'कमानी ट्यूब्स' (Kamani Tubes) या कंपनीचे. या कंपनीची कथाच काही वेगळी होती. 1997 साली सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निवाड्यानुसार कंपनीचे कामगारच या कंपनीचे मालक बनले होते. देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती.
काही वर्षे कामगार संघटनांनी ही कंपनी चालवली, परंतु उद्योगधंदे कसे चालवावे, कसे वाढवावे याचे प्रशिक्षण नसल्यामुळे कंपनी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत गेली. कामगार कंपनी चालवत होते म्हणून लोकांनी त्यांना मदत केली परंतु ही मदत फार काळ टिकली नाही.
या कंपनीचे कर्मचारी कल्पना यांना भेटायला आले आणि या कंपनीचं पालकत्व स्वीकारावं अशी विनंती केली. कामगारांची परिस्थिती वाईट होती. घरी पोरं-बाळं उपाशी होती. गरिबीचे दिवस जगलेल्या कल्पना यांनी हे आव्हान स्वीकारलं. जवळच्या लोकांनी त्यांना अक्षरशः वेडं ठरवलं. बुडीत निघालेल्या कंपनीत पैसे लावून कल्पना स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेणार आहे असं देखील म्हटलं गेलं.
2000 साली जेव्हा 'कमानी ट्युब्स' चा कार्यभार कल्पना यांनी हाती घेतला तेव्हा कंपनीवर 116 कोटींचे कर्ज होते. यातील बहुतांश कर्ज हे वेगवेगळे दंड आणि व्याजामुळे वाढले होते.कर्ज देणाऱ्या बँकांना भेटण्यापेक्षा सरळ देशाच्या अर्थमंत्र्यांना भेटून मदत मागावी अशी कल्पना त्यांना सुचली.
तात्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना कल्पना सरोज भेटल्या. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. कल्पना यांच्या विनंतीवरून देशाच्या अर्थमंत्र्यांनी थेट दंडाची रक्कम आणि कर्जावरील व्याज माफ केले सोबत कर्जाच्या मुद्दल रकमेतून देखील 25% कर्ज माफ केले. कल्पना सरोज यांच्या प्रयत्नातून कमानी ट्युब्सचे कर्ज आता निम्मे झाले होते.
बुडीत निघालेल्या कंपनीला सरोज यांनी नवसंजीवनी दिली. कामगारांना शिस्त लावली, आपण व्यवस्थित काम केलं तर चांगले आर्थिक लाभ होतील हे त्यांना पटवून दिलं. त्यांच्या प्रयत्नातून ही कंपनी विस्तारत गेली. कंपनीचे उत्पादन आणि उत्पन्न वाढत गेले. आज कंपनीचे भागभांडवल 2000 करोड इतके आहे.
कल्पना यांनी मागच्या वर्षी बेंगळुरू येथे 500 करोड किंमतीचा नवा प्रकल्प सुरू केलाय.
उद्योगांचा विस्तार
कल्पना सरोज आता केवळ कमानी ट्युब्सपर्यंत मर्यादित नाहीत. वेगवेगळ्या क्षेत्रात त्या सध्या व्यवसाय करत आहेत. KS Film Production नावाने त्यांनी चित्रपट निर्मिती व्यवसायात देखील प्रवेश केला आहे. 'कल्पना सरोज फाउंडेशन' नावाने त्या एक एनजीओ देखील चालवतात. शिक्षणापासून लोक वंचित राहू नये यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. 2013 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.