जगातील सर्वात मोठी मद्य उत्पादक कंपनी डियाजिओचे सीईओ भारतीय वंशाचे इव्हान मेनेझेस यांचे बुधवार 5 जून 2023 रोजी लंडनमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. विशेष म्हणजे याच महिनाअखेर ते कंपनीतून निवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. मूळचे पुण्याचे असलेले इव्हान इव्हान मेनेझेस यांच्या निधनाने कॉर्पोरेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. (Ivan Menezes CEO of global spirits giant Diageo passed away)
पोटात अल्सर झाल्याने मेनेझेस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यातच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. मेनेझेस यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी कंपनीने नवे सीईओ म्हणून डेब्रा क्रू यांची घोषणा केली होती. इव्हान यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर गुंतागुंत वाढल्याने त्यांचे निधन झाल्याचे डियाजिओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंपनीने सर इव्हान मेनेजेस यांच्या उत्तराधिकारी म्हणून डेब्रा क्रू यांची 28 मार्च 2023 रोजी घोषणा केली होती. डेब्रा क्रू या डियाजिओच्या इतिहासातील पहिला महिला सीईओ आहेत.येत्या 30 जून 2023 रोजी इव्हान मेनेझेस सीईओ पदावरुन निवृत्त होणार होते.
इव्हान मेनेझेस यांच्या नेतृत्वात डियाजिओने मद्य बाजारपेठेवर वर्चस्व मिळवले. जवळपास 180 देशांमध्ये डियाजिओचे 200 हून अधिक ब्रॅंड्स विक्री केले जातात. मागील आठ वर्षात डियाजिओच्या स्कॉच व्हिस्की, वोडका, जिन, रम, कॅनडियन व्हिस्की, टकिला असे विविध मद्याचे ब्रॅंड्सना ग्राहकांनी पसंती दिली. मेनेझेस यांच्या नेतृत्वात जॉनी वॉकर व्हिस्कीला लोकप्रियता मिळाली.ब्रिटनमध्ये डियाजिओची गिनस बिअर ही सर्वाधिक विक्री होणारा लिकर ब्रॅंड आहे.
मेनेझेस 1997 मध्ये डियाजिओमध्ये रुजू झाले. गिनिज आणि ग्रॅंड मेट्रोपोलिटन या कंपन्यांचे अधिग्रहण झाल्यानंतर मेनेझेस यांनी डियाजिओमध्ये प्रवेश केला होता. 2013 मध्ये त्यांनी सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली. मागील 10 वर्षात त्यांनी डियाजिओमधील अनेक ब्रॅंड्सला लोकप्रिय केले. कन्झुमर प्रोडक्ट्समध्ये जगातील मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड अशी डियाजिओने ओळख मिळवली.जॉनी वॉकर व्हिस्की या सर्वात लोकप्रिय ब्रॅंडचे जनक म्हणून इव्हान मेनेजेस यांना ओळखले जाते.
मेनेझेस यांच्या काळात डियाजिओच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. डियाजिओचा शेअर या काळात 88% ने वाढला. कंपनीच्या आर्थिक कामगिरीचा विचार करता डियाजिओची मागील सहा महिन्यात 9.4 बिलियन युरोची विक्री केली. विक्रीत 18.4% वाढ झाली. कंपनीच्या प्रिमियम ब्रॅंड्ची वाढलेली मागणी आणि मद्याच्या किंमतीत वाढ केल्याने डियाजिओला फायदा झाला.
मूळचे पुण्याचे होते मेनेझेस
इव्हान मेनेझेस हे मूळचे पुण्याचे होते.त्यांचे वडिल मॅन्युअल मेनेझेस हे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते. इन्हान यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले.दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. अहमदाबादमधील आयआयएममधून त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना ब्रिटनमधील मानाच्या नाईटहूड पुरस्काराने किंग चार्ल्स यांच्याकडून सन्मानित करण्यात आले होते.
डियाजिओची मार्केट व्हॅल्यू वाढली
डियाजिओचे दिर्घकाळ नेतृत्व करणाऱ्यांपैकी मेनेझेस हे एक सीईओ होते. यापूर्वी पॉल वॉल्श यांनी डियाजिओचे सर्वाधिक काळ नेतृत्व केले होते. मेनेझेस 16 वर्ष कंपनीचे सीईओ राहिले. मेनेझेस यांच्या काळात डियाजिओची मार्केट व्हॅल्यू 30 बिलियन युरोने वाढून 80 बिलियन युरो झाली. युकेमधूल होणाऱ्या अन्नधान्यांच्या एकूण निर्यातीपैकी 10% वाटा डियाजिओचा आहे. डियाजिओकडून वर्षाकाठी 2 बिलियन डॉलर्सची निर्यात केली जाते.