प्रत्येक ठिकाणी फोनचा वापर वाढला आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये इंटरनेट आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या फोनचा काहीच उपयोग नाही, अशीच सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता जिओ कंपनीने त्यांचा 119 रुपयांचा प्लॅन बंद करुन, जिओ युझर्सना निराश केले आहे. हा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येत होता, यामध्ये युझर्सला 1.5GB डेटा मिळत होता आणि अनलिमिटेड व्हाॅईस काॅल करता येत होते. याशिवाय प्रत्येक दिवशी 100 SMS ही मिळत होते. त्यामुळे काही दिवसांतच हा प्लॅन युझर्सला भावला होता. मात्र, जिओने हा प्लॅन पूर्ण भारतातील युझर्ससाठी बंद केला आहे. त्यामुळे यापुढे या प्लॅनवर रिचार्ज करता येणार नसल्याची माहिती टेलीकाॅमटाॅकने दिली आहे.
आता 149 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार
हा प्लॅन बंद केल्यामुळे आता सर्वात स्वस्त म्हणून जिओचा 149 रुपयांचा प्लॅन मार्केटमध्ये आला आहे. या प्लॅनच्या फायद्यांविषयी पाहायला गेल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला 20 दिवसांची वैधता मिळणार आहे. याशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी 1GB डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाॅईस काॅलिंग करता येणार आहे. तसेच, मेसेज संख्येत बदल झाला नसून प्रत्येक दिवशी युझर्सला 100 SMS करता येणार आहेत. मात्र, या प्लॅनसोबत 5जी डेटा मिळणार नाही. कंपनीने हा निर्णय घेतल्यामुळे कंपनीला ARPU म्हणजेच अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युझर सुधारण्यासाठी मदत होणार आहे.
एअरटेलचा स्वस्त प्लॅन 155 रुपयांचा
एअरटेलचा प्लॅन पाहायला गेल्यास सर्वात स्वस्त प्लॅन 155 रुपयांचा आहे. यामध्ये युझर्सला 24 दिवसांची वैधता मिळत असून अनलिमिटेड काॅलिंगही करता येणार आहे. पण, 24 दिवसांसाठी फक्त 1GB डेटा मिळणार आहे. मात्र, जिओच्या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी 1GB डेटा वापरायला मिळणार आहे. भलेही एअरटेलचा प्लॅन जिओपेक्षा महाग आहे, पण तुम्हाला काॅलिंगची सुविधा जास्त मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना जशी गरज आहे, त्याप्रमाणे युझर्स प्लॅन निवडायला मोकळे आहेत.