सोशल ई-कॉमर्स (Social E Commerce) या नवीन संकल्पनेसाठी 2023 मध्ये तयार राहा. या संकल्पनेनं चीनमध्ये (China) आताच धुमाकूळ घातला आहे. अॅमेझॉन डॉट कॉम (Amazon.com), युट्यूब (YouTube) आणि टिकटॉक (Tiktok) या सोशल मीडिया व्यासपीठांवर ई-कॉर्मर्स (E Commerce) क्षेत्रातल्या कंपन्यांमधली उत्पादनं सर्रास विकली जात आहेत.
या अनुभवामुळे टिकटॉक, युट्यूब तसंच अॅमेझॉन कंपन्यांनी ई-कॉमर्सला पूरक अशा सेवा सुरू करताना दिसतायत. हाच ट्रेंड पुढच्या वर्षी जगभर दिसेल असा अंदाज आहे.
काही व्हीडिओमध्ये तर सेलिब्रिटी किंवा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्झर युट्यूब आणि टिकटॉकवर येऊन उत्पादनांच्या जाहिराती करतात. आणि ती विकत घेण्यासाठी ग्राहकांना आवाहन करतात. असे व्हीडिओ सध्या चीनमध्ये लोकप्रिय आहेत. आणि पुढील वर्षीपर्यंत तोच ट्रेंड जगभर असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. निसरिन या लोकप्रिय टिकटॉक स्टारने अशा प्रकारे वस्तू विकून ग्रेट ब्रिटनमध्ये 10,000 पाऊंड कमावले आहेत. निसरिनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला 5,00,000 फॉलोअर आहेत.
अमेरिका आणि युकेसह उर्वरित युरोपमध्ये असे वेगवेगळे प्रयोग सध्या सुरू आहेत. एकट्या चीनमध्ये 2021 वर्षांत सोशल ई-कॉमर्स प्रकारातली उलाढाल 119 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. सोशल ई-कॉमर्सचा प्रसार होण्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत.
एक म्हणजे कंपन्यांना वस्तूंच्या जाहिरातीवर कमी खर्च करावा लागतो. सोशल मीडिया व्यासपीठांवर थेट जाहिरात आणि विक्री होत असल्यामुळे हा खर्च टळतो. आणि दुसरं ऑनलाईन बाजारपेठ असल्यामुळे दुकानं किंवा शोरुमचा खर्चही वाचतो.
याखेरीज सोशल ई-कॉमर्स सेवांमध्ये लाईव्ह स्ट्रिमचीही सोय आहे. त्यामुळे ग्राहकांना हवी असलेली माहिती ते तेव्हाच्या तेव्हा मिळवू शकतात.
अर्थात, सोशल ई-कॉमर्ससाठी वस्तू आणि उत्पादनांची मर्यादा आहे. म्हणजे फॅशन, लाईफस्टाईल, कॉस्मेटिक्स अशा वस्तू जास्त करून सोशल ई-कॉमर्सच्या व्यासपीठावर विकल्या जातात. यंत्रं, फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री अशा व्यासपीठावर फारशी होत नाही.
पण, टिकटॉक, युट्यूबवर उत्पादनांच्या विक्रीसाठी लाईव्ह शॉपिंग मेळावे भरवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.