महाराष्ट्रात स्थापन झालेल्या अनेक उद्योगांनी जगभरात आहे. यापैकीच एक कंपनी म्हणजे भारत फोर्ज. 60 च्या दशकात स्थापन झालेली भारत फोर्ज कंपनी आज एअरोस्पेसपासून ते डिफेन्ससह अनेक क्षेत्रात काम करत आहे. एवढेच नाही तर भारत फोर्ज देशातील सर्वात मोठ्या फोर्जिंग कंपनीपैकी एक आहे.
जागतिक स्तरावर देशाचे नाव नेणाऱ्या भारत फोर्ज कंपनीचा इतिहास काय आहे व ही कंपनी कोणकोणत्या क्षेत्रात काम करते? याविषयी जाणून घेऊयात.
भारत फोर्जची स्थापना
नीलकंठराव कल्याणी यांनी 19 जून 1961 ला पुण्यात भारत फोर्जची स्थापना केली. पुढे जागतिक स्तरावर कंपनीचा व्यवसाय पोहोचविण्याचे काम बाबा कल्याणी यांनी केले. 1972 मध्ये ते या कंपनीत सहभागी झाले व आज ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहे. तर त्यांचा मुलगा अमित कल्याणी यांनी 1999 मध्ये चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून कंपनीत काम करण्यास सुरुवात केली.
2003 मध्ये कंपनीने युरोप, उत्तर अमेरिका, चीनमध्ये देखील उत्पादन सुरू केले. याशिवाय, इतर क्षेत्रात काम करण्यासाठी वेगवेगळ्या उद्योगसंस्थांची देखील स्थापना करण्यात आली आहे. भारत फोर्जशीच संबंधित असलेली कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड कंपनी भारतीय सैन्यासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करते.
एअरोस्पेसपासून ते डिफेन्ससह अनेक क्षेत्रात कार्यरत
एकेकाळी भारतातील उद्योगांना यंत्रसामग्री व मशीन्सचे पार्ट्स आयात करावे लागत असे. मात्र, भारत फोर्जने देशांतर्गतच उत्पादनावर भर देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. आज भारत फोर्जमध्ये जवळपास 10 हजार इंजिनिअर्स कंपनीत काम करतात.
कंपनी रेल्वे, वाहतूक, उर्जा, एअरोस्पेस, ऑइल व गॅस, ई-मोबिलिटी, बांधकाम-खाणकामसह संरक्षण क्षेत्रात काम करत आहे. कंपनी या क्षेत्रातील संबंधित वेगवेगळ्या पार्ट्सची निर्मिती करण्याचे काम करते. वाहन, रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या इंजिन पार्ट्स, चेसिस व इतर गोष्टींची निर्मिती कंपनीद्वारे केली जाते.
पुणे व आजुबाजूच्या भागात कंपनीचे उत्पादन कारखाने आहेत. पुण्यातील मुंढवा येथे 100 एकर जागेत फोर्जिंग आणि मशीनिंग सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, सातारा, बारामती आणि चाकण भागातून देखील कंपनीचे काम चालते.
भारत फोर्ज संरक्षण क्षेत्रातही आघाडीवर
भारत फोर्ज संरक्षण क्षेत्रातही आघाडीवर आहे. भारतीय सैन्यदलासाठी वेगवेगळी शस्त्रास्त्रे कंपनीद्वारे निर्माण केली जातात. कंपनीद्वारे सैन्यासाठी तोफखाना, वाहने, दारूगोळा, क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते.