Jawan Ticket Sale: 1 सप्टेंबरपासून 'जवान' साठी तिकिटांची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली होती. हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी सिनेमा घरात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, धमाकेदार ट्रेलर आणि जोरदार प्रदर्शनपूर्व प्रसिद्धी यामुळे चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला दमदार प्रतिसाद मिळत आहे.
'जवान' चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग गदर 2 च्या ॲडव्हान्स बुकिंगलाही मागे टाकेल असे जाणकारांचे मत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक ॲटली दिग्दर्शित 'जवान' चित्रपट त्यातील स्पेशल इफेक्ट्स व व्हिज्युअल्समुळे आत्तापासूनच लोकप्रियता मिळवत आहे. तरी तिकिटांच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून आत्तापर्यंत ‘जवान’ने 17.50 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे समजते.
किंग खान व टीमची 'कोटीच्या कोटी उड्डाणे!
शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगवरून आणि ट्रेलर्सवरून चित्रटाची भव्यता लक्षात येतेच आहे. अशावेळी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा शाहरुख खान तगडे मानधन घेणार नाही तरच नवल. या चित्रपटासाठी शाहरुख खानने तब्बल 100 कोटी रुपये फी स्वीकारल्याचे समजते. याचबरोबर शाहरुख खानला चित्रपटाच्या नफ्याचाही काही भाग मिळणार आहे.
शाहरुख खान खालोखाल चित्रपटात लहानशा भूमिकेत झळकणाऱ्या दीपिका पादुकोणनेही 25 ते 30 कोटी रुपये मानधन घेतले आहे. चित्रपटात निगेटिव्ह भूमिकेत असणारा दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती याने 21 कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे.
शाहरुख खानबरोबर प्रमुख भूमिकेत असणाऱ्या नयनतारा या दाक्षिणात्य अभिनेत्रीने चित्रपटासाठी 11 कोटी रुपये मानधन घेतल्याचे समजते. तसेच, नयनताराचा हा पहिलाच बाॅलीवूड चित्रपट ठरला आहे. याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी हिने 2 कोटी रुपये तर 'दंगल' फेम सान्या मल्होत्रा हिने 1 ते 2 कोटी रुपये घेतला असल्याचा अंदाज मीडियाने वर्तवला आहे.
'जवान' चित्रपटाची शाहरुखचे चाहते आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ॲडव्हान्स बुकिंग आत्तापर्यंत 17.50 कोटी रुपयांची झाली आहे. तरी चित्रपट पडद्यावर यायला अजून 3 दिवस बाकी आहेत आणि चाहत्यांनी कोटींच्या घरात तिकिटे बुक केली आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काय परिस्थिती असणार आहे, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.