Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Alibaba आणि Ant Group चं प्रमुख पद जॅक मा यांनी का सोडलं?

Jack Ma

Image Source : www.npr.org

Chinese Fintech क्षेत्रात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. जॅक मा यांच्याभोवती चिनी कम्युनिस्ट सरकारचे पाश आणखी आवळले जातायत. त्यामुळे जॅक मा यांनी अँट ग्रुपमधूनच काढता पाय घेतल आहे. पण, याचा ई-कॉमर्स व्यवसायावर नेमका काय परिणाम होणार आहे?

ई-कॉमर्स (E Commerce) उद्योगातलं जगातलं एक प्रसिद्ध नाव जॅक मा (Jack Ma) यांनी आपल्या अँट ग्रुपमधून (Ant Group) काढता पाय घेतला आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी (Chinese Communist Party) सरकारने फिनटेक (FinTech) कंपन्यांभोवतालचे पाश 2020 पासून आवळले. आणि यात खासकरून त्यांचं लक्ष्य जॅक मा संचालित अलिबाबा (Alibaba) आणि अँट डॉट कॉम या कंपन्यांच होत्या.    

त्यानंतर चिनी सरकारने एकंदरीतच देशातल्या फिनटेक उद्योगवरचं नियंत्रण वाढवत नेलंय. आणि त्याचा फटका आता या उद्योगाला बसतोय. जॅक मा यांनी स्थापन केलेल्या अँट समुहाच्या मुख्य कंपनीचा तेव्हा चिनी शेअर बाजारात आयपीओ येणार होता. पण, फक्त पंधरा दिवस आधी मा यांना तो मागे घ्यावा लागला. चीनममध्ये आणि एकूणच फिनटेक कंपन्यांमध्ये नेमकं काय सुरू आहे? जॅक मा यांना टारगेट का केलं जातंय?    

जॅक मा यांनी आता नेमकं काय केलं?   

जॅक मा यांना चिनी ई-कॉमर्स क्षेत्रातला सम्राट मानलं जातं. त्यांनी चीनमध्ये अॅमेझॉनच्या तोडीची ई-कॉमर्स कंपनी स्थापन केली. आणि पाठोपाठ अँट ग्रुपच्या माध्यमातून या कंपनीची व्याप्तीही वाढवली. ते चीनमधले मोठे बिझिनेस टायकून मानले जात होतं.    

पण, 2020 मध्ये चीनच्या कम्युनिस्ट सरकार विरोधात त्यांनी केलेली टिपण्णी त्यांना भोवली. तिथपासून चिनी सरकारची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी सरकारने फिनटेक कंपन्यांबद्दलचे आपले नियम आणि त्यांची अंमलबजावणी कडक केली.    

अँट ग्रुपसाठी जॅक यांना आयपीओ आणायचा होता. तो जर प्रत्यक्षात आला असता तर तो जगातला सगळ्या मोठा (37 अब्ज अमेरिकन डॉलर) आयपीओ ठरला असता. पण, तो ही सरकारने रद्द करवला. त्या दरम्यान जॅक मा यांची चौकशी सुरू होती. आणि त्यानंतर फिनटेक क्षेत्रावर आपला एकछत्री अंमल बसवण्याचा प्रयत्न जॅक मा यांनी केला असा ठपका त्याच्यावर ठेवून चिनी सरकारने मावर 2.8 अब्ज अमेरिकन डॉलरचा दंड बसवला.   

चिनी सरकारने पाश आवळल्यावर चिनी बाजारांमध्ये अलिबाबाच्या शेअरमध्ये मोठी घसरण सुरू झाली. ती थांबवण्यासाठी आता जॅक माने अलिबाबा आणि अँट ग्रुप या आपल्या महत्त्वाच्या कंपन्यांमधून आपले बहुतांश शेअर विकले आहेत. आता मा यांच्याकडे फक्त 6% शेअर उरले आहेत.   

अँट समुह आणि अलिबाबामध्ये काय बदलणार?   

आतापर्यंत जॅक माकडे अँट समुहाचे 50% च्यावर हक्कं होते. त्यामुळे अख्खी निर्णय प्रक्रिया त्याच्या हातात होती. आता समुहामध्ये कुणा एका व्यक्ती किंवा भागधारकाच्या हातात निर्णय प्रक्रिया राहणार नाही, असा नवा निर्णय घेण्यात आला आहे.    

अँट समुह अलीपे हे UPI अॅप चालवतो. आणि एकट्या चीनमध्ये त्याचे 1 अब्जच्या वर ग्राहक आहेत.    

चीनने फिनटेक कंपन्यांचे पाश का आवळले?   

जॅक मा हे पूर्वाश्रमीचे इंग्लिश शिक्षक होते. इतर देशातल्या ई-कॉमर्स उद्योगाचा आढावा घेतल्यावर त्यांनी चीनमध्ये अलिबाबाची सुरुवात केली. आणि त्यांचा हा प्रयोग भलताच यशस्वी झाला. 2019 पर्यंत फोर्ब्स यादीतही त्यांनी जगातल्या पहिल्या 20 अब्जाधीशांमध्ये स्थान मिळवलं होतं.    

पण, 2019 मध्ये UPI क्षेत्रात विस्तार करत असताना त्यांनी बँकिंग नियामक मंडळावर टीका केली. ही यंत्रणा सरकारच्या हातचे बाहुले आहेत, हे त्यांचं विधान त्यांना भोवलं. आणि तिथून जॅक मा आणि फिनटेक कंपन्यांवरच सरकारची संक्रात आली असं म्हणावं लागेल.सरकारी यंत्रणेनं सगळ्याच ई-कॉमर्स कंपन्यांवरचे निर्बंध वाढवले. एकाधिकारशाही नको या सबबीखाली या कंपन्यांना आपले अल्गोरिदम शेअर करायला लावले. आणि सरकारी नियम न पाळणाऱ्यांवर अब्जावधीचा दंड लावला. तिथून पुढे चिनी फिनटेक कंपन्यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.   

जॅक मा नेही सरकारी हस्तक्षेप वाढल्यावर आधी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं सोडलं. आणि त्यानंतर सरकारी दबावामुळे त्यांनी हे निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.