दिवाळखोरीत निघालेल्या जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनी लॉंडरिंगप्रकरणी नरेश गोयल यांना सक्तवसुली संचनालयाने अटक केली होती.
कॅनरा बँकेचे 538 कोटी रुपये बुडवल्याचा आरोपावरुन नरेश गोयल यांना 1 सप्टेंबर 2023 रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. गोयल यांची ईडी कोठडी आज संपुष्टात आली. त्यांना पीएमएलए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
जेट एअरवेज इंडिया लिमिटेड, नरेश गोयल, अनिता नरेश गोयल, गौरांग शेट्टी आणि इतर अज्ञात इसमांविरोधात आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅनेरा बँकेचे 538.62 कोटी रुपयांची गोयल आणि कुटुंबियांनी फसवणूक केल्याचा आरोप कॅनरा बँकेने केला आहे.
कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर ईडीने मुंबई आणि दिल्लीमधील गोयल यांच्या निवासस्थानी तसेच जेट एअरवेजच्या कार्यालयांची झडती घेतली होती. याशिवाय जेट एअरवेजच्या ऑडिटर्सवर देखील छापे टाकण्यात आले होते.
जेट एअरवेजमध्ये प्रचंड आर्थिक अनागोंदी झाल्याचा आरोप ईडीने केला होता. त्यानुसार गोयल यांची ईडी, सीबीआय, एसएफआयओ, आयटी या तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. यापूर्वी ईडीने फेब्रुवारीमध्ये मुंबई हायकोर्टात गोयल यांच्याविरोधात मनी लॉंडरिंगची याचिका दाखल केली होती. मात्र तत्कालीन न्यायाधीश रेवती मोहिते आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती.
जेट एअरवेजची कॅनरा बँकेतील कर्जखाती जून 2019 मध्ये अनुत्पादित मालमत्ता झाली. जेट एअरवेजचा कर्ज देणाऱ्या बँकांचे समूह करणाऱ्या एसबीआयने जेट एअरवेजविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु केली.