ITR filing: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणं ही भारतीय नागरिकांची दरवर्षीची जबाबदारी आहे. आयटीआर फाइल करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत आहे. जेव्हा तुम्ही रिटर्न भरता तेव्हा आयकर विभागाद्वारे तुम्ही दिलेले डिक्लेरेशन आणि वर्षभरात भरलेला कर याची पडताळणी केली जाते. जर कर कमी भरलेला असेल तर उर्वरित कर भरण्यासाठी 'आउटस्टँडिंग टॅक्स डिमांड' आयकर विभागाकडून केली जाते.
आयकर विभागाच्या e-filing संकेतस्थळावर तुम्हाला ही आउटस्टँटिंग डिमांड पाहता येईल. जर तुम्हाला अशी डिमांड आली तर तुम्ही ही मागणी मान्य करून उर्वरित कर भरणा करू शकता. तसेच ही मागणी पूर्णत: किंवा अशंत नाकारू शकता.
आउटस्टँडिंग टॅक्स डिमांडला कसे उत्तर द्यावे
स्टेप 1: इ-फायलिंग पोर्टलवर लॉगइन करा
स्टेप 2: पेंडिंग अॅक्शनवर क्लिक करा. तुम्हाला आउटस्टँडिंग डिमांड दिसतील. येथे तुम्ही "Pay Now" वर क्लिक करून कर भरू शकता.
स्टेप 3: आयकर विभागाने केलेली कर मागणी तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही नाकारू शकता.
जर डिमांड बरोबर असेल आणि तुम्ही कर भरला नसेल तर तुम्ही कर भरू शकता. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर ट्रॅझॅक्शन आयडी मिळेल.
जर तुम्हाला आयकर विभागाने केलेली कर मागणी मान्य नसेल तर तुम्ही मागणीशी असहमती दर्शवू शकता. तसा पर्याय उपलब्ध आहे. पूर्णपणे असहमत किंवा अंशत: असहमत असा हा पर्याय आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करता येईल. मात्र, त्यासाठी तुम्हाला योग्य कारण निवडावे लागेल. त्या संबंधित कागदपत्रांची माहिती द्यावी लागेल.
आउटस्टँडिंग टॅक्स डिमांडला उत्तर दिले नाही तर काय होईल?
जर तुम्ही आयकर संकेतस्थळावरील आउटस्टँडिंग टॅक्स डिमांडला काहीही उत्तर दिले नाही तर या रकमेवरील व्याजदर वाढत जाईल. तसेच भविष्यातील कर परताव्याच्या रकमेशी ही रक्कम अॅडजेस्ट केली जाईल. त्यामुळे आयकर भरल्यानंतर काही आउटस्टँडिंग डिमांड आहे का ते तपासून पाहा. अन्यथा रक्कम आणि त्यावरील व्याजापोटी जास्त पैसे खर्च करावे लागतील.