प्रत्येक लोकप्रिय ब्रँडच्यामागे एक रंजक गोष्ट असते. काही ब्रँड हे केवळ त्यांचे नाव आणि लोगोमुळेच ओळखले जातात. मात्र, काही ब्रँड्सच्या आठवणी वर्षांनुवर्ष लोकांच्या मनात असतात. असाच एक लोकप्रिय ब्रँड म्हणजे कॅम्लिन. प्रत्येकाने शाळेत असताना या ब्रँडची एकतरी वस्तू नक्कीच वापरलेली असते.
शालेय, ऑफिस साहित्य विक्री करणाऱ्या या ब्रँडची सुरुवात एका मराठी माणसाने केली. मराठी व्यक्तीने घरातून सुरु केलेली ही कंपनी आज जागतिक बाजारात देखील साहित्याची विक्री करत आहे.
Table of contents [Show]
कॅम्लिनची स्थापना
स्वातंत्र्य लढ्याच्या काळात परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात होता. अशावेळी स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीसाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न केले जात होते. याच काळात 1931 साली दिगंबर दांडेकर यांनी मुंबईतील आपल्या घरातूनच शाई पावडरची निर्मिती करण्यास सुरुवात केली. ते सायकलवरून शाई पावडर, गोळ्यांची विक्री करत असे.
पुढे जाऊन दिगंबर दांडेकर यांनी आपल्या भावासोबत मिळून ‘दांडेकर अँड कंपनी’ची स्थापना केली. सुरुवातीच्या काही वर्षातच कंपनीच्या वस्तू मुंबई भागात प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या.1946 मध्ये कंपनीचे नाव बदलून कॅम्लिन असे करण्यात आले.
कॅम्लिन नावामागची गोष्ट
कंपनीला कॅम्लिन हे नाव कसे मिळाले याचीही एक रंजक गोष्ट आहे. कंपनीचे नवीन नाव काय ठेवायचे याचा विचार करत असतानाच दांडेकरांना एका परदेशी सिगारेट ब्रँडची जाहिरात दिसली. या ब्रँडची टॅगलाइन होती - "I'd walk a mile for a Camel." त्या जाहिरातीवर उंटाचा फोटो होता.
ज्याप्रमाणे उंट पाण्याशिवाय कितीही दिवस वाळवंटात राहू शकतो. तसेच, कंपनीच्या पेनने रिफिल न करता कितीही कागदांवर लिहिता येणे शक्य आहे, असे दांडेकरांना वाटले. येथूनच कंपनीला कॅम्लिन असे नाव मिळाले.
जपानच्या कंपनीची भागीदारी
शाई व पेनाला लोकप्रियता मिळाल्यानंतर कंपनीने इतर शालेय साहित्य देखील हळूहळू बाजारात आणले. पेन्सिल, कंपास, ग्लू, 3डी रंग अशा विविध उपयोगी वस्तू त्यांनी बाजारात आणल्या. पुढे 1988 मध्ये कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील लिस्टेड झाली.
कॅम्लिनमध्ये जपानच्या Kokuyo Co. Ltd ने देखील गुंतवणूक केली आहे. आज कॅम्लिनमध्ये जपानच्या कंपनीची हिस्सेदारी 50.54 टक्के, तर दांडेकर कुटुंबाची हिस्सेदारी 17.83 टक्के आहे. यानंतर कंपनीच्या नावात बदल करून कोकुयो कॅम्लिन लिमिटेड करण्यात आले.
सर्वात लोकप्रिय शालेय साहित्य विक्री करणारा ब्रँड
कॅम्लिन आज भारतातील सर्वात लोकप्रिय शालेय साहित्य विक्री करणाऱ्या ब्रँडपैकी एक आहे. कंपनीकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेंचेही आयोजन केले जाते. 2011 साली आयोजित करण्यात आलेल्या All India Camel Colour Contest मध्ये देशभरातील जवळपास 48.5 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंद झाली. एकेकाळी मराठी व्यक्तीने घरातून सुरू केलेला हा व्यवसाय आज जगभरात पसरला आहे.