एखाद्या वेळेस तातडीच्या कामानिमित्त आपण घराबाहेर पडतो. अशावेळी मोबाईलमध्ये चार्जिंग असेलच याची शक्यता कमी असते. मग आपण सार्वजनिक ठिकाणी जिथे चार्ज करता येईल तेथून चार्ज करून घेतो. पण, आता अशा ठिकाणी चार्ज करणं तुम्हाला संकटात आणू शकते. कारण, काही स्कॅमर्स ज्यूस जॅकिंगद्वारा तुमचे खाते काही मिनिटात खाली करू शकतात. या स्कॅमविषयी RBI ने लोकांना अलर्ट दिला आहे.
काय आहे ज्यूस जॅकिंग?
ज्यूस जॅकिंग अशी पद्धत आहे, ज्याद्वारे स्कॅमर्स मोबाईल, लॅपटाॅप आणि टॅबलेटमधून आपला महत्वाचा डेटा चोरून घेतात. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचा वापर करतात. कारण, प्रत्येकजण अशा ठिकाणांचा वापर चार्जिंगसाठी करतात. मग अशा ठिकाणी ते मालवेअरद्वारे साॅफ्टवेअर किंवा हार्डवेअर इन्स्टाॅल करतात. हे स्कॅमर्स यासाठी प्रामुख्याने यूएसबी पोर्ट (USB Port) आणि चार्जिंग किआॅस्कचा (Charging Kiosk) म्हणजेच चार्जिंग स्टेशनचा वापर करून लोकांना अलगद त्यांच्या जाळ्यात ओढतात. हे स्कॅमर्स जिथे जास्त गर्दी असते तिथल्या चार्जिंग स्टेशनवर साॅफ्टवेअर इन्स्टाॅल करतात. यासाठी ते रेल्वे स्टेशन, विमानतळ, हाॅटेल आणि बऱ्याच गर्दीच्या ठिकाणांचा वापर करतात.
महत्वाचा डेटा होवू शकतो चोरी
नेहमी किती ही घाईत असला तरी अशा ठिकाणी चार्ज करायचं टाळा. कारण, मोबाईलचा चार्जिंग पोर्ट फाईल किंवा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी ही वापरला जाऊ शकतो. याचाच फायदा घेवून स्कॅमर्स पोर्टद्वारे मालवेअर पाठवतात आणि नंतर संबंधित व्यक्तीचा महत्वाचा डेटा तसेच, ई-मेल, एसएमएस, सेव्ह केलेले पासवर्ड बॅंकेची माहिती, क्रेडिट कार्ड नंबर किंवा अन्य सेव्हिंग्ज खात्याची माहिती असल्यास हे स्कॅमर्स तेही चोरू शकतात किंवा त्यावर नियंत्रण मिळवू शकतात. त्यामुळे त्यांनी नियंत्रण मिळवल्यास काहीच वेळात ते तुमचे खाते खाली करू शकतात.
सुरक्षेसाठी करा खालील गोष्टी!
ज्यूस जॅकिंगपासून वाचण्यासाठी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी चार्ज करण्याधी यूएसबी केबल पाहणे आवश्यक आहे. त्यात काही कमी-जास्त आढळल्यास तिथे चार्जिंग न करणे हिताचं ठरेल. त्याचबरोबर इतर ही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही या स्कॅमपासून वाचण्यासाठी वापरू शकता. जसे की, कुठल्याही ठिकाणावरच्या वाय-फायला कनेक्ट न करणं, तुमच्या मोबाईल, लॅपटाॅपला योग्य पासवर्ड देणं. तसेच, फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा फेस आयडी वापरणं. सर्वांत महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वत:चा चार्जर किंवा पोर्टेबल पावर बॅंक सोबत ठेवणं. या गोष्टी केल्यास तुम्हाला कोणताही आर्थिक फटका बसणार नाही.